Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 27 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीचे
प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी थांबवणार नाही- राज्य सरकारची
घोषणा; मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत मुंबई उच्च
न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता
v महिलांचं गर्भाशय
काढण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आमदार नीलम गोऱ्हे
यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन
v औरंगाबादमधून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान सेवा उपलब्ध करून देण्याची खासदार इम्तियाज जलील
यांची लोकसभेत मागणी
v औरंगाबाद महानगरपालिकेची अवैध नळधारकांविरूद्ध कारवाई: मुख्य
जल वाहिनीवरचे एकशेसाठ तर अन्य तीनशे अवैध
नळ जोडण्या तोडल्या
आणि
v विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा वेस्ट इंडिजबरोबर सामना
****
शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्रा अभावी थांबवले जाणार नाहीत, अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
विनोद तावडे यांनी दिली आहे. ते काल विधान परिषदेत बोलत होते.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि
विशेष मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्याना प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होण्यापूर्वी
जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचंही
तावडे यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत
दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालय निर्णय
देण्याची शक्यता आहे. या सर्व याचिका आणि त्यानंतर दाखल झालेल्या हस्तक्षेप अर्जांवर
गेल्या सहा फेब्रुवारीपासून न्यायालयानं एकत्रित
सुनावणी घेतली आहे. या प्रकरणी २६ मार्च रोजीच्या सुनावणीनंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता.
****
वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर
अन्याय होत असल्याचा दावा करत, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातल्या
आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल आंदोलन केलं.
वैद्यकीय प्रवेशाबाबत शासनाकडून राबवल्या जात असलेल्या ७०-३० आरक्षण धोरणामुळे, दरवर्षी
मराठवाड्यात सर्व संवर्गातले जवळपास पाचशे विद्यार्थी गुणवत्ता असूनही वैद्यकीय प्रवेशापासून
वंचित राहत असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. यामुळे प्रवेशाची ही पद्धत बदलावी, अशी मागणी आमदार पाटील
यांनी केली. आमदार सतीश चव्हाण, डॉ.
जयप्रकाश मुंदडा आणि डी.पी. सावंत या आंदोलनात
सहभागी झाले होते.
****
राज्यस्तरीय समितीनं मंजूर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या
ऊस तोडणी
यंत्रांचं अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल
विधान परिषदेत दिली. नांदेड
जिल्ह्यासह राज्यातल्या काही शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राच्या
अनुदानाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अमर राजूरकर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना देशमुख बोलत
होते. आतापर्यंत राज्यस्तरीय प्रकल्प समितीनं मंजूर केलेल्या शेतकऱ्यांनाच ऊस तोडणी यंत्राचं
अनुदान दिलेलं आहे. ऊर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत समितीच्या चार जुलै रोजी होणाऱ्या सभेत चर्चा होणार असल्याचं
देशमुख यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिलांच्या गर्भाशय
काढण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी
आमदार नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात
आली आहे. काल याबाबतचा शासनादेश जारी करण्यात आला. ही समिती याबाबतीत सखोल चौकशी करून येत्या दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे.
****
ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे उत्पन्न
पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनी त्यातली पाच टक्के रक्कम दिव्यांगासाठी खर्च करणं बंधनकारक असावं,
यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री प्राध्यापक राम शिंदे
यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. यासंदर्भातला प्रश्न सदस्य बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता.
****
लातूर महानगरपालिकेला वार्षिक ६० कोटी रुपयांचे
अनुदान दिलं पाहिजे अशी आग्रही मागणी आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पीय
अनुदानावरील चर्चेत केली. लातूर महानगरपालिकेला
राज्य शासनाकडून वस्तू आणि सेवा करा पोटी वार्षिक केवळ १० कोटी रुपये अनुदान दिलं जातं,
यामुळे महापालिकेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं
वेतन देण्याची कुवतही महापालिकेकडे राहिली नाही या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी ही
मागणी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर येत्या
रविवारी प्रथमच ते त्यांच्या ”मन की बात
” या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून प्रसारीत होणाऱ्या या कार्यक्रमास यापूर्वी जनतेनं मोठा प्रतिसाद दिला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबादमधून दिल्ली आणि मुंबईसाठी अधिक विमान सेवा उपलब्ध
करून देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत चर्चे दरम्यान केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष
योजना तयार केली, या योजनेचा शुभारंभ ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून
करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
जेट एअरवेज कंपनीची विमानसेवा बंद झाल्यानं औरंगाबादच्या
पर्यटन, उद्योग आणि हॉटेल व्यवसायाला
मोठा फटका बसला असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान जलील यांनी मंगळवारी नागरी
हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांची
भेट घेऊन औरंगाबाद विमानतळाचा समावेश उडान योजनेत करावा अशी मागणी केली.
****
काँग्रेसमधून बडतर्फ केलेले सिल्लोडचे आमदार
अब्दुल सत्तार यांनी काल
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. ही
सदिच्छा भेट असल्याची माहिती, आमदार सत्तार यांनी या बैठकीनंतर
दिली. आपण स्वतंत्र नेता असून कोणत्याही पक्षाच्या नेत्याची भेट
घेण्यास मुक्त आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून
काँग्रेसनं त्यांना काढून टाकलं होतं.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर नगर पालिकेचे माजी
नगराध्यक्ष आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर
निटुरे आणि त्यांचे पुत्र विजय निटुरे यांना नगर पालिकेच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरवण्यात
आलं आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी
याबाबतचे आदेश जारी केले. उदगीर इथली मोकळ्या जागेसाठी राखीव
असलेली जमीन निटुरे यांनी २०१० मध्ये खरेदी केल्याप्रकरणी भाजपाचे सदस्य सचिन हुडे
यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे, त्यांना अपात्र
ठरवण्याची मागणी केली होती, तसंच
औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल केली होती. याबाबतीत पर्यायी
यंत्रणेकडे दाद मागावी, असे निर्देश खंडपीठानं दिले होते.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं काल मुख्य जल वाहिनीवरून पाणी चोरणाऱ्या एकशेसाठ अवैध नळ जोडण्या
काढून टाकल्या. याशिवाय अवैध नळांतून पाणी घेणाऱ्या तीनशे ठिकाणांचे पाणी बंद करण्यात आले, यामध्ये हॉटेल्स,
दुकानं, मंगल कार्यालयं, लॉज आणि वॉशिंग सेंटर्सचा समावेश आहे. काल दिवसभर मनपाच्या
दोन पथकांनी शहरभरात ही कारवाई केली. या बेकायदा नळ जोडणीधारकांविरोधात
गुन्हे दाखल केले जाणार असल्याचं पालिकेच्यावतीनं सांगण्यात आलं.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा वेस्ट इंडिजबरोबर सामना होणार आहे. या स्पर्धेत
काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडचा
६ गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना
न्यूझीलंडनं जिंकण्यासाठी पाकिस्तान समोर २३८ धावांचं आव्हान
ठेवलं पाकिस्ताननं हे आव्हान चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांनी काल आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर
अर्धनग्न मोर्चा काढला. महापोर्टल
`ऑनलाईन` परीक्षा पध्दती रद्द करून जिल्हा निवड
समितीकडून `ऑफलाईन` पध्दतीनं परीक्षा घेण्यात
यावी, पोलिस उपनिरिक्षक परिक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी, पोलिस भरतीचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावं, आदी मागण्यांचं निवेदन विद्यार्थी कृती
समितीतर्फे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापनानं शाखा आणि ए टी एम साठीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सेवेतून
काढून टाकल्याच्या पार्श्वभूमीवर, बँकेच्या कर्मचारी आणि ग्राहकांच्या
सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे व्यवस्थापनाचं लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय बँक ऑफ महाराष्ट्र
कर्मचारी महासंघ, या बॅंकेच्या देशभरातल्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं करत
आहे. लातूर तसंच औरंगाबाद शहरातल्या सिडको
परीसरातल्या विभागीय कार्यालयासमोरही ऑल
इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्लॉईज फेडरेशननं निदर्शनं केली.
****
यंदाच्या खरीप हंगामात बीड जिल्ह्याला पीक कर्जासाठी
नऊशे पन्नास कोटी रुपयांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून बँकांनी जिल्ह्यातल्या
शेतकऱ्यांना कर्ज वाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी
अस्तिक कुमार पाण्डेय यांनी केलं आहे. जिल्हास्तरीय सल्लागार
समितीच्या बैठकीत काल ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment