Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९ सायंकाळी ६.००
****
‘बुके नाही तर बुक’ या आपल्या आग्रही उपक्रमाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केला. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठीच पुष्पगुच्छ
देण्याऐवजी पुस्तक देण्याची मोहीम उपयुक्त ठरत असून, अनेक ठिकाणी लोक याचं पालन करत
असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला भेट मिळालेल्या प्रेमचंद यांच्या कथांमधील उद्बोधक
प्रसंग सांगत, त्यांनी केरळमधल्या इडुक्कीच्या घनदाट जंगलामध्ये
वसलेल्या अक्षरा ग्रंथालया विषयी, तसंच गुजरातमध्ये
यशस्वी ठरलेल्या ‘वांचे गुजरात’ या मोहिमेबद्दल त्यांनी
सविस्तर माहिती दिली.
****
पंतप्रधान स्वत: नागरिकांसोबत प्रत्यक्ष
संवाद साधतात, असा मन की
बात, हा जगातला पहिला प्रयोग आहे, असं केंद्रीय माहिती
आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे इथल्या आनंदनगर
सोसायटीच्या लोकांसोबत मन की बात ऐकल्यानंतर आकाशवाणीशी बोलत होते. पंतप्रधानांनी
केलेल्या जल संरक्षण अभियानाच्या आवाहनाला देखील नागरीक स्वच्छता अभियानासारखा सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास देखील
त्यांनी व्यक्त केला.
****
२०११ च्या जणगणनेनुसार देशात विधवांची संख्या चार
कोटी ३२ लाख ६१ हजारापेक्षा जास्त आहे. यात महाराष्ट्रात सुमारे ४५ लाख, उत्तर प्रदेशात
सर्वाधिक ४९ लाख, तर आंध्र प्रदेशात सुमारे ४३ लाख विधवा असल्याची माहिती, केंद्रीय
महिला तथा बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.
विधवांच्या सर्वसाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी विभिन्न
केंद्र मंत्रालयांकडून अनेक नवीन योजना राबवल्या जाणार आहेत, त्यात स्वाधार गृह योजना,
महिला शक्ती केंद्र योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनांचा समावेश
असल्याचं त्या म्हणाल्या.
****
पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन
थेट ऑनलाईन दाखवण्याचे अधिकार मंदिर समितीने जिओ आणि टाटा स्काय कंपनीला देण्याचा निर्णय
घेतला असल्याची माहिती, माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. आजारी, दिव्यांग
तसेच कामाच्या धावपळीत ज्यांना पंढरपूरला येणे शक्य नाही, असे अनेक लोक आता ऑनलाईन
दर्शन घेऊ शकतात, या माध्यमातून मंदिर समितीला ५० ते ६० लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचं
आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
राज्यातल्या वीज निर्मिती, विजेचं वहन, विजेचे दर,
ग्राहकांना दिली जाणारी सवलत याबाबत सविस्तर माहिती देऊन येत्या काही वर्षात वीज पुरवठ्या
संदर्भातल्या सर्व समस्या निश्चित मार्गी लागतील, असा विश्वास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी शुक्रवारी वसई इथं बोलतांना व्यक्त केला. सौभाग्य योजनेत १२ कोटी रुपये
खर्च करून पालघर जिल्ह्यात वीजपुरवठ्याचं प्रमाण वाढवल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जालना जिल्ह्यात एक कोटी पाच लाख ६७ हजार ४५० वृक्षांची
लागवड करण्यात येणार आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तीन हजार ९७८ ठिकाणी
राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी वन विभागाकडे सव्वा कोटींहून अधिक रोपे तयार आहेत.
जिल्ह्यातल्या ७७९ ग्रामपंचायतींना २५ लाख रोपांचं वाटप केलं जाणार आहे. शासकीय संस्थांबरोबरच
जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्था, उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत
सहभाग घ्यावा, असं आवाहन वन विभागानं केलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपुर तालुक्यात अंगावर
वीज पडल्यामुळे २ जण ठार, तर २ जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. वरवट खंडेराव येथील
शेतकरी श्रीकृष्ण कांशिराम ढमा, तसंच संग्रामपूरच्या जस्तगाव येथील युवराज विश्वास
गव्हांदे अशी मृतांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आयसीसी
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यानचा
सामना आज इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु झाला.
इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा
इंग्लंडनं ३६ षटकांत, तीन बाद २१३ धावा केल्या होत्या.
*****
***
No comments:
Post a Comment