Monday, 24 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.06.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****
** निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” हे अभियान महत्त्वपूर्ण - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन 
** काँग्रेसच्या नेत्यांना पळवून त्यांना मंत्री करणं हा भ्रष्टाचार - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
** मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी, समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबतचा आराखडा सहा महिन्यात पूर्ण होणार
** बुलडाणा जिल्ह्यातल्या रस्ता अपघातात औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू
आणि
** महिलांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य
****

निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” हे अभियान महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे विद्यापीठात काल या अभियानाच्या महासंकल्पाचं उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. एकाच वेळी मोठ्या संख्येनं कडूलिंबाची रोपं लावणं आणि त्यांचं संवर्धन करण्याच्या विक्रमाची `गिनिज बुक`मध्ये नोंद होत असल्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या अभियानात सहभागी झालेले सर्व जण इतिहास बनले असून, हा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवला गेल्यानं, देशाचं नाव जगाच्या नकाशावर पोहोचलं, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
****
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना पुढच्या महिन्यापर्यंत याचा लाभ मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पुणे पत्रकार संघाचा आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या “स्मृतिचित्रे” या स्मरणिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते. म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून पुण्यातल्या पत्रकारांसाठी घरं उपलब्ध करून देणार असून, पुणे प्रेस क्लबला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असं शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या वतीनं काल अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद आणि बियाणं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, चुकीच्या व्यवस्थेमुळे बळीराजाचा बळी जाता कामा नये, असं ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं.
****
काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विदर्भातले नामांकित शिक्षण संस्थाचालक असलेले चतुर्वेदी, काल मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं.
****
काँग्रेस पक्षाचे नेते पळवून नेणं आणि त्यांना मंत्री करणं हा भ्रष्टाचार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणं हा गैरप्रकार असून या दोघांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करायची किंवा नाही याबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.
****
मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी, समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबत राज्य सरकार आराखडा तयार करत आहे. रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री जयदत क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात काडी वडगावला भेट दिल्यानंतर इटा इथं ते पत्रकारांशी बोलत होते. हा आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. वाहून जाणारं पाणी गोदावरी सिंदफणा नदीच्या खोऱ्यात आणणं, या आराखड्यात प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले.
फलोत्पादन क्षेत्रातही आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यात चारा छावण्या, टँकरद्वारे पाणीपुरवठा, या माध्यमातून दुष्काळ निवारणाचं कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं, क्षीरसागर यांनी सांगितलं. माजलगाव बॅक वॉटर योजनेचीही क्षीरसागर यांनी यावेळी पाहणी केली.
****
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वकील संजीव पुनाळेकरला पुण्यातील एका न्यायालयानं सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुनाळेकरला २३ जूनपर्यंत गुन्हे अन्वेषण विभागाची कोठडी सुनावण्यात आली होती, यापुढे त्याच्या कोठडीची गरज नसल्याचं, गुन्हे अन्वेषण विभागानं काल नमुद केल्यानंतर विशेष न्यायालयानं त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
नागपूर-औरंगाबाद मार्गावर, बुलडाणा जिल्ह्यात काल एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. वाशिमहून औरंगाबादकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाला, मेहकरजवळ अंजनी बुद्रूक फाट्यावर एका कंटेनरनं धडक दिल्यानं, हा अपघात झाला. मृतांमध्ये औरंगाबादचे मनोहर क्षीरसागर, त्यांच्या पत्नी नलिनी क्षीरसागर आणि मुलगी मेघा क्षीरसागर तसंच चालक सुगदेव नागरे यांचा समावेश आहे.
****
जपानमध्ये हिरोशिमा इथं झालेल्या महिलांचा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात, भारतीय संघानं, यजमान जपान संघाचा तीन - एक असा पराभव करत स्पर्धेचा चषक पटकावला. भारताची कर्णधार राणी रामपाल हिला मालिकावीर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला सामन्यादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून सामना मानधनातून २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. अफगाणिस्तानचा फलंदाज पायचीत झाल्याचा दावा पंचांकडे करताना, विराटचे हावभाव अधिक आक्रमक असल्याचं, सामनाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. विराटने ही बाब मान्य केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा एकोणपन्नास धावांनी पराभव केला. पाकिस्ताननं दिलेलं तीनशे नऊ धावांचं आव्हान गाठताना, दक्षिण आफ्रिका संघाला पन्नास षटकांत नऊ गडी गमावत, दोनशे एकोणसाठ धावाच करता आल्या. या विजयामुळे पाकिस्तान संघ पाच गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका संघाचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या मानवत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी काल सरासरी ५९ टक्के मतदान झालं. शिवसेना भाजपा युतीचे प्राध्यापक सखाहरी पाटील, कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पुजा खरात आणि अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांच्यात ही लढत झाली. परभणी महापालिकेच्या दोन प्रभागांसाठीही काल पोटनिवडणूक झाली.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात येळेगाव जिल्हा परिषद गट, औंढा नागनाथ पंचायत समिती गण आणि हिंगोली नगर परिषदेच्या एका प्रभागासाठी पोटनिवडणुकीचं मतदान झालं. या सर्व ठिकाणी आज मतमोजणी करुन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
औरंगाबाद इथं काल ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०१९’ या विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महात्मा गांधी मिशन आणि शिक्षण मंचातर्फे आयोजित या परिषदेत, राष्ट्रीय शिक्षण धोरणासह, विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली
****
नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातल्या मानसपुरी इथं काल ग्राम स्वच्छतेसह वृक्षारोपण करुन  जगतुंग तलावातला गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. राज्य खादी ग्रामोद्योगसह नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती तर्फे याचं आयोजन करण्यात आलं.
****
सध्या जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याची गरज राष्ट्रीय युवा योजनेचे संचालक गांधीवादी कार्यकर्ते डॉ एस एन सुब्बाराव यांनी व्यक्त केली आहे. काल लातूर इथं, गांधीवादी कार्यकर्ते डॉ सोमनाथ रोडे यांच्या अमृत महोत्सवी समारंभात ते बोलत होते. महात्मा गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर आयोजित विचार मंथनाचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी केलं. गांधी विचारांच्या अभ्यासक कार्यकर्त्यानी या विषयावर आपली मतं मांडली.
****
नैऋत्य मोसमी पावसानं, मराठवाड्याच्या बहुतेक भागासह विदर्भात आगेकूच केली आहे. राज्याच्या उर्वरित भागात, येत्या दोन दिवसात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मराठवाड्यात कालही अनेक भागात पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग अचलेर, आष्टा कासार इथं जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, वैजापूर तालुक्यात काल पावसानं हजेरी लावली. खुलताबाद - फुलंब्री मार्गावर नदीला पूर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. 
****
औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच्या जलवाहिनीचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येईल असं उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. सावे यांची उद्योग राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल औरंगाबाद इथं काल त्यांचा औद्योगिक संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
****

No comments: