Friday, 21 June 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 21.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०१९ दुपारी .०० वा.
****
गेल्या पाच वर्षात सरकारनं योग आणि आरोग्य यांची सांगड घातली असून, योग हा आरोग्य सुविधेचा आधारस्तंभ बनवला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज रांची इथं चाळीस हजार योग प्रेमींबरोबर योग अभ्यास केला. त्यावेळी ते बोलत होते.  योग शहरांपासून खेड्या-पाड्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहनही  मोदी यांनी यावेळी केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीभवनात योग अभ्यास केला. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिकवणाऱ्या विविध संस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकं केली. नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली. सुमारे दोन लाख योगप्रेमींनी यात भाग घेतला. औरंगाबादमध्ये योग दिनाचा मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुलात झाला. जागतिक योग दिनानिमित्त जालना शहरातून जनजागृती  रॅली काढण्यात आली.  हिंगोली, नाशिक, धुळे, अहमदनगर, अकोला, वाशीम, नागपूर, यवतमाळ, अमरावती, सातारा इथंही योग दिन उत्साहात साजरा झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. 
***
राज्य सरकारनं गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस उप अधिक्षकाला निलंबित केलं आहे. गेल्या एक मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा पोलिस शहीद झाले होते. पोलिस उपाधिक्षक शैलेश काळे यांनी त्यावेळी योग्य नियमांचं पालन न केल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी एका लक्ष्यवेधीद्वारे नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला गृहराज्यमंत्री उत्तर देत होते.
***
महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधे मराठी भाषा हा विषय अनिवार्य करणारा कायदा राज्य सरकार करणार आहे. ICSE आणि सीबीएसई मंडळाच्या शाळांनाही ही सक्ती लागू असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. आधीपासून कायदा असूनही काही शाळांमधे मराठी हा विषय शिकवला जात नसल्याचं निदर्शनाला आलं आहे. अशा शाळांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा अधिक कडक केला जाईल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
***
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण लागू करण्याचं विधेयक, विधान सभेत काल एकमतानं मंजूर करण्यात आलं. मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षण लागू केल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी,या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं.सर्वोच्च न्यायालयानंही या संदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात  निकाल दिला होता. राज्यशासनानं त्यानंतर अध्यादेश काढून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू केलं होतं. या अध्यादेशाचं विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं.
***
तीन तलाक उच्चारुन घटस्फोट देण्याच्या पद्धत बंद करण्यासाठी मुस्लीम महिला विवाह संरक्षण २०१९ हे नवं विधेयक आज लोकसभेत मांडलं जात असून त्यावर चर्चा सुरू आहे. सोळाव्या लोकसभेच्या कार्यकाळादरम्यान फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारनं या विधेयकाची अधिसूचना काढली होती. मात्र लोकसभा भंग झाल्यानं ही अधिसूचना आता रद्द झाली आहे. त्यामुळं या अधिसुचनेच्याच मसुद्याचं नवं विधेयक लोकसभेत मांडलं जात आहे.
***
सातारा जिल्यातील नेहमीच दुष्काळ असलेल्या खटाव तालुक्याच्या पूर्व भागात काल उशिरा तब्बल एक तास मुसळधार पाउस झाल असून नवीन जलसंधारणाची कामं बऱ्याच अंशी पाण्यानं भरली आहेत. पावसामुळं या गावांमधील नदी-नाले गच्च भरून वाहताना दिसत आहेत तर नव्यानच झालेली पाणी फाउंडेशनची कामं काही ठिकाणी वाहून गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
उस्मानाबाद शहरातल्या प्रभाग क्रमांक सहामधल्या नागरिकांना टँकरद्वारे दररोज दोन वेळा पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती बांधकाम सभापती नगरसेवक शिवाजी गवळी यांनी दिली आहे. गवळी यांच्या पुढाकारानं काल या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
एसटीच्या एकाहत्तर वर्षांच्या वाटचालीची ओळख करून देणारं ‘वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची’ हे फिरतं प्रदर्शन काल रत्नागिरीत आयोजित करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या पन्नास ठिकाणांचा दौरा करणार आहे. गेल्या बारा वर्षांपासून हे फिरतं प्रदर्शन सुरू असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. 
************




No comments: