Thursday, 27 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घटनाबाह्य नाही, मात्र हे आरक्षण १६ टक्क्यांऐवजी १२ ते १३ टक्के असायला हवं, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल विविध याचिकांवर आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय सुनावला.
गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला राज्य विधिमंडळानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र हे आरक्षण सरसकट सोळा टक्के न देता, राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण द्यावं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी स्थगिती द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाला या निर्णयाबाबत माहिती देऊन, मराठा आरक्षण देण्याच्या या प्रक्रियेत सहकार्य करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, या निर्णयाबाबत अभिनंदन करताना, इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षण दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एमआयएमचे वारीस पठाण, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, काँग्रेसचे आरेफ नसीम खान, यांनी मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षण लागू करण्याची मागणी केली.
देशात धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला दिलेलं दहा टक्के आरक्षण, मुस्लीम समाजालाही लागू आहे, मुस्लीम समाजातल्या विद्यार्थ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतला असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी उदाहरणासह सांगितलं.
****
पूर्णत: प्लास्टिक बंदीची शासनाची भूमिका असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभु यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. दुधाच्या पिशवीच्या पुनर्वापरासंदर्भात कार्यवाही एका महिन्यात सुरू होणार असून यामुळे दररोजच्या ३१ टन कचऱ्यावर बंदी येणार असल्याची माहिती कदम यांनी दिली.
****
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतले रस्ते दुरुस्त करण्यासाठीचा ठराव प्राप्त झाल्यास, तो सार्वजनिक बांधकाम खात्यास पाठवण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. अशा रस्त्यांच्या अद्ययावतीकरणाचा प्रस्ताव दिल्यास शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं नुकत्याच घोषित केलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९ वर आज औरंगाबाद इथल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आलं. गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.सर्जेराव ठोंबरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज विकासाचं स्वप्न प्रत्यक्ष व्यवहारात आणणारा हा मसुदा असल्याचं मत, ठोंबरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरूवात केली आहे. ७५ मिली मीटर इतका पाऊस पेरणीस योग्य असल्याचं सांगण्यात आलं होतं, काही भागात तेवढा पाऊस झाला नसला तरी, झालेला पाऊस पेरणी योग्य असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बी एस रणदिवे यांनी दिली.
****
बुलडाणा जिल्ह्यात आज जोरदार पाऊस झाला, शेगाव खामगाव मार्गावर लासूरा नदीला पूर आल्यानं वळण रस्त्यावरचा भराव वाहून गेला, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली आहे, पूर्णा नदीलाही पूर आला असून, अनेकांच्या शेतात पाणी साचलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात येत्या एक जुलैपासून वृक्ष लागवड मोहीम सुरु करण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केलं आहे.
****
लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी आज लोकसभेत, लातूरची पाणी टंचाई आणि उपाय याची माहिती देत, राष्ट्रीय पेय जल योजनेतून कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची मागणी केली. या संदर्भात श्रृंगारे यांनी, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन, निवेदनही दिलं आहे.
****
क्रिकेट
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारतानं, एकोणचाळीसाव्या षटकांत पाच बाद १८० धावा केल्या आहेत. विराट कोहली ७२ धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा महेंद्रसिंह धोनी १७ धावांवर तर हार्दिक पंड्या चार धावांवर खेळत होता.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...