Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø अकरावीच्या आरक्षित जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवर्ग बदलण्याची
मुभा
Ø मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद करावी
- अजित पवार यांची मागणी
Ø मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट
दाखल
आणि
Ø राज्यात पावसाशी
निगडित घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू; मराठवाड्यात अनेक
भागात पाऊस
****
राज्यात अकरावी प्रवेशासाठी अधिकांश विद्यार्थ्यांनी
सामान्य प्रवर्गातून अर्ज भरले असून, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातल्या
अनेक आरक्षित जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना
प्रवेश अर्जातून प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली.
ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र
नसेल, त्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवेश देण्यात येईल तसंच
ही प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी तीन महिने मुदत देण्यात आल्याची माहिती शेलार यांनी
दिली. राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी राखीव
कोट्यातून फक्त १३ टक्के तर आर्थिक दुर्बल घटकातून फक्त ९ टक्के विद्यार्थ्यांनी अर्ज
केले आहेत. औरंगाबाद विभागातून हे प्रमाण अनुक्रमे १५ आणि सुमारे
अकरा टक्के एवढं आहे.
भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम- आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
अर्जाच्या भाग एक आणि दोनमध्ये सुधारणांसाठी एक जुलैपर्यंत मुदत दिली असल्याची माहितीही
शेलार यांनी दिली.
दरम्यान, पुढील पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व
शाळांसाठी सौर ऊर्जा सयंत्र बसवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल, असं शेलार यांनी
काल विधानसभेत सांगितलं. यावर्षी जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दुरुस्तीसह अन्य भौतिक
सुविधांसाठी ४०० कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी दिली.
****
मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तेरा
हजारावर तरुणांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
यांनी काल विधानसभेत केली. आंदोलनादरम्यान मृतांच्या कुटुंबियांना नोकरी आणि दहा
लाख रुपये मदत जाहीर झाली होती ती तात्काळ मिळावी, असंही वडेट्टीवार म्हणाले. याबाबत महसूल मंत्री चंद्रकात
पाटील यांनी, गुन्हे मागे घेण्याची प्रकिया सुरू असून,
नोकरी आणि दहा लाख रुपये मदतीबाबतचा लवकरच माहिती देण्यात येईल असं सदनाला
सांगितलं.
****
मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची
तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. यावर,
राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्याकरता मुंबई
शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात असा एक कक्ष स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिली.
****
अनाथांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक
आहे, असं महिला आणि बालविकास
मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. काल विधानसभेत बच्चू
कडू यांनी राज्यातल्या अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लक्षवेधी
सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
या मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता
अभियानांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
खटले सुरू असणाऱ्या आणि दोषी ठरलेल्या व्यक्तींची
वाढती संख्या लक्षात घेत राज्यात तीन नवीन तुरुंग उभारण्यात येणार असल्याची माहिती
गृहराज्य मंत्री रणजीत पाटील यांनी काल विधानसभेत दिली. यवतमाळ, गोंदिया
आणि अहमदनगर इथे हे तुरुंग उभारले जाणार आहेत.
औद्योगिक
वसाहतीसाठी भूसंपादन करतांना संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासाठी, वाटाघाटीनं
दर ठरवण्याची आणि संमतीशिवाय भूसंपादन न करण्याची तरतूद असलेलं विधेयक काल विधानसभेत
मंजूर झालं.
दुष्काळी भागातल्या चारा छावण्या १ ऑगस्टपर्यंतच
सुरू ठेवणं आणि टँकरनं पाणी पुरवठ्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झाला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
राज्यातले अडीच कोटी, सात बारा उतारे संगणकीकृत झाले
असून त्यापैकी ८० लाख उताऱ्यांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झाल्याचंही त्यांनी यावेळी
दिली.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या ऐतिहासिक लोणार सरोवराच्या समस्यांबाबत स्थानिक
आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं वनमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत सांगितलं. वन्य प्राण्यांमुळे
शेतीच्या नुकसानाची भरपाई १५ दिवसांत नाही मिळली तर ती व्याजासह दिली जाईल, असं मुनगंटीवार यांनी काल
विधानसभेत सांगितलं.
****
दूध भेसळी विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना अन्न
आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. दूध भेसळीला सहकार्य करणार्या अधिकारी
आणि कर्मचार्यांविरूद्ध कारवाई केली जाईल, असं त्यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं. राज्यात्या
दूध स्थीतीबाबत अन्न प्रशासन विभागाच्या अधिकार्यांबरोबर विधानभवनातल्या दालनात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
मराठा आरक्षणासाठी
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी काल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण
वैध ठरवल्यानंतर, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं
जाण्याची शक्यता असल्यानं कॅव्हिएट दाखल केल्याचं पाटील यांनी सांगितलं. यामुळे, आता मराठा आरक्षणाविरोधात कोणीही सर्वोच्च न्यायालयात
दाद मागितली, तरी न्यायालय आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकेल.
****
मुंबई स्टॉक एक्सचेंजनं हळद व्यापारात उतरण्याचा
निर्णय घेतल्यानंतर, या एक्सचेंजमार्फतच्या
हळद व्यापाराला काल सांगली इथून सुरुवात करण्यात आली. देशातले
चार कोटी ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात आता सहभागी होऊ शकतील.
****
राज्यात पावसाशी निगडित घटनांमध्ये वीस जणांचा मृत्यू झाला. पुण्यात एका गृहनिर्माण संस्थेची
संरक्षक भिंत कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. मुंबईत
पावसाशी संबंधित अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले, नांदेड
जिल्ह्यात उमरी इथं एका महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू
झाला. दरम्यान, नांदेडसह जालना तसंच उस्मानाबाद
जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी
वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही
काल दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या कोसदनी घाटात रस्ता वाहून
गेल्यानं नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग बंद झाल्याचं वृत्त आहे. काल पहाटेच्या सुमारास उमरखेड तालुक्यात
मुसळधार पाऊस झाल्यानंतर कोसदनी घाटातला नाला दुथडी भरून वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या
धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात होत आहे. शून्य टक्के पाणी साठा असलेल्या
भंडरदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं, नागरिकांमधून समाधान व्यक्त
होत आहे.
****
खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यात आतापर्यंत राष्ट्रीयीकृत
बँका तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून चोवीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांना
एकशे अट्ठावन्न कोटी साठ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याला एक हजार पन्नास कोटी रुपये
पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज
वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
****
निराधारांना महिन्याला तीन हजार
रुपये मानधन द्यावं या आणि अन्य मागण्यांसाठी निराधार संघर्ष समितीच्यावतीनं काल लातूर
जिल्ह्यातल्या औसा इथं मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून निराधार तसंच दिव्यांग मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते.
निराधारांसाठी दारिद्र्य रेषेची अट रद्द करावी, अपंगत्वासाठीचं वैद्यकीय प्रमाणपत्र तालुकास्तरावर देण्यात यावं या प्रमुख
मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड, सोयगाव तालुक्यातल्या
सिंचन प्रकल्पांची कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष
डॉ. भागवत कराड यांनी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाला दिल्या
आहेत. काल औरंगाबाद इथं फुलंब्री तालुक्यातल्या सांजूळ लघु तलाव
तसंच कन्नड तालुक्यातल्या प्रस्तावित नेवपूर आणि जामडी धरणासह विविध कामांचा
आढावा कराड यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांनी पाणी वापराचं योग्य नियोजन करावं, असं
आवाहन कराड यांनी केलं आहे.
****
झारखंडमध्ये जमावाच्या
मारहाणीत एका इसमाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ काल मराठवाड्यात ठिकठिकाणी
निषेध करण्यात आला. औरंगाबाद, परभणी, हिंगोली इथं
नागरिकांनी मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन सादर केलं.
****
परभणी शहरात अनेक ठिकाणची अतिक्रमणं हटवण्यात
आली आहेत. स्वछता मोहिमेअंतर्गत नाल्यांवरची अतिक्रमणं काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त
रमेश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघानं
काल श्रीलंकेचा नऊ गडी राखू न पराभव केला. श्रीलंकेनं दिलेलं दोनशे चार धावांचं आव्हान
दक्षिण आफ्रिकेनं सदतिसाव्या षटकांत एक गडी गमावून पार केलं.
दरम्यान, या स्पर्धेत आज
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड असे दोन सामने होणार
असून, उद्या भारत आणि यजमान इंग्लंड संघात सामना होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment