Wednesday, 26 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन धोरणात्मक भागिदारीच्या विविध विषयांवर चर्चा केली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकरही आज अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दहशतवाद, एच-वन-बी व्हिजा, व्यापार आणि इराणकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेची संमती आदी मुद्दांवर यावेळी चर्चा अपेक्षित आहे. पॉम्पीओ हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर असून भारत अमेरिका संबंधांसाठी त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण आहे.
****

 जम्मु काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी आज मारला गेला आहे. पुलवामा जिल्ह्यातल्या ब्रानपत्री जंगलातल्या त्राल या भागात दहशवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यावरून तिथं शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी सुरू झालेली चकमक अद्याप सुरू असल्याचं सुरक्षा दलातील सुत्रांनी म्हटलं आहे. 
****

 समाज माध्यमांवर दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि शिवराळ भाषा चिंतेचा विषय असून या संदर्भातील कायद्यातली अस्पष्टता दूर करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्य सरकारवर समाजमाध्यमांतून व्यंगात्मक टीका केल्यानंतर त्यांना ऑनलाईन धमकी मिळाली आणि शिवराळ भाषेचा सामना करावा लागला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री काल मुंबईत बोलत होते. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला या धमकीची चौकशी करण्याचे आदेश आपण देणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****

 औरंगाबाद, सिंधुदूर्ग, नागपूर,  मुंबई,  शिर्डी या प्रमुख पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी `टूरीझम पोलिस` ही पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुरक्षा पुरवणारी संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. जागतिक व्यापार केंद्रातंर्फे काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  मुरुड इथं तेराशे एकरवर पर्यावरणपूरक पर्यटक केंद्रांचा विकास करण्यात येणार असून त्यातून वैद्यकीय पर्यटनास चालना मिळणार असल्याची माहितीही रावल यांनी यावेळी दिली.

पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक आणि परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी यंदाच्या वर्षी शंभर कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. विविध धरणांच्या ठिकाणीही पर्यटकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी खासगी सहभाग घेण्यात येणार असल्याचं पर्यटनमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 
****

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय दिन म्हणून ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं समाजकल्याण विभाग आणि जय विश्वकर्मा सर्वेादय संस्था व्यसन मुक्ती केंद्रातर्फे छत्रपती शाहू महाराज आणि अतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिना निमित्त समता दिंडी आणि व्यसनमुक्ती फेरी काढण्यात आली. लातूर इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं शहरातून फेरी काढण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. जळगाव इथं जिल्हाधिकारी कार्यालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत.
****  

 पैठण इथल्या श्री संत एकनाथ महाराज यांच्या पंढरपूर पालखी सोहळ्याचा तिसरा मुक्काम आज बीड जिल्ह्यात शिरूर कासार तालुक्यातल्या कुंडलपारगाव इथं होणार आहे. पालखीचा दुसरा मुक्काम काल अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात हादगाव इथं झाला. गावकऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचं स्वागत केलं.
****

 शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीर पणे उभी राहिली आणि यापुढही उभी राहणार आहे, असं शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. काल अंबाजोगाई इथं, शेतकरी मदत केंद्रास भेट दिल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना, त्यांनी ही भूमिका व्यक्त केली. शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देत, दिलासा देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं खैरे यांनी सांगितलं. वेळ पडली तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचबीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यावेळी म्हणाले.
****

 अमरावती जिल्ह्यातल्या तीन लाख ७३ हजार नागरिकांना आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे `प्रधानमंत्री जनआरोग्य` योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना वार्षीक पाच लाख रूपयांपर्यंत शस्त्रक्रिया आणि औषध उपचार मान्याताप्राप्त खासगी आणि शासकिय रूग्णालयात मार्फत उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्याला स्वतःचं ओळखपत्र तयार करावं लागणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: