Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 June 2019
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०१९ दुपारी १.०० वा.
****
जम्मू-काश्मीरच्या शोपीयान जिल्ह्यातल्या डारमडोरा भागात
आज सकाळी सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केलं. सुरक्षा दलांनी या भागाला घेराव
घालून शोध मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या
चकमकीत हे चार दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत,
त्यांची नावं काय आहेत, याची माहिती मिळवली जात असल्याचं सुरक्षा सुत्रांनी म्हटलं
आहे.
****
आर्थिक धोरणं आणि विकासाचा मार्ग या विषयावर निती आयोगानं
आयोजित केलेल्या बैठकीत देशातल्या अर्थतज्ञांनी केलेल्या महत्त्वाच्या आणि दूरदृष्टीपूर्ण
सूचनांचा देशाच्या विकासाला फायदा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
व्यक्त केला आहे. अर्थतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांशी अर्थव्यवस्था आणि रोजगार, कृषी आणि
जलसंपदा, निर्यात, शिक्षण आणि आरोग्य या विषयांवर झालेली चर्चा फलदायी होती, असं मोदी
यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीला चाळीसहून अधिक अर्थतज्ञ
आणि इतर क्षेत्रातल्या तज्ञांशी पंतप्रधानांनी संवाद साधला, अर्थव्यवस्थेच्या विविध
पैलूंबाबत तज्ज्ञांच्या सूचना आणि निरीक्षणांबाबत त्यांचं आभारही मानलं. अर्थव्यवस्था,
रोजगार, कृषी, जलसंपदा, निर्यात, शिक्षण आणि
आरोग्य या पाच प्रमुख विषयांवर तज्ञांनी आपली मतं मांडली.
****
मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यासह काही भागात मोसमी
पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सिल्लोड, पैठण, गंगापूर, कन्नड
परिसरातही काल रात्री आणि आज सकाळी पाऊस झाला. खुलताबाद - फुलंब्री रस्त्यालगतच्या
नदीला पूर आल्यामूळं वाहतूकीची कोंडी झाली आहे. जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस
झाला. अंबड, भोकरदन, परतूर, जालना, घनसावंगी तालुक्यात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. या
पावसामुळं अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडीत झाला असल्याचं वृत्त आहे.
****
भाजप राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये
रथयात्रा काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत
काल भाजप पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत, त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीनं
कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन केलं. `पुन्हा एकदा शिवशाही सरकार` आणि `आता लक्ष्य
२२० पेक्षा अधिक जागा` अशी घोषवाक्यं घेऊन ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात निघेल, आणि राज्यातल्या
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाईल, अशी माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात
प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.
****
अमरावती जिल्ह्यातील तीन लाख त्र्याहत्तर हजार नागरिकांना
आयुष्यमान भारत कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत
लाभार्थी कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयापर्यंत वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रीया
मान्यताप्राप्त खासगी आणि शासकीय रुग्णालयांत मोफत उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अमरावतीच्या
जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड जिल्हयातील सुमारे चौदा टक्के जलस्त्रोत दूषित असल्याची
माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि भूजल सर्वेक्षण आ्रणि विकास यंत्रणा यांच्या सर्वेक्षणातून
समोर आली आहे. जिल्हयातील तब्बल १०९ गावं दूषित पाणी पित असल्यानं साथीचे आजार पसरण्याची
शक्यता वर्तविली जात आहे. पनवेल आणि श्रीवर्धन तालुक्यात सर्वात जास्त दूषित पाण्याचं
प्रमाण असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
अनुसूचित क्षेत्र पंचायत विस्तार कायदा - पेसा अंतर्गत
अमरावती जिल्ह्यातल्या, मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील आदिवासींना मुख्य
प्रवाहात आणण्यासाठी चार कोटी अकरा लाखाहून अधिक रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षासाठी
देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस आहे. जगभरातल्या खेळाडूंना
लिंग, वय आणि खेळातलं कौशल्य याबाबत कोणताही भेदभाव न करता, त्यांच्या विविध खेळांमधल्या
सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस केवळ खेळांपुरता
मर्यादित नसून संपूर्ण विश्वात खेळात निष्पक्षता, एकता आणि सन्मानाच्या भावनेला वाढवण्यासाठी
आंतरराष्ट्रीय स्तरावर या दिवशी प्रयत्न केले जातात.
****
No comments:
Post a Comment