Tuesday, 25 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनानं पुरेशा उपाययोजना केल्या असून जिल्हास्तरावरुन टंचाई निवारण कक्ष सुरु केले असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल विधानसभेत दिली. त्रेचाळीस हजार गावं – वाड्यांसाठी एक हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा विभागात तीन हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 राज्यातल्या चार धरणांपासून सौर उर्जा निर्माण करण्यासाठी तरंगती सौरयंत्रं बसवण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली.  वर्धा, बेंबाला, खडकपुर्णा, आणि कंटाकळी या चार धरणांना यात निवडण्यात आलं असून, यासाठी पाचशे मेगावॅट क्षमतेचे पॅनल लावण्यात येणार असल्याचं  त्यांनी नमुद केलं. यासाठी विदर्भ सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून ही समिती योजनेचा सविस्तर अहवाल तयार करत आहे. महाराष्ट्र पायाभुत विकास प्राधिकरणामार्फत याला परवानगी मिळाली असून ही यंत्रे बसवण्याचं काम प्रगती पथावर असल्याचं गिरीष महाजन यांनी म्हटलं आहे.
****

 नवीन चारा येईपर्यंत सुरु असलेल्या जनावरांच्या चारा छावण्या चालू ठेवणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल माहिती दिली आहे.  चारा छावण्यांना ४७२ कोटी रुपयांची मदत वितरीत झाली असून जवळपास एक हजार ६०० छावण्या सुरु आहेत. त्यात दहा लाख ७२ हजार ५३४ पशुधन असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या थकीत वीज देयकापोटी एकही वीज जोडणी खंडीत केली नसल्याची माहिती काल विधानसभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे तीस हजार १९८ कोटींची थकबाकी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 खेळाडूंना नोकरीत सवलत मिळावी यासाठी राज्य लोकसेवा आयोगामार्फत पाच टक्के आरक्षण लागू आहे मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिली. विधानसभेत सदस्य संजय केळकर यांनी खेळाडूंच्या नोकरीतील आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
****

 बीड, जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्यानं गोदावरी पात्रात अधिकृत निविदा देण्यात आलेली नाही. अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं गेवराई तालुक्यातल्या   आगरनांदूर, संगम जळगाव, हिंगणगाव, रेवकी देवकी, पांगुळगाव, कटचिंचोली, भोगलगाव, राहेरी, गंगावाडी, रजापूर, बोरगाव बुद्रुक, गुंतेगाव, पाथरवाला बुद्रुक. गुळज, सुरळेगाव, मालेगाव बुद्रुक, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव, खामगाव गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.
****

 रायगड जिल्हयातल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले, यात तीन भाजप, तीन शिवसेना तर दोन ग्रामपंचायती शेकापनं जिंकल्या आहेत. आठ पैकी सहा ग्रामपंचायती जिंकून युतीने आपले वर्चस्व दाखवून दिले आहेत.
****

 रायगड जिल्हयातल्या पाताळगंगा नदीत बुडून दोन बहिणींचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. त्या खेळण्यासाठी पाताळगंगा नदीकडे गेल्या होत्या, पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या दोघी पाण्यात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट इथं २०१८- १९ या वर्षात ४०९ बालमृत्यु आणि चौदा मातामृत्यु झाले आहेत, तर मागील चार वर्षात एक हजार दोनशे ७७ बालमृत्यु झाले आहेत, मेळघाटच्या आरोग्याची स्थिती गंभीर असंल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 अमरावती जिल्ह्यात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जिल्ह्यातील दोन हजार नऊशे ५९  प्रकरणं प्रलंबित असून, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थांना प्रवेशासाठी अ़डचणी येत आहेत. या पडताळणी समितीला पुर्णवेळ अध्यक्ष नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील शाळा उद्यापासून सुरू होत असून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागानं घेतला असल्याची माहिती आणच्या वार्ताहरानं दिली आहे.  
*****
***

No comments: