Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्याची जनतेची भावना
अभिनंदनीय-पंतप्रधानांचं प्रतिपादन
v सर्वंकष आरोग्य निर्देशांकात महाराष्ट्र देशभरातून तिसऱ्या क्रमांकावर
v ब्रम्हगव्हाण उपसा
सिंचन योजनेची प्रलंबित कामं मार्च २०२० पर्यंत होणार
पूर्ण
आणि
v आज
सामाजिक न्याय दिन; राजर्षी
शाहू महाराजांना अभिवादनपर
विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा
जनतेची भावना अभिनंदनीय असून, यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून ही बाब स्पष्ट झाल्याचं,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल लोकसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील
चर्चेला उत्तर देत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं दिशा आणि गती कायम ठेवून
विकासाच्या मार्गावर आगेकूच सुरू ठेवली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आपला देश
सशक्त, सुरक्षित, विकसित आणि सर्वसमावेशक व्हावा, यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाला
एकत्र येऊन काम करावं लागेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
सर्वंकष आरोग्य निर्देशांकात ६३ पूर्णांक ९९ शतांश
गुण मिळवून महाराष्ट्रानं देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. नीति आयोगानं काल नवी दिल्लीत
सर्वंकष आरोग्य निर्देशांक जाहीर केला. २०१५ सालच्या सहाव्या स्थानावरून राज्यानं यंदा
तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पाच वर्षांखालील बालकं तसंच नवजात बालकांच्या मृत्यूदरात
घट झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिलं आहे. राज्यात जन्मदराचं प्रमाणही
स्थिर असल्याचं या अहवालात नमूद आहे.
दरम्यान, आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे
हे साध्य झाल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आरोग्य अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचं हे यश असल्याचं शिंदे म्हणाले.
****
राज्यातली रूग्णालयं आणि आरोग्यकेद्रांमधल्या रिक्त
पदांच्या भरती प्रक्रियेला गती द्यावी, आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, कंत्राटी
पद्धतीनं ही पदं भरून जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री
शिंदे यांनी दिले आहेत. ते काल विधानभवनात एका बैठकीत बोलत होते. राज्याच्या ग्रामीण
भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे डॉक्टरांना प्रति रुग्ण प्रोत्साहन
निधी सारख्या सुविधा देण्यात याव्यात, असंही शिंदे म्हणाले.
****
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून अर्थव्यवस्था
एक ट्रिलियन डॉलरची करण्याचं उद्दीष्ट गाठायचं आहे असं, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना ते काल विधान सभेत बोलत होते.
यावेळी वित्तमंत्र्यांनी आपल्या भाषणात औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूक, जलयुक्त शिवार
योजनेमुळे कृषी उत्पादन झालेली वाढ, प्रधानमंत्री पीक विमा योजना, महागाईमध्ये झालेली
घट आदींसह विविध मुद्दयांना स्पर्श केला.
****
आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या
नागरिकांना शासनातर्फे पाच हजार रुपये आणि दहा हजार रुपये मानधन दिलं जात असून, या निधीत वाढ करण्याबाबत विचार केला जाईल, अशी
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
विधानसभेत दिली. आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या अनेक मान्यवरांनी हे मानधन
नाकारलं असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक
हजार गावं आदर्श करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या प्रकल्पाची
सुरूवात केली असून याअंतर्गत राज्यातील २५ जिल्हयांमधील सरपंच आणि ग्रामसेवक यांची
प्रशिक्षणाव्दारे क्षमता बांधणी करण्यात येत आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण
इथल्या जायकवाडी धरणाखालील दुष्काळी गावांना पाणीपुरवठ्यासाठी ब्रम्हगव्हाण उपसा
सिंचन योजनेची प्रलंबित कामं मार्च २०२० पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. जलसंपदा राज्यमंत्री विजय
शिवतारे यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली. या योजनेच्या प्रलंबित कामाबाबतची लक्षवेधी सूचना सतीश चव्हाण यांनी मांडली, त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते. या योजनेवर
मार्च २०१९ अखेर भूसंपादनसह एकशे चौऱ्यांशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये
निधी खर्च झालेला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीनशे छत्तीस कोटी
एकोणसत्तर लाख रुपये निधीची आवश्यकता असून, त्यापैकी चालू आर्थिक वर्षासाठी पंधरा
कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित कामं पूर्ण
करण्याचं नियोजन असल्याचंही शिवतारे यांनी यावेळी सांगितलं. या
चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला.
****
राज्यातल्या बेकायदेशीर रोगनिदान प्रयोगशाळांविरुद्ध
कारवाईसाठी आठवडाभरात शासननिर्णय जारी करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री
रविंद्र चव्हाण यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य सुनील प्रभू यांनी एका लक्षवेधीद्वारे
हा मुद्दा उपस्थित करताना राज्यभर सुमारे आठ हजार बेकायदेशीर प्रयोगशाळा कार्यरत असल्याचं
नमूद केलं होतं.
****
खेळाडूंना खाजगी क्षेत्रातही नोकरीसाठी आरक्षण लागू
करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री
आशिष शेलार यांनी काल दिली. विधानसभेत सदस्य संजय केळकर यांनी खेळाडूंच्या नोकरीतील
आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज सामाजिक न्याय दिन
म्हणून साजरी केली जात आहे. या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद
इथं धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या वतीनं शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ अभिवादनपर
विशेष कार्यक्रमाचं आणि व्याख्यानाचं आयोजन केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात दुपारी बारा वाजता महात्मा फुले सभागृहात विचारवंत प्राचार्य डॉ. आय.एच.
पठाण यांचं विशेष व्याख्यान होणार आहे. नांदेड इथं आज समता दिंडी, अभिवादन सभा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी
निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्र
सरकारची प्रधानमंत्री किसान विकास सन्मान योजना राबवण्यासंदर्भात परभणी जिल्हा प्रशासनाकडून फक्त ग्रामसेवकांनाच सक्ती केली जात असल्याच्या
निषेधार्थ कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेनं
दिला आहे. संघटनेचे पालम तालुकाध्यक्ष केशवराव खाडे यांनी तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन सादर केलं आहे. ही
योजना तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तरित्या काम
करून राबवणं अपेक्षित आहे.
****
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल धुळे
- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर इथं `रस्ता बंद` आंदोलन केलं. सिल्लोड - सोयगाव
तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरीत मिळावी, धुळे - सोलापूर राष्ट्रीय
महामार्गावर हतनूर इथल्या उड्डाणपुलाची उंची वाढवावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन
करण्यात आलं. आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. कन्नड
ग्रामीण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं.
****
जालना इथं काल भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील एका
ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला. नितीन राठोड आणि लक्ष्मण आढे अशी मृतांची नावं
असून ते अंबड तालुक्यातल्या गोंदीतांडा इथले रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक
चालकास ताब्यात घेतलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड इथं प्रतिबंधित एचटी
बीटी कपाशी, आणि बीटी वांग्यांची अडगाव इथल्या शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते
ललीत बहाळे यांच्यासह बारा जणांविरुद्ध पोलिसांनी काल गुन्हे दाखल केले. एचटी बीटी
कपाशी, बीटी वांगी लागवड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच
घटना आहे.
****
लातूरचे नायब तहसीलदार इंद्रजित नामदेव गरड यांना
१५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहाथ पकडलं.
शेतजमिनीच्या खरेदी प्रकरणात फेर ओढुन देण्यासाठी गरड यांनी ३५ हजार रुपयाची मागणी
केली होती, त्यातील १५ हजार रूपये घेतांना काल गरड यांना पकडण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या शेंडी
इथला ग्रामसेवक शिवाजी नारायण देशमाने याला तीन हजार रूपये लाच स्वीकारतांना काल रंगेहाथ
अटक करण्यात आली. अंगणवाडीत दुरूस्ती केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी ही लाच स्वीकारली
जात होती.
****
औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथल्या औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेतील लेखापाल महानंदा भिकन जाधव हिला अडीच हजार रूपये लाच घेतांना काल रंगेहाथ
पकडण्यात आलं. तासिका तत्वावरच्या शिक्षकाचा २० हजार रूपयांचा धनादेश काढण्यासाठी तिनं
लाच मागितली होती.
****
क्रिकेट
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात
ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे
बारा गुण झाल्यानं, हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि
न्यूझीलंड यांच्यात तर, उद्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात सामना होणार आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा ९० टक्क्यापेक्षा
जास्त भाग व्यापला असून, येत्या चार पाच दिवसात उर्वरित
भागातही मोसमी पाऊस पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, औरंगाबाद शहर आणि पैठण तालुक्यातल्या
आडगाव, कडेठाण परिसरात काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर
इथं गारपीट झाल्याचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment