Tuesday, 25 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
जल संवर्धन ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे जल पुनर्वापर तसंच शाश्वत सिंचन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत डॉ. रॉन मालका यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यानच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी संरक्षित सिंचन सुविधा विकसित करण्यावर आपला भर असून त्यासाठी मराठवाडा एकात्मिक पाणीपुरवठा योजना -वॉटर ग्रीड- संकल्पना लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. जल व्यवस्थापनासह, कृषी तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातही इस्रायल सहकार्य करण्यासाठी उत्सूक असल्याचं इस्त्रायलचे राजदूत डॉ. मालका यावेळी म्हणाले.
****
आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना शासनातर्फे पाच आणि दहा हजार रुपये मानधन दिलं जात असून भविष्यात हा निधी वाढविण्यासाठी विचार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. आर्थिक सुस्थ‍ितीत आणि हयात असलेल्या काहींनी मानधन नाकारलं असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.
****
राज्यातील हवामान, स्थानिक परिस्थिती, पावसाचं प्रमाण, पाण्याची उपलब्धता इत्यादी बाबी लक्षात घेऊन त्यास अनुसरुन `अटल आनंदवन - घन वन` प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज विधान परिषदेत दिली. 
****
पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणाखालील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशानं ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामं मार्च २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या योजनेच्या प्रलंबित कामाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सतीश चव्हाण यांनी मांडली, त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते. योजनेवर मार्च २०१९ अखेर भूसंपादनसह १८४ कोटी ४८ लाख रुपये खर्च झालेला आहे. ही योजना पूर्णत्वासाठी आणखी ३३६ कोटी ६९ लाख रुपये निधीची आवश्यकता असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षासाठी पंधरा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. निधी उपलब्धतेनुसार उर्वरित कामं पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचंही शिवतारे यांनी यावेळी सांगितलं. या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.
****
राज्य सरकार राज्यातील बेकायदेशीर रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळांविरुद्ध कारवाईसाठी आठवडाभरात शासन निर्णय जारी करणार असल्याची माहिती आज विधानसभेत देण्यात आली. सदस्य सुनील प्रभू यांनी एका लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना राज्यभर सुमारे आठ हजार बेकायदेशीर प्रयोगशाळा कार्यरत असल्याचं नमुद केलं होतं. राज्य विधीमंडळाचं हे अधिवेशन संपण्यापुर्वी म्हणजे दोन जुलैआधी या संदर्भातील शासन निर्णय काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. 
****
नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या ९० टक्क्यापेक्षा जास्त भागात पोचला असून, येत्या चार पाच दिवसात उर्वरित भागातही पोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अधिका-यानं पुण्यात वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. दरम्यान, औरंगाबाद शहर आणि पैठण तालुक्यातल्या आडगाव, कडेठाण परिसरात आज पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
****
नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे धावणारी नांदेड-अमृतसर-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे गाडीचे संपूर्ण डब्बे बदलून एक जुलै पासून प्रवासी क्षमता जास्त असणारे डब्बे लावण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागानं दिली आहे.
****
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कार्यकर्त्यांसह आज धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर इथं `रस्ता बंद` आंदोलन केलं. सिल्लोड - सोयगाव तालुक्यातल्या  शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरीत मिळावी आणि धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर इथल्या उड्डान पुलाची उंची वाढवावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होतं. आंदोलनामुळं सुमारे तीन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. कन्नड ग्रामीण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं.
****
जालना इथल्या छत्रपती संभाजी उद्यानासमोर आज दुपारी भरधाव पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीवरील एका ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू झाला. नितीन राठोड आणि लक्ष्मण आढे अशी मृतांची नावं असून ते अंबड तालुक्यातल्या गोंदीतांडा इथले रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड इथं प्रतिबंधित एचटी बिटी कपाशी, आणि बीटी वांग्यांची अडगाव इथल्या शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललीत बहाळे यांच्यासह बारा जणांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.
****

No comments: