Friday, 28 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात अकरावी प्रवेशासाठी अधिकांश विद्यार्थ्यांनी सामान्य प्रवर्गातून अर्ज भरले असून, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग तसंच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातल्या अनेक आरक्षित जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातून प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र नसेल, त्यांना पालकांच्या हमीपत्रावर प्रवेश देण्यात येईल तसंच ही प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी तीन महिने मुदत देण्यात आल्याची माहिती शेलार यांनी दिली. राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी राखीव कोट्यातून फक्त १३ टक्के तर आर्थिक दुर्बल घटकातून फक्त ९ टक्के विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. औरंगाबाद विभागातून हे प्रमाण अनुक्रमे १५ आणि सुमारे अकरा टक्के एवढं आहे.
भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम ICSE च्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग एक आणि दोन मध्ये सुधारणांसाठी एक जुलैपर्यंत मुदत दिली असल्याची माहितीही शेलार यांनी दिली.
****
मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या तेरा हजारावर तरुणांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आंदोलनादरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी आणि दहा लाख रुपये मदत जाहीर झाली होती ती तत्काळ मिळावी, असंही वडेट्टीवार म्हणाले. याबाबत महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी, गुन्हे मागे घेण्याची प्रकिया सुरू असून, नोकरी आणि दहा लाख रुपये मदतीबाबतचा लवकरच माहिती देण्यात येईल असं सदनाला सांगितलं.
****
राज्यात ज्या रुग्णालयांमध्ये एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसतील, त्या ठिकाणी बीएएमएस डॉक्टर अकरा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीनं नेमणार असल्याचं सरकारकडून विधान सभेत सांगण्यात आलं. ही प्रक्रिया तीन महिन्यांच्या आत पूर्ण केली जाईल, असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सदस्य बच्चू कडू यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
****
मादक द्रव्य तस्कर आणि विक्रेत्यांसाठी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. यावर, राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्याकरता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात असा एक कक्ष स्थापन करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिली.
****
अनाथांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. आज विधानसभेत बच्चु कडू यांनी राज्यातल्या अनाथ बालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना त्या बोलत होत्या. या मुलांना कालानुरूप व्यावसायिक शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानांतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
मुंबई स्टॉक एक्सचेंजनं हळद व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या एक्सचेंजमार्फतच्या हळद व्यापाराला आज सांगली इथून सुरुवात करण्यात आली. देशातले चार कोटी ग्राहक ऑनलाईन पद्धतीनं या व्यवहारात आता सहभागी होऊ शकतील.
****
खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्याला एक हजार पन्नास कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचं उद्दिष्ट असून आजपर्यंत राष्ट्रीयीकृत, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून चोवीस हजारांहून अधिक शेतकऱ्यांना एकशे अट्ठावन्न कोटी साठ लाख रुपये खरीप पीककर्ज वाटप पूर्ण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना कर्ज वाटपाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात आज भंडारा, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जालना, तसंच उस्मानाबाद शहरातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या बारा जुलैला पंढरपूर इथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून सहा विशेष गाड्या धावणार आहेत. यात आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद, नगरसोल -पंढरपूर- नगरसोल, अकोला-पंढरपूर-अकोला या गाड्यांच्या प्रत्येकी दोन फेऱ्यांचा समावेश आहे.
****



No comments: