Tuesday, 25 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

v वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
v जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करावी - धनंजय मुंडे यांची मागणी
v विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची निवड
vमराठवाडा साहित्य परिषदेचे वाङमय पुरस्कार जाहीर; २१ जुलैला वितरण
आणि
vराठवाड्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर

****

वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावानं लागू करण्याच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. राज्य सरकारनं जारी केलेल्या या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं होतं, मात्र खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली होती, त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयानंही या अध्यादेशावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात एका याचिकेवर परवा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालय निकाल सुनावण्याची शक्यता आहे.
****

 मराठी भाषा फक्त टिकवायची नाही, तर वाढली पाहिजे, अधिक समृध्द केली पाहिजे. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत दिली. मराठीच्या भल्यासाठी-मराठीचे व्यासपीठ’ अंतर्गत एकत्र आलेल्या चोवीस संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने काल विधान भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्य‍िक मधू मंगेश कर्णिक, लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले-पाटील, नागनाथ कोतापल्ले, दादा गोरे, आदींचा समावेश होता.
****

 राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करावी तसंच या कामांचं त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल विधानपरिषदेत केली. या योजनेसंदर्भात तक्रारी प्राप्त झालेल्या एक हजार तीनशे  कामांची विभागीय चौकशी सुरू आहे, या चौकशीचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.
****

 नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी काल विधानसभेत दिली. सुट्ट्या तेलाच्या पॅकिंग आणि दर्जावर अन्न आणि औषध प्रशासनाचं नियंत्रण असून, खाद्यतेलात भेसळ आढळल्यास संबंधित दोषींवर अन्न सुरक्षा तसंच मानद कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भेसळसंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं येरावार यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात बाळाच्या नाळेचा वापर करून औषध उत्पादन करण्यासाठी कोणत्याही कंपनीला परवाना देण्यात आलेला नसल्याचंही येरावार यांनी सागितलं.
****

 राज्यात मुंबईतल्या टाटा कर्करोग संशोधन आणि उपचार केंद्रासह औरंगाबाद, नागपूर आणि चंद्रपूर  या चार ठिकाणी अद्ययावत सुविधा उभारण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी काल  विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामात येणारे विविध अडथळे दूर होत असून काम प्रगतीपथावर असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. या कामासाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार नाबार्ड अंतर्गत ७० कोटी तर शासनातर्फे दहा कोटी चौदा लाख अंशदान मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषीत करण्यात आला आहे, तिथल्या  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती राज्य शासन करत असून, प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपुर्तीही शासन करणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत सांगितलं. पुढील १५ दिवसांत ही प्रतिपुर्ती करण्यात येणार आहे.
****

 विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल ही घोषणा केली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं होतं.
****

विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल बिनविरोध निवड झाली. नीलम गोऱ्हे यांचा उपसभापतीपदासाठीचा प्रस्ताव सभागृह नेते तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि सदस्य अनिल परब यांनी मांडला. गोऱ्हे यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सुमारे ६० वर्षानंतर, उपसभापतिपदी एका सक्षम आणि कार्यक्षम महिलेची बिनविरोध निवड झाल्याचं सांगितलं. यापूर्वी १९५५ ते १९६२ दरम्यान, जे टी सिपाही मलानी यांनी हे पद सांभाळलं होतं.
**** 

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 मराठवाडा साहित्य परिषदेचे वाङमय पुरस्कार काल जाहीर झाले. सुपडा भिकू वराडे यांच्या `पहिल्या सरीचा मृदगंध` या आत्मचरित्राला नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर झाला आहे, तर सोलापूरचे समीक्षक डॉ. दत्ता घोलप यांच्या 'मराठी कादंबरी : आशय आणि अविष्कार` ग्रंथाला म. भि. चिटणीस पुरस्कार जाहीर झाला आहे. नांदेडच्या सुचिता खल्लाळ यांच्या `प्रलयानंतरची तळटीप` काव्य संग्रहाला कुसुमावती देशमुख पुरस्कार, कोल्हापूरचे किरण गुरव यांच्या `जुगाड` या कादंबरीला बी. रघुनाथ पुरस्कार, प्रेमानंद गज्वी यांच्या `छावणी` या नाटकाला कुमार देशमुख नाट्यपुरस्कार, तर पुण्याच्या अनुबंध प्रकाशन संस्थेचे अनिल कुलकर्णी यांना रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २१ जुलैला, औरंगाबाद इथं, या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
 ****

 मराठवाड्याच्या पर्यटन, दळणवळण आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीनं, विमान सेवा सुविधा विस्तारणं आवश्यक असल्याचं, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं, मराठवाड्याच्या पर्यटन आणि दळणवळण विकासासंदर्भात मंडळाची बैठक झाली, त्यावेळी डॉ. कराड बोलत होते. औरंगाबाद विमानतळावरून मुंबई, दिल्ली, हैद्राबाद यासह इतर शहरांना विमान सेवा वाढवण्यासाठी, विकास मंडळांच्या माध्यमातून, राज्य तसंच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

राठवाड्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीसाठी परवा झालेल्या मतदानाची काल मोजणी करून निकाल जाहीर करण्यात आले.

 उस्मानाबाद तालुक्यात तेर गावाच्या सरपंच पदाच्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनाथ नाईकवाडी विजयी झाले. नाईकवाडी यांच्या विजयानंतर तेर गावातून गुलालाची उधळण आणि आतीशबाजी करत, विजयी मिरवणूक काढण्यात आली.
****

 नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या उपमहापौर पदी काँग्रेसचे नगरसेवक सतीश देशमुख यांची काल बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचेच विनय गिरडे पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं.
****

 नांदेड जिल्ह्यात अटकळी पंचायत समिती गणातल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अर्चना शट्टीवार १७०० मतांनी विजयी झाल्या.
****

 परभणी शहर महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गवळण रोडे तर प्रभाग क्र.११ मधून एमआयएम पक्षाच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद या विजयी झाल्या आहेत.

 सोनपेठ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ब च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार लक्ष्मण खरात यांनी विजय मिळवला.

 मानवत नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे प्राध्यापक सखाहरी पाटील हे सुमारे साडे नऊ हजार मताधिक्यांनी विजयी झाले. पाटील यांना १२ हजार २१० तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पूजा खरात यांना दोन हजार ७७१ मतं मिळाली.
****

 हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ११ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सविता अतुल जयस्वाल विजयी झाल्या, तर औंढा नागनाथ पंचायत समिती पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या माया कराळे विजयी झाल्या आहेत. येळेगाव जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीत भाजपच्या जनाबाई माहुरे या विजयी झाल्या आहेत.
****

 शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापराचे स्वातंत्र्य मिळावं आणि जीएम तसंच एचटीबीटी बियाणांवरील बंदी तत्काळ उठवून ती बाजारात उपलब्ध करावीत, या मागणीसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने औसा तालुक्यातील हिप्परसोगा इथं काल सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा दुसरा टप्पा आज बोरी इथं तर उद्या अहमदपूर तालुक्यात रुई दक्षिण इथं राबवण्यात येणार आहे.
****
 मराठवाड्यात काल बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यात बदनापूर, भोकरदन आणि जालना तालुक्यातल्या काही भागात काल सकाळी तर परभणी शहर आणि परिसरात काल सायंकाळी सुमारे तासभर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात काल सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी २८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
 लातूर जिल्ह्यात सर्वत्र मृग नक्षत्राच्या शेवटी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्याच्या दहाही तालुक्यात रविवारी रात्रीनंतर पाऊस झाला. काल दुपारी लातूर शहरासह अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. शहरात जागोजागी पाणी तुंबून दुर्गंधी सुटल्यानं, बाजारपेठेत व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी रात्री उशीरापर्यंत तुंबलेला कचरा काढून पाण्याचा मार्ग मोकळा करत होते. 
 बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जून महिन्याच्या सरासरी पेक्षा 43% एवढा पाऊस झाला आहे.  दरम्यान चांगला पाऊस पडल्या शिवाय पेरणी करू नये, असं कृषी विभागानं कळवलं आहे. 
 बुलडाणा जिल्ह्यात पैनगंगा नदीला आलेल्या पुरात अजिंठा - बुलडाणा रस्त्यावरचा पूल वाहून गेल्यानं, या मार्गावरची वाहतुक सध्या बंद असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल बांगलादेशानं अफगाणिस्तानचा ६२ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना होणार आहे.
*****
***

No comments: