Friday, 28 June 2019

Text- AIR NEWS BULLETIIN AURANGABAD 28.06.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****
**  मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध; शिक्षणात बारा टक्के तर नोकरीत तेरा टक्के आरक्षण देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय  
** पुण्यातला भूखंड घोटाळा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून विधीमंडळात गदारोळ
** राज्यात अनेक ठिकाणी पाऊस; बुलडाणा जिल्ह्यात लासूरा आणि पूर्णा नदीला पूर
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडीजवर सव्वाशे धावांनी विजय
****
राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घटनाबाह्य नाही, मात्र हे आरक्षण १६ टक्क्यांऐवजी शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के असायला हवं, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल सर्व याचिका आणि हस्तक्षेप अर्ज न्यायालयानं काल फेटाळून लावले. गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला राज्य विधिमंडळानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याच्या आधारावर सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र हे आरक्षण सरसकट सोळा टक्के न देता, राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीनुसार शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण द्यावं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी स्थगिती द्यावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाला या निर्णयाबाबत माहिती देऊन, मराठा आरक्षण देण्याच्या या प्रक्रियेत सहकार्य करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले.
विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी, या निर्णयाबाबत अभिनंदन करताना, इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षण दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एमआयएमचे वारीस पठाण, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, काँग्रेसचे आरेफ नसीम खान, यांनी मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षण लागू करण्याची मागणी केली.
देशात धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मात्र केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला दिलेलं दहा टक्के आरक्षण, मुस्लीम समाजालाही लागू आहे, मुस्लीम समाजातल्या विद्यार्थ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतला असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी उदाहरणासह सांगितलं.
****
न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात सर्वत्र मराठा बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात फटाके फोडून तसंच पेढे वाटून आनंद व्यक्त केला गेला.
****
राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनांचं कामकाज काल सकाळच्या सत्रात विविध मुद्यांवरुन वारंवार स्थगित करावं लागलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात भूखंड घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात विरोधकांनी काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या विषयावर विधानसभेत वादळी चर्चा झाली. चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी निवेदन सादर केलं. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार, जयंत पाटील, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधीमंडळ कामकाज मंत्री विनोद तावडे, यांनी यासंदर्भात सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढल्यानं, तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी, आणि त्यानंतर वीस मिनिटांसाठी स्थगित केलं.

विधान परिषदेत काल धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. या चर्चेत भाजपचे प्रवीण दरेकर, काँग्रेसचे भाई जगताप यांच्यासह अनेकांनी आपली मत मांडली. या चर्चेदरम्यान, भाई जगताप यांच्या आक्षेपार्ह विधानावरून सदनात गदारोळ झाला, दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं, तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांना कामकाज पुन्हा स्थगित करावं लागलं.
****
पूर्णत: प्लास्टिक बंदीची शासनाची भूमिका असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल विधानसभेत दिली. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. दुधाच्या पिशवीच्या पुनर्वापरासंदर्भात कार्यवाही एका महिन्यात सुरू होणार असून यामुळे दररोजच्या ३१ टन कचऱ्यावर बंदी येणार असल्याची माहिती कदम यांनी दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
केंद्र सरकारनं नुकत्याच घोषित केलेल्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९ वर काल औरंगाबाद इथल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात एकदिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आलं. गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ.सर्जेराव ठोंबरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. दोन सत्रात झालेल्या या चर्चासत्रात उच्च शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि शालेय शिक्षण या विषयावर तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा २०१९ विषयी नागरिकांनी आपल्या सूचना आणि मत ३० जुलै पर्यंत पाठवण्याचं आवाहन औरंगाबाद शिक्षण उपसंचालक डॉ.एस.एम देशपांडे यांनी समारोपीय भाषणात केलं.
****
लातूरचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी काल लोकसभेत, लातूरची पाणी टंचाई आणि उपाय याची माहिती देत, राष्ट्रीय पेय जल योजनेतून कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची मागणी केली. या संदर्भात श्रृंगारे यांनी, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन, निवेदनही दिलं आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही पाणी प्रश्नावर काल संसदेत आपलं मत व्यक्त केलं.
****
राज्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात  तुरळक ठिकाणी तर कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही काल रात्री नऊच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला, शेगाव - खामगाव मार्गावर लासूरा नदीला पूर आल्यानं वळण रस्त्यावरचा भराव वाहून गेला, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली आहे, पूर्णा नदीलाही पूर आला असून, अनेकांच्या शेतात पाणी साचलं आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड, सटाणा, निफाड, इगतपुरी, नांदगाव तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काल पाऊस पडला.
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात रुपाली भोई या अठरा वर्षीय मुलीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर मुंबई नाका परिसरात एका इसमाचा पानटपरीच्या पत्र्यात विद्युत प्रवाह उतरल्यानं वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात सातकोर इथं संजय पडघा या आठ वर्षाच्या मुलाचा घरासमोरील अंगणात खेळत असतांना वीज पडून मृत्यू झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं तीन मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू झाला. काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास यशवंतनगर भागातल्या ओढ्यात ११ ते १४ वर्षे वयोगटातली सहा मुलं पोहायला गेली होती, त्यापैकी अब्ररार खाँ ठाण, अनसखाँ पठाण आणि मोईज हारुन शाह हे तिघंजण पोहता येत नसल्यामुळे बडून मरण पावले.
****
क्रिकेट -
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं वेस्ट इंडीज संघावर सव्वाशे धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, भारतीय संघानं महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या बळावर २६८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडीज संघ ३५ व्या षटकांत १४३ धावांवर सर्वबाद झाला. मोहमद शमीनं चार, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला. ७२ धावा करणारा विराट कोहली सामनावीर ठरला. या विजयासह भारतानं अकरा गुण पटकावत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान पाठोपाठ वेस्ट इंडीज संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे
****
शेगावहून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत गजानन महाराजांची पालखी आज सकाळी अंबाजोगाईहून कळंब मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. काल पालखीचं अंबाजोगाई शहरात आगमन झालं. काल सायंकाळी योगेश्वरी देवी मंदिरात वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गावातल्या हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतल.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरूवात केली आहे. ७५ मिली मीटर इतका पाऊस पेरणीस योग्य असल्याचं सांगण्यात आलं होतं, काही भागात तेवढा पाऊस झाला नसला तरी, झालेला पाऊस पेरणी योग्य असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी बी एस रणदिवे यांनी दिली.
************

No comments: