Friday, 21 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग महत्वाचा असल्यानं योग माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी आणि आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे. ते नांदेड इथं राज्य शासनाच्यावतीनं तसंच विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. योगगुरू स्वामी रामदेवबाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आदींसह हजारो योग साधक या उपक्रमास उपस्थित होते. नांदेड जिल्हा वासियांनी निरोगी आणि आरोग्यदायी जीवनासाठी नियमीत योगासनं करण्याचा संकल्प करावा, असं आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
आंतरराष्ट्रीय योगदिनाचं औचित्य साधून प्रत्येक नागरिकानं योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म आणि सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन रामदेवबाबा यांनी यावेळी केलं. आयुष विभागानं तयार केलेल्या “पवनी” या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस आणि रामदेवबाबा यांच्या हस्ते यावेळी झालं. राज्यात ठिकठिकाणी योगदिन उत्साहात साजरा झाला. परभणी, लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलांमध्ये योग दिनानिमित्त योगसाधना आणि कार्यक्रम झाले. 
****
राज्यातील महाविद्यालयांत प्राध्यापक भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करुन यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. या संदर्भातील लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.मनीषा कायंदे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री.वायकर बोलत होते.
दरम्यान, प्राध्यापकांचं वेतन वेळेवर न करणाऱ्या शिक्षणसंस्था चालकांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
****
नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली. गडचिरोली जिल्ह्यात एक मे रोजी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली असून लवकरच नोकरी देण्यात येणार असल्याचं तसंच या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं असल्याचंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांच्या सहमतीनं विकास कामं करुन गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद संपविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहितीही गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास होऊन त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याकरता शासनमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते.
****
राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे, अशी टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते आज विधीमंडळ परिसरात बातमीदारांशी बोलत होते. राज्यात आजही हजारो शेतकरी असे आहेत ज्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र मिळुनही अजून कर्जमाफी मिळालेली नाही, असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
तेलंगणा राज्यातील कालेश्वरम प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालं. या प्रकल्पातील चार उपसा सिंचन योजनांमुळं गडचिरोलीतील सात हजार एकशे अठरा हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार असून या प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रस्तावित तुमडीहेट्टी बंधाऱ्यामुळं गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पंचवीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज दुपारी मोठ्या उकड्यांनतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील डोंगरकडा, आखाडा बाळापूर, वसमत, नांदापूर, कळमनुरी, कनेरगाव नाका या भागासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून यामुळं हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांची उकाड्यातून सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी निझामाबाद ते पंढरपूर ही रेल्वे उद्यापासून पूर्ववत सुरू केली जाणार आहे. पंधरा जुलैपर्यंत ही रेल्वे सुरू राहील, असं रेल्वेच्या नांदेड येथील विभागीय कार्यालयानं कळवलं आहे.
****

No comments: