आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यासह काही भागात मोसमी
पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सिल्लोड, पैठण, गंगापूर, कन्नड
परिसरातही काल रात्री आणि आज सकाळी पाऊस झाला. जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस
झाला. अंबड, भोकरदन, परतूर, जालना, घनसावंगी तालुक्यात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. या
पावसामुळं अनेक भागातला विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
****
जम्मू-काश्मीरच्या शोपीयान जिल्ह्यातल्या किगाम भागात,
आज सकाळी, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले.
चकमक झालेल्या ठिकाणी हत्यारं आणि विस्फोटकं जप्त केल्याची माहिती सुरक्षा दलाकडून
देण्यात आली आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख पटवून घेतली जात आहे.
****
शेगांवहून पंढरपूरकडे जाणाऱ्या, संत गजानन महाराजांच्या,
पालखीचं काल परभणी शहरात आगमन झालं. पालखीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर
इथून निघालेल्या, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या, पालखीचा रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातल्या,
दातली इथं पार पडला. दरम्यान, संत तुकाराम
महाराजांची पालखी, आषाढीवारीसाठी उद्या देहू इथून प्रस्थान करेल, तर संत ज्ञानेश्वर
महाराजांची पालखी परवा मंगळवारी आळंदीहून प्रस्थान करणार आहे.
****
जालना जिल्ह्यात `आपलं सरकार सेवा केंद्रांची` संख्या
कमी असल्यानं, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात लागणाऱ्या, विविध दाखल्यासाठी
भटकंती करावी लागत आहे. `आपलं सरकार सेवा केंद्रांपैकी` काही केंद्रचालकांकडून आर्थिक
पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत, अशी केंद्र बंद करुन नवीन केंद्र तत्काळ
सुरु करावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली
आहे.
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण मंडळ-म्हाडाच्या
औरंगाबाद विभागीय मंडळाच्या, सभापतीपदी, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यमंत्री दर्जाचं हे पद गेल्या अनेक वर्षांपासून
रिक्त होतं.
****
No comments:
Post a Comment