Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
गेल्या साडे चार वर्षांत साडेपाचशे कोटी रुपये मदत वितरित
** विमा कंपन्यांनी पीक विम्याचा
लाभ त्वरित न दिल्यास मुंबईतली सर्व कार्यालये बंद पाडू - उध्दव ठाकरे यांचा इशारा
** शुल्कवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचं
उस्मानाबाद इथं विद्यापीठ उपकेंद्रात आंदोलन
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोमहर्षक
सामन्यात भारताचा अफगाणिस्तावर अकरा धावांनी विजय
****
राज्यातल्या ५६ हजार रुग्णांवर उपचारासाठी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गेल्या साडे चार वर्षांत साडेपाचशे कोटी रुपये मदत वितरित
करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
यापैकी १०६ कोटी रुपये गेल्या १०
महिन्यात साडे दहा हजारहून अधिक रुग्णांना वितरित केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या
जनतेला शासकीय रुग्णालयांबरोबरच सध्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेखाली
वैद्यकीय सेवा देण्यात येतात. शासनाच्या या प्रयत्नांना सामाजिक संस्थांचेही मोठ्या
प्रमाणात पाठबळ मिळाल्यामुळे गरीब रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणं शक्य झालं,
असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यभरात रथयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केली. मुंबईत काल भाजपा पक्ष कार्यकारणीच्या बैठकीत, ही माहिती देण्यात आली.
राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही रथयात्रा पोहोचेल, असं यावेळी सांगण्यात
आलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस
पक्षाच्या उमेदवारीकरता येत्या ६ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील, असं काँग्रेस पक्षानं
जाहीर केलं आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
केली आहे. विविध पातळ्यांवर पक्षाकडून नियोजन सुरु करण्यात आलं आहे. याचाच एक भाग म्हणून
प्रदेश काँग्रेसनं इच्छूक उमेदवारांकडून लेखी अर्ज मागवले आहेत.
****
पीक विम्या पासून वंचित शेतकऱ्यांना
विमा कंपन्यांनी त्वरीत पीक विम्याची रक्कम द्यावी, अन्यथा त्यांची मुंबईतली सर्व कार्यालये
बंद पाडू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी काल औरंगाबाद
नजीक लासूर स्टेशन इथल्या कृषि उत्पन्न बाजार समितीतल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी
केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध कल्याणकारी
योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबध्द असल्याचं त्यांनी
सांगितलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी असल्याचं त्यांनी म्हटलं. सत्तेत
असलो तरी वंचितांसाठी आणि त्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना नेहमी लढा देणार असल्याचं
ठाकरे यावेळी म्हणाले.
****
पीक विम्या संदर्भातल्या अडचणी सोडवून
शेतकऱ्यांना विमा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पर्यावरण मंत्री
रामदास कदम यांनी दिली आहे. शिवसेनेच्यावतीनं जालना आणि मंठा इथं सुरू करण्यात आलेल्या
पीकविमा मदत केंद्रास कदम यांनी काल भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान कदम
यांच्या हस्ते परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या पीक विमा मदत केंद्राचं उद्घाटन झालं,
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस
आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी
लावू, अशी ग्वाही महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. अंगणवाडी कर्मचारी
संघटनेनं काल मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी बोलताना मुंडे
यांनी, पंतप्रधानांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करत
असल्याचं सांगितले.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यास शासनानं
परवानगी दिली आहे. त्यामुळे या धरणांहून २२ टॅंकरद्वारे आष्टी तालुक्याला पाणी पुरवठा
सुरू करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातली पाणीटंचाई काही अंशी कमी झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
केंद्र सरकारनं घेतलेल्या ‘स्वच्छ
सुंदर स्वच्छतागृह स्पर्धेत’ कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात पहिला, तर देशात दुसरा क्रमांक
पटकावला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
गांधींजीच्या स्वातंत्र्य लढाईत कस्तुरबांचं
योगदान मोठं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी केलं आहे. मराठवाडा
साहित्य परिषदेच्या डॉ.ना.गो.नांदापूरकर व्याख्यानमालेत काल 'कस्तुरबा: गुजरात ते दक्षिण
आफ्रिका' या विषयावर पहिले पुष्प गुंफताना, अरुण खोरे बोलत होते. गांधीजी, महात्मा
फुले यांच्या तुलनेत, सावित्रीबाई तसंच कस्तुरबा गांधी यांचं योगदान उशीरानं समाजासमोर
आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या शुल्कवाढीच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीनं उस्मानाबाद इथं विद्यापीठ
उपकेंद्रात, काल ढोलनाद आंदोलन करण्यात आलं. विद्यापीठांतर्गत अनुदानित तसंच विनाअनुदानित
महाविद्यालयातल्या पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शुल्कात विद्यापीठानं मोठी
वाढ केली आहे. येत्या आठ दिवसांत शुल्कवाढ मागे न घेतल्यास, आंदोलन तीव्र करण्यात येईल,
अशा आशयाचं निवेदन, विद्यापीठ उपकेंद्र संचालक डॉक्टर अनार साळुंके यांच्यामार्फत कुलगुरुंना
देण्यात आलं.
****
क्रिकेट
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल रोमहर्षक
सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा अकरा धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करून
दिलेल्या दोनशे पंचवीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, अफगाणिस्तानचा संघ दोनशे
तेरा धावांवर सर्वबाद झाला. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहल यांनी
प्रत्येकी दोन तर मोहम्मद शमीनं, चार बळी घेतले. आठवा-नववा-आणि दहावा फलंदाज सलग तीन
चेंडूत बाद करून, शमीनं या विश्वचषकातली पहिली हॅटट्रीक नोंदवली. असा विक्रम करणारा
तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला, यापूर्वी १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या
सामन्यात चेतन शर्माने हॅटट्रीक नोंदवली होती. या विजयामुळे ९ गुणांसह भारत गुणतालिकेत
तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात
सामना होणार असून, भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी वेस्ट इंडीजसोबत होणार आहे.
****
मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यासह
काही भागात काल मोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली. जालना जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस
झाला. अंबड, भोकरदन, परतूर, जालना, घनसावंगी तालुक्यात पाऊस झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान,
जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सिल्लोड,
पैठण, गंगापूर, कन्नड परिसरातही काल रात्री पाऊस झाला. औरंगाबाद शहरात सुमारे तासाभरानंतर
पावसाचा जोर ओसरला असला तरीही, अद्याप पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे अनेक
भागातला विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.
परभणी जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर
दमदार पाऊस झाला, मात्र पेरणीसाठी शेतकऱ्यांना अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यात एका व्यक्तीचा
मोबाईलवर बोलताना, अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बार्शीटाकळी तालुक्यात ही घटना घडली.
पावसापासून बचावासाठी हा इसम झाडाखाली थांबला असताना वीज कोसळली. यात सदर इसमाचा मृत्यू
झाला, तर अन्य एक जण जखमी झाला.
बुलडाणा जिल्ह्यात एका महिलेसह तिच्या
दोन बालकांचा घरावर झाड कोसळून मृत्यू झाला. खामगावनजीक घाटपुरी इथं काल रात्री ही
दुर्घटना घडली.
****
शेगांवहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत
गजानन महाराजांच्या पालखीचं काल परभणी शहरात आगमन झालं. पालखीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात
आलं
****
No comments:
Post a Comment