Saturday, 22 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद नजीक लासूर स्टेशन इथं शिवसेनेच्यावतीनं उभारण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर ते शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. शिवसेनेच्यावतीनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्ह्यात अशी केंद्र उभारण्यात आली आहेत.
***

 देशभरात सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात, बांबू आणि औषधी वनस्पतींची लागवड करावी, असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. या संदर्भातली पत्रं, सर्व राज्य सरकारांना पाठवण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत दिली.
***

 पंढरपूर इथल्या आषाढी एकादशीनिमित्त भाविकांसाठी निझामाबाद - पंढरपूर - निजामाबाद ही रेल्वे आजपासून सोळा जुलैपर्यंत पूर्ववत धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
***

 दिवंगत अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज औरंगाबाद इथं, महात्मा गांधी मिशनच्या चित्रपट कला विभागात आज संध्याकाळी विशेष अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र आणि एमजीएम यांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात, एमजीएम चित्रपट कला विभागप्रमुख दिग्दर्शक शिव कदम हे गिरीश कर्नाड यांच्या आठवणींना उजाळा देतील. यावेळी उंबरठा हा गिरीश कर्नाड अभिनीत चित्रपट दाखवण्यात येणार आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरु केले जाणार आहेत. शासन निर्णयान्वये अमराठी शाळांमधल्या आठवी, नववी आणि दहावीच्या अल्पसंख्यांक समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या १ जुलै ते ३१ मार्च २०२० या कालावधीत हे मराठी भाषा फाउंडेशन वर्ग सुरु राहणार आहेत. जिल्ह्यातल्या अमराठी शाळांनी २५ जून पर्यंत यासाठी आपले प्रस्ताव पाठवावेत, असं आवाहन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केलं आहे.
***

 बीड शहरासह जिल्ह्यात काल रात्री पावसाने चांगलीच हजेरी लावली. हा पाऊस रात्रभर सुरु होता. दरम्यान, पावसाची सुरूवात होताच वीज पुरवठा खंडित झाला. खंडीत झालेला वीज पुरवठा आज सकाळ पर्यंत खंडितच असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: