Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 22 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v योग संबंधित संशोधनावर अधिक भर देण्याची गरज पंतप्रधानांकडून
व्यक्त; पाचवा जागतिक योग दिवस सर्वत्र उत्साहाने साजरा
v राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी असल्याचा धनंजय मुंडे यांचा आरोप
v मुस्लीम महिला विवाह संरक्षण विधेयक लोकसभेत काल नव्यानं
सादर
v वस्तू आणि
सेवा करांतर्गत व्यवसाय नोंदणी आता आधार च्या माध्यमातून अधिक सुलभ
आणि
v मराठवाडा
आणि विदर्भाच्या सीमेवर भूकंपाचा सौम्य धक्का
****
योग संबंधित संशोधनावर अधिक भर देण्याची गरज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते काल पाचव्या जागतिक योग दिनी, झारखंडमध्ये
रांची इथं योगाभ्यासापूर्वी बोलत होते. योग हा आरोग्याचा आधारस्तंभ व्हावा, यासाठी
गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकार योग आणि आरोग्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न
करत असल्याचं, मोदी म्हणाले. शहरांपासून खेड्या-पाड्यांपर्यंत योग पोहोचवण्यासाठी प्रयत्न
केले पाहिजेत, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीभवनात
योगाभ्यास केला. देशभरात सर्वत्र योगदिन उत्साहात साजरा झाला. राज्याचा मुख्य कार्यक्रम
नांदेड इथं आयोजित करण्यात आला, राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे योग दिन उत्साहात साजरा
करण्यात आला. नांदेड इथं आयोजित मुख्य कार्यक्रमात, योग गुरु बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुमारे एक लाख दहा हजारापेक्षा अधिक योग अभ्यासकांनी,
योगासनं करून विक्रम नोंदवला. या विक्रमाची गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली,
याबाबतचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री आणि रामदेव बाबा यांना प्रदान करण्यात आलं. योगाभ्यासाच्या माध्यमातून, जीवन कायमस्वरुपी निरोगी आणि आरोग्यदायी
बनवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
औरंगाबाद इथं, विभागीय क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात
योग अभ्यासक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. जालना शहरात अनय उद्यानात आयोजित योग शिबीरात
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले. शहरातून जनजागृती फेरीही
काढण्यात आली. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हा प्रशासन, पतंजली योग आणि प्रजापिता
ब्रह्माकुमारी यांच्या वतीनं योग प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. केंद्रीय राखीव पोलिस
दलाच्या प्रशिक्षण केंद्रातही योगासनांचं शिस्तबद्ध प्रात्यक्षिक पहायला मिळालं. हरंगुळ
इथं, जनकल्याण निवासी विद्यालयात योगगुरू चन्नय्या स्वामी यांच्या मार्गदर्शनात योगासनं
करण्यात आली. परभणी इथं क्रीडा संकुलासह तालुक्यात सर्वच ठिकाणी योग शिबीरं घेण्यात
आली. हिंगोली, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातही जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाल्याचं
आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे, असा
आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते काल विधीमंडळ
परिसरात बातमीदारांशी बोलत होते. राज्यात आजही हजारो शेतकरी असे आहेत, ज्यांना कर्जमाफीचं
प्रमाणपत्र मिळूनही, अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही, असा आरोप मुंडे यांनी केला.
****
राज्यातल्या महाविद्यालयांत प्राध्यापक भरती प्रक्रियेत
गैरव्यवहार झाल्याची तक्रार आल्यास, सखोल चौकशी करुन, दोषींवर कारवाई केली जाईल, अशी
माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी काल विधानपरिषदेत दिली.
दरम्यान, प्राध्यापकांचं वेतन वेळेवर न करणाऱ्या
शिक्षणसंस्था चालकांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा उच्च
आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल विधानपरिषदेत दिला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रलंबित अनुदान, शेतकऱ्याच्या
खात्यावर लवकरच वळते करणार असल्याचं, सहकारमंत्री सुभाष देसाई यांनी काल विधान परिषदेत
सांगितलं. कृषी कर्ज एक रकमी परतफेड योजनेला येत्या
३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं, देसाई यांनी सांगितलं.
शासनाचं भागभांडवल नसलेल्या बॅंकामध्ये, नोकर भरतीला
आरक्षण लागू करण्यासाठी, सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्यात
येईल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं.
नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर केला जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत दिली.
गडचिरोली जिल्ह्यात एक मे रोजीच्या नक्षलवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांना
आर्थिक मदत दिली असून, लवकरच नोकरी देण्यात येणार आहे. या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याचं
निलंबन करण्यात आलं असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.
****
राज्यातील अल्पसंख्याक समुहातील घटकांचा आर्थिक,
सामाजिक आणि शैक्षणिक विकास होऊन त्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याकरता शासनमार्फत
विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे
यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतची लक्षवेधी सूचना
सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते.
****
कृष्णा खोऱ्यातील २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचा
निर्णय झालेला असून सतत दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाड्याला हक्काचं पाणी द्या,
अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत केली. ते दुष्काळावरच्या चर्चेत बोलत
होते. लातूर शहरासाठीच्या अमृत योजनेचं काम, वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्ण झालेलं नसल्यामुळं
हे कंत्राट रद्द करण्यात यावं अशी मागणी देशमुख यांनी केली.
आदिवासी विद्यार्थ्यांचे शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तकांसाठी
४९ कोटी ७० लाख रुपये निधह बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री
अशोक उईके यांनी दिली
****
नांदेड जिल्ह्यातल्या दोन रस्त्याचं अर्धवट काम केलेल्या
कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली असून, त्याचं नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येणार
असल्याचं, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. या रस्त्यांचं
काम नवीन कंत्राटदाराकडून पूर्ण केलं जाणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मुस्लीम महिला विवाह संरक्षण विधेयक लोकसभेत काल नव्यानं
सादर करण्यात आलं. विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक लोकसभेत सादर
करताच, काँग्रेस आणि एमआयएमसह विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. एखाद्या
विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्याला आपल्या पक्षाचा विरोध असल्याचं, कॉग्रेस सदस्य शशी थरुर यांनी सांगितलं.
****
वस्तू आणि सेवा करांतर्गत व्यवसाय नोंदणी आता आधार क्रमांकामार्फत केली जाणार आहे.
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं घेतलेल्या
या निर्णयाची महसूल सचिव अजय भूषण पाण्डे यांनी काल माहिती दिली. वस्तू
आणि सेवा कराचं विवरण पत्र भरण्यालाही दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तीस
ऑगस्टपर्यंत हे विवरणपत्र भरता येणार आहे. जीएसटी नफाखोरी प्रतिबंधक प्राधिकरणालाही
दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला
आहे.
****
मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर काल रात्री भूकंपाचा धक्का बसला. रात्री सुमारे
सव्वा नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीन पूर्णांक
एक एवढी नोंदवली गेली. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात तसंच नांदेड जिल्ह्याच्या
किनवट आणि माहूर तालुक्यात भूकंपाचा धक्का जाणवला. यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळपास २४
गावांमध्येही काल भुकंपाचा धक्का जाणवला. यामुळे भयभीत नागरिक घराबाहेर पडल्याचं आमच्या
वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. बीड
शहरातही काल रात्रभर पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही
कळंब तालुक्यात नायगावसह काही भागात काल पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद इथं आज सकाळपर्यंत
पाऊस सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
दरम्यान,
मराठवाडयात बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार
पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत. या कालावधीत विजा
पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी तसंच नागरिक यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
क्रिकेट
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल श्रीलंकेनं इंग्लंडचा २० धावांनी
पराभव केला. श्रीलंकेनं दिलेल्या २३२ धावांचं लक्ष्य गाठताना, इंग्लंडचा संघ ४७ व्या
षटकात २१२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयामुळे श्रीलंकेचे सहा गुण झाले असले तरीही,
इंग्लंड सात गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. या स्पर्धेत आज भारत आणि
अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद
दौऱ्यावर येत आहेत. लासूर स्टेशन इथं शिवसेनेच्यावतीनं उभारण्यात आलेल्या पीक विमा
मदत केंद्राची ते पाहणी करणार आहेत, शेतकऱ्यांशीही ते संवाद साधणार आहेत.
****
राज्यात दुष्काळसदृष्य जिल्ह्यांमध्ये राज्य मार्ग परिवहन मंडळातल्या चालक तथा वाहक पदांच्या
रिक्त जागांवर सरळसेवेने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहनमंत्री दिवाकर
रावते यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. यामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी सह बारा
जिल्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि
हिंगोलीसह तीव्र पाणीटंचाई असलेल्या दुष्काळग्रस्त नऊ जिल्ह्यातल्या १२ तालुक्यातल्या
१९ गावांना, राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती रावते
यांनी दिली.
*****
***
No comments:
Post a Comment