आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
जी ट्वेंटी शिखर परिषदेला जपानमधल्या ओसाका इथे आज सुरुवात
झाली.” मानव केंद्रित भावी समाज”, हा या परिषदेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्यासह अनेक राष्ट्रांचे प्रमुख दोन दिवसांच्या या परिषदेला उपस्थित आहेत. दरम्यान,
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
केली, आज सकाळी झालेली, भारत, जपान आणि अमेरिका, अशी त्रिपक्षीय चर्चाही यशस्वी ठरल्याची
माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली.
****
केंद्र सरकार, ”एक राष्ट्र,एक शिधापत्रिका” असं धोरण अंमलात
आणणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत अन्न
सुरक्षेबाबतच्या एका बैठकीत ही माहिती दिली. हे धोरण अंमलात आल्यानंतर देशभरात कोणत्याही
राज्यातल्या रास्त भाव दुकानांसाठी एकच शिधापत्रिका चालू शकेल.
****
पृथ्वी दोन या अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्राची काल ओडिशातल्या
चांदीपूर इथे दुसरी यशस्वी चाचणी झाली. साडेतीनशे किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीवरून जमिनीवर
मारा करू शकणारं हे क्षेपणास्त्र एक हजार किलो वजनाची अस्त्रं वाहून नेऊ शकतं.
****
क्षयरोगाचे उपचार आणि निर्मूलनासाठी मदत व्हावी, म्हणून भारतानं
जागतिक बँकेसोबत चाळीस कोटी डॉलर्सचा कर्ज करार केला आहे. क्षयरोगामुळे भारतात दरवर्षी
सुमारे पाच लाख लोक मरण पावतात. जागतिक बँकेच्या मदतीनं देशातल्या नऊ राज्यांमध्ये
हा उपक्रम राबवला जाणार असून, यामुळे, २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याच्या योजनेला
बळकटी मिळणार आहे. या मोहिमेतून, प्रतिजैविकांचा उपयोग न होणाऱ्या रुग्णांच्या उपचारावर
विशेष भर दिला जाणार आहे.
****
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. नरसिंह राव यांनी अत्यंत
कठीण काळात देशाचं नेतृत्व करत प्रगतीसाठी जी पावलं उचलली, त्याबद्दल ते कायम स्मरणात
राहतील, असं ट्वीट मोदी यांनी केलं आहे.
****
देशात मॉन्सूनची उत्तरेकडची प्रगती कमी झाली असली तरी तो
राज्यात सक्रिय झाला आहे. काल राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. आज मराठवाड्यात
अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज हवमानखात्यानं वर्तवला आहे.
**********
No comments:
Post a Comment