Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी नवी
दिल्लीत आघाडीच्या अर्थशास्रज्ञांशी संवाद साधणार आहे. आर्थिक विकासाचा दर वाढवणे आणि
रोजगार निर्मितीसाठी आर्थिक धोरण निश्चित करण्यासाठी या वेळी चर्चा करण्यात येणार आहे.
नीति आयोगानं या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. आर्थिक विषयातील इतर तज्ञ आणि उद्योजक
देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सूचना मांडणार आहेत. अर्थमंत्री निर्मला
सितारामन या पुढील महिन्याच्या पाच तारखेला अर्थसंकल्प सादर करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर
होत असलेले हे चर्चासत्र महत्वपूर्ण मानले जात आहे.
****
नैऋत्य मान्सून बिहार, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये
आणखी पुढे सरकला आहे. पूर्णियामधून मान्सूननं बिहारमध्ये प्रवेश केला तर ओडिशामधल्या
किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्येही मान्सून पोहचला आहे. येत्या दोन दिवसांत दोन्ही राज्यांमध्ये
हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं
वर्तविली आहे. आंध्र प्रदेशमध्येही मान्सूननं प्रवेश केला असून तेलंगानाच्या अनेक भागांमध्ये
हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर आणि रायलसीमा
भागांमध्ये देखील हलक्या आणि मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या असल्याचं हैदराबादच्या वेधशाळेनं
म्हटलं आहे. तर नैऋत्य मान्सूनला उत्तर प्रदेशमध्ये पोहचण्यासाठी आणखी ७२ तास लागणार
असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
****
आर्थिक कारवाई कृती दल अर्थात एफ ए टी
एफनं पाकिस्तान दहशतवादाला आर्थिक रसद पुरवणाऱ्या गटाविरोधात कारवाई करण्यास
अपयशी ठरला असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पाकिस्तान या गटाविरोधातली कारवाई ऑक्टोबर
२०१९ पर्यंत पूर्ण करावी; अन्यथा पाकिस्तानला परिणामांना सामोर जावं लागेल, असं एफ
ए टी एफनं म्हटलं आहे. एफ ए टी एफ आर्थिक दहशतवादाला
आर्थिक रसद पुरवणे, आर्थिक अफरातफर आणि निशस्त्रीकरणाविरोधात कारवाई करण्यास अपयशी
ठरलेल्या देशांविरोधात आंतरराष्ट्रीय मानांकन आणि आंतरराष्ट्रीय धोरण निश्चित करणारी
जागतीक संस्था आहे. पाकिस्तान बरोबरच इराण देखील आंतरराष्ट्रीय कृती दल कारवाई आराखड्याप्रमाणे
कारवाई करण्यास कमी पडल्यास ऑक्टोबर २०१९ नंतर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
****
ज्या बॅंकांमध्ये शासनाचं भाग भांडवल नाही अशा
बॅंकामध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे, यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय
नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी
काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. यवतमाळ येथील
जिल्हा सहकारी बॅंकेची नोकर भरती खुल्या संवर्गातून करण्यात येत असल्यासंबधी सदस्य
हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
****
केंद्र सरकारनं घेतलेल्या ‘स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह
स्पर्धेत’ कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात पहिला, तर देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ २४
जून रोजी नवी दिल्ली इथं होणार आहे. केंद्र शासनाच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयानं एक
ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत देश पातळीवर स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह स्पर्धेचं आयोजन केलं होत. झारखंडमधल्या
गिरिधीह जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला असून तेलंगणामधले पेडापल्ली हे तिसऱ्या स्थानी राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी
अमन मित्तल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
****
अहमदनगर एम आय डी सी तील मुळा
धरणातून आणल्या जाणाऱ्या पाण्यातून बीड जिल्ह्याला पाणी दिले जात आहे. मुळा धरणातून
बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी टॅंकर भरण्यास शासनाने
परवानगी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणांहून
२२ टॅंकरद्वारे आष्टी तालुक्याला पाणी दिलं जात असल्यामुळं तालुक्यातील पाणीटंचाई काही
अंशी कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारताच्या पंकज आडवाणी
याने दोहामध्ये खेळल्या गेलेल्या ३५ व्या पुरुष आशियायी स्नूकर करंडक स्पर्धेचे विजेतेपद
पटकावले आहे. पंकज आडवाणीनं ठाणावत तिरपोंगाईबुनचा ६-३ अशा फरकानं पराभव करत स्नूकरमध्ये
आशियायी आणि जागतीक स्पर्धेच्या सर्व प्रकारच्या खेळातले जेतेपदक जिंकणारा एकमेव खेळाडू
बनला आहे. आडवाणी यानंतर पुढील आठवड्यात दोहामधेच खेळल्या जाणाऱ्या आय बी एस एफ जागतीक विश्वचषक स्पर्धेत
सहभागी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment