Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
आजचे युवक पुस्तक न वाचता `ई बुक्स` वाचनं जास्त पसंद
करत असल्यानं आगामी काळात अधिकाधिक पुस्तकांचं डिजिटलायझेशन होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन
राज्यपाल सी. विद्यासागार राव यांनी केलं आहे. ते राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात
बोलत होते. राज्य शासनानं सर्व शासकीय ग्रंथालयाचं डिजिटलायझेशन करण्याचा प्रकल्प हाती
घेण्याबरोबरच मराठी `डिजिटल ई ग्रंथालयं` सुरु करणं आवश्यक असल्याचंही राज्यपाल विद्यासागर
राव यावेळी म्हणाले.
****
शैक्षणिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत
व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश जातपडताळणी प्रमाणपत्र नाही म्हणून थांबवले जाणार
नाहीत, अशी ग्वाही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत
दिली. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय
आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होण्यापूर्वी
जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याचंही
तावडे म्हणाले. आज सकाळी यासंदर्भात बैठक घेतली, त्यात यावर तोडगा निघाल्याचं तावडे
यांनी यावेळी सांगितलं.
****
पस्तीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सोसूनही राज्य
सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांमुळं वित्तीय तूट कमी राखण्यात सरकारला यश आलं असल्याचं
राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याचा
विरोधकांचा आरोप फेटाळून लावताना ते आज बोलत होते. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा
लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहील तसंच ३१ जुलैपर्यंत
मुख्यमंत्री यासंदर्भात आवश्यक घोषणा करतील, अशी माहितीही केसरकर यांनी अर्थसंकल्पावरच्या
चर्चेला उत्तर देताना दिली.
****
राज्यस्तरीय समितीनं मंजूर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या
ऊसतोडणी यंत्रांचं अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
आज विधानपरिषदेत दिली. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील काही शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचं
अनुदान मिळण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी मांडली होती, त्याला
उत्तर देताना देशमुख बोलत होते. राज्यात आतापर्यत राज्यस्तरीय प्रकल्प समितीनं मंजूर
केलेल्या शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचं अनुदान दिलेलं आहे. ऊर्वरित शेतकऱ्यांना प्रकल्प
मंजूरी समितीच्या चार जुलै रोजी होणाऱ्या सभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून
त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही सुभाष देशमुख यावेळी म्हणाले.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातल्या जांभूळखेडा
गावाजवळ महाराष्ट्रदिनी झालेल्या भूसुरुंगस्फोटप्रकरणी पोलिसांनी आज आणखी तीन जणांना अटक केली आहे. सोमनाथ
मडावी, किसन हिडामी, आणि सुकरु गोटा अशी आरोपींची नावं आहेत. न्यायालयानं तिघांनाही
बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलेले आमदार अब्दूल सत्तार
यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. आपण त्यांची सदिच्छा
भेट घेतल्याची माहिती सिल्लोडचे आमदार सत्तार यांनी अर्धातासाच्या या बैठकीनंतर दिली.
शिवसेनेत प्रवेश करण्यासंदर्भात या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही आणि आपण स्वतंत्र
नेता असून कोणत्याही पक्षाच्या नेत्याची भेट घेण्यास मुक्त आहोत, असंही त्यांनी यावेळी
म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं काँग्रेसनं त्यांना
काढून टाकलं होतं.
****
लातूर इथं सामाजीक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या
वतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या
जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
पी.शिवशंकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
औरंगाबादमधे मिलकॉर्नर इथल्या शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या
वतीनं अभिवादन करण्यात आलं. महानगरपालिकेच्या वतीनं महापौर नंदकुमार घोडेले तसंच अन्य
अधिकारी -पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
कोल्हापूरचे विचारवंत ईस्माईल पठाण यांचं `राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक समानता`
या विषयावर व्याख्यान झालं.
****
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर
अर्धनग्न मोर्चा काढला. महापोर्टल `ऑनलाईन` परीक्षा पध्दती रद्द करून जिल्हा निवड समितीकडून
`ऑफलाईन` पध्दतीनं परीक्षा घेण्यात यावी, पोलिस उपनिरिक्षक परिक्षा संयुक्त परीक्षेमधून
वगळून स्वतंत्र घेण्यात यावी, पोलिस भरतीचं वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावं, आदी
मागण्यांचं निवेदन विद्यार्थी कृतीसमितीतर्फे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment