Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20
June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्याचा समन्यायी विकास व्हावा या उद्देशानं आघाडी
सरकारनं नेमलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या
अहवालातील शिफारशी आहेत तशा स्वीकारणं शक्य नाही, यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय
होण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट
केलं . काँग्रेसचे शरद रणपिसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. केळकर समितीच्या
अहवालात, तालुका घटक मानून शिफारसी करण्यात
आल्या आहेत, त्या विभाग घटक मानून करणं अपेक्षित होतं यामुळं अहवालातील अनेक गोष्टींवर
विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक आमदारांचा आक्षेप आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, पाणीपुरठ्याच्या मुद्दावर विरोधीपक्ष सदस्यांनी भाजपच्या नेतृत्त्वाखालील
सरकारवर टीका केली. यावेळी झालेल्या गोंधळामुळं
विधानसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं होतं.
नदीपात्र वाळू उपशासाठी खनिकर्म महामंडळाला सर्वाधिकार देण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान
परिषदेत केली. विनायक मेटे यांनी जालना आणि
बीड मधल्या वाळूमाफियां विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली
होती. जिल्हा परिषदेच्या शाळा, खोल्या दुरुस्तीबाबत असलेल्या वेगवेगळ्या निधींना एकत्र
करुन त्याद्वारे दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याची, माहिती
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील
अनेक मौल्यवान दागदागिने, वाहिलेल्या वस्तू व पुरातन नाणी गैरव्यवहाराची राज्य गुप्तवार्ता
विभागामार्फ चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी आज
विधानपरिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र
राज्याच्या विकासासाठी मुंबई महानगर विभागीय विकास प्राधिकरणाच्या धरतीवर महाराष्ट्र
राज्य विभागीय विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर
आणि नागपूर सारख्या विकास केंद्रांसाठी यापुर्वीच विकास प्राधिकरणांची स्थापना करण्यात
आली असल्यानं राज्यस्तरीय स्वतंत्र प्राधिकरणाची आवश्यकता नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी यावर म्हटलं.
****
शेतकऱ्यांकरता असलेली पीक विमा योजना, पंतप्रधान किसान
सन्मान योजना, दुष्काळी मदत आणि अन्य कृषीविषयक योजनांचे लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांना
आता एकच अर्ज करावा लागेल अशी सुविधा महाडीबीटी या नवीन पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध
करून देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली आहे .
विधानभवनातील कृषी विभागाच्या बैठकीत ते आज बोलत होते.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या नांदेडमध्ये सकाळी पाचवाजेपासून
राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. योग दिनाच्या अनुशंगानं औरंगाबाद शहरात आज सकाळी
माहिती आणि प्रसारण मंत्रालय, योगसंवर्धन संस्था आणि शासकीय क्रीडा विभागाच्या संयुक्त
विद्यमानं योग दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये शहरातल्या विविध योग संस्था, शालेय विद्यार्थी,
महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
बेरोजगारीच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर
मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. सरकारविरोधी घोषणा यावेळी देण्यात आल्या. पंतप्रधानांनी
जाहीर केलेल्या रोजगार निर्मितीची अधिकृत माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर
जाहीर करावी, शासनाच्या विविध विभागातल्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, सुशिक्षित
बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात याव्या याप्रमुख मागण्यांचं निवेदन यावेळी विभागीय
आयुक्तांना सादर करण्यात आलं.
****
नैऋत्य मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आहे. येत्या
दोन ते तीन दिवसांत तो राज्यभर सक्रीय होईल असा
अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
दरम्यान आज हिंगोली जिल्ह्यात गोरेगांव परिसरात पूर्वमोसमी पाऊस झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या मरबे इथं संदेश यशवंत पाटील या
शेतकऱ्यास जिल्ह्यातल्या पहिल्या सौर कृषीपंप जोडणीचं वितरण जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत
नारनवरे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या सौर प्रकल्पामुळं दिवसा विना व्यत्यय वीज
मिळू शकेल, ही शेतकऱ्यांसाठी जमेची बाजू ठरणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलं.
****
No comments:
Post a Comment