Monday, 24 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जून २०१९ सायंकाळी ६.००
****

 राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची लाचलुचपत प्रतिबंधक  विभागामार्फत खुली चौकशी करावी तसंच या कामांचं त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. तक्रारी प्राप्त झालेल्या राज्यातल्या १३०० जलयुक्त शिवारच्या कामांची विभागीय चौकशी सुरू आहे, या चौकशीचा तांत्रिक अहवाल आल्यानंतरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही एसीबीच्या चौकशीची मागणी लावून धरली. यावेळी सावंत आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळं सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवला.
****
 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातल्या अभियांत्रिकीच्या पेपरफूटी प्रकरणाची केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभाग - सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल आणि त्याचा अहवाल दोन महिन्यांमध्ये पटलावर ठेवण्यात येईल असं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना दिलं.

 दरम्यान, सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेत झालेल्या अनियमीतते विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असं आश्‍वासनही रविंद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिलं.
****
 विधानसभेतील काँग्रसच्या गटनेतेपदी बढती मिळालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार  यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज निवड करण्यात आली.
****

मराठवाडा साहित्य परिषदेचे वांगमय पुरस्कार आज जाहीर झाले आहेत. नरहर कुरुंदकर पुरस्कारासाठी सुपडा भिकू वराडे यांच्या `पहिल्या सरिचा मृदुगंध` या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे. म. भि. चिटणीस पुरस्कार सोलापूरचे समीक्षक डॉ. दत्ता घोलप यांच्या ` मराठी कादंबरी : आशय आणि अविष्कार ` ग्रंथाला जाहीर झाला आहे. कुसुमावती देशमुख पुरस्काराकरता नांदेडच्या सुचिता खल्लाळ‍ यांच्या `प्रलयानंतरची तळटीप` काव्य संग्रहाची निवड झाली आहे. बी. रघुनाथ पुरस्कारासाठी कोल्हापूरचे किरण गुरव यांच्या `जुगाड` या कादंबरीची शिफारस करण्यात आली आहे. कुमार देशमुख नाट्यपुरस्कार प्रेमानंद गज्वी यांच्या `छावणी` या नाटकाला तसंच रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार पुण्याच्या अनुबंध प्रकाशन संस्थेच्या अनिल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या या पुरस्कारांचं वितरण २१ जुलै रोजी औरंगाबादमध्ये होणार आहे.
****

परभणी जिल्ह्यातल्या मानवत नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे प्रा.सखाहरी पाटील हे नऊ हजार ४३९ मताधिक्यांनी विजयी झाले आहे. प्रा.पाटील यांना बारा हजार २१० तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पूजा खरात यांना दोन हजार ७७१ मते मिळाली तर अपक्ष रतन वडमारे यांना २७३ मते मिळाली. काल या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होतं.
****

 लातूर इथं आज दुपारी एकच्या सुमारास सुमारे अर्धातास पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यात आज सकाळ पर्यंतच्या २४ तासांत सहा पूर्णांक ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यात पडलेल्या संतत धार पावसामुळं नदी नाल्यांना पुर आले असून पैनगंगा नदीला आलेल्या पुरात अंजिठा -  बुलडाणा मार्गावरील पुल वाहुन गेल्यानं वाहतूक बंद पडली आहे. काही भागातील पेरणीयोग्य पावसामुळं पेरणीला सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 वंचित बहुजन आघाडीनं आदेश दिल्यास आगामी विधानसभा निवडणूक निलंगा किंवा लातूर विधानसभा  मतदार संघातून लढण्यास तयार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे यांनी लातुरमधे पत्रकारांना सांगितले. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव  पाटील निलंगेकर यांनी यंदा जिल्ह्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही  डॉ. भातांब्रे यांनी यावेळी  केला.
****

 जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या केळीगव्हाण इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज दोन ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या साठवून ठेवलेला दोन हजार २७४ ब्रास वाळूसाठा जप्त केला असून याची किमंत तब्बल ६८ लाख २२ हजार रुपये आहे. या प्रकरणी संशयित अमोल मदन आणि केशवराव मदन यांच्या विरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 नाशिक शहरातल्या उंटवाडी इथल्या मुथूट फायनान्सवर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या सूत्रधारास नाशिक पोलिसांनी जेरबंद केलं आहे. जितेंद्र राजपूत असं त्याचं नाव असून त्याला गुजरात इथून अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
*****
***

No comments: