आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जून २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
जी ट्वेंटी देशांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सकाळी जपानमध्ये पोहोचले. जपानमध्ये
ओसाका शहरात उद्या आणि परवा ही परिषद होणार आहे. मानव केंद्रीत भावी समाज, हा यंदा
या परिषदेचा विषय आहे. या परिषदेपूर्वी मोदी आज सकाळी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि
उद्या सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण
विषयांवर चर्चा करतील. दरम्यान २०२२ मध्ये या परिषदेचं भारतात प्रथमच आयोजन होणार आहे.
****
आषाढी यात्रेच्या सगळ्या पालख्या येत्या सहा
आणि सात जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल
होणार आहेत, या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मार्ग तसंच पंढरपूर शहर आणि
परिसरातल्या वीज वितरण व्यवस्थेची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात
आली आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी अमरावती आगारातून जादा बसेस
सोडण्यात येणार आहेत. यामध्ये साधारण बससह, परिवर्तन, शिवशाही या गाड्यांचाही समावेश
असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात, एका मूकबधीर आणि गतीमंद मुलीला
पळवून नेत अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं एका ७० वर्षीय आरोपीस
१० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दिनकर त्र्यंबक भुटे असं या आरोपीचं नाव
असून, खामगाव तालुक्यात पारखेड इथं २८ मार्च २०१६ रोजी ही घटना घडली होती.
****
अमरावती जिल्ह्यात नागपूर मुंबई महामार्गावर लोणी
टाकळी जवळ स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणी पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल ५५ लाख रुपयांचा
गांजा जप्त केला. ट्रकचालक आणि त्याचा साथीदार मात्र पसार झाले.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात गर्दणी इथं ऊसाच्या शेतात पाणी भरत असतांना विजेचा शॉक लागून एक
महिला आणि तिच्या १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.
*****
***
No comments:
Post a Comment