Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
· आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती
करण्याची काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची सूचना.
· गृहनिर्माण आणि बांधकाम
क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
· महिलांना राजकीय आरक्षण देण्याची भारतीय जनता पक्षाची
भूमिका - प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे.
आणि
·
विश्वचषक
क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती
करण्याची सूचना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केली आहे. दिल्लीत काल त्यांनी
निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यातल्या पक्ष नेत्यांची बैठक घेतली, या बैठकीत बोलतांना
त्यांनी ही सूचना केली. बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण
यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची पक्षाची तयारी असल्याचं सांगितलं. काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे, मात्र अद्याप दोन्ही पक्षात जागा
वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
दरम्यान, पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष नाना पटोले यांनी
काल आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
सरकार पुढच्या वर्षीपर्यंत
देशात 'एक शिधापत्रिका' योजना राबवणार आहे. या नव्या योजनेनंतर
कुणीही गरीब व्यक्ती सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, एका भागातून दुसऱ्या भागात स्थलांतरित झालेल्या नागरिकांनाही वितरण व्यवस्थेचा लाभ विनासायास घेता येईल.
अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. ही योजना
लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं
असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्रासह इतर दहा राज्यांनी याआधीच या योजनेचा लाभ देणं
सुरु केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
‘स्टार्टअप इंडिया’योजने
अंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात एकोणीस हजार ३५१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली
असून, यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक तीन हजार
६६१ ‘स्टार्टअप’ उद्योगांची नोंदणी झाली आहे. वैकल्पिक गुंतवणुकीतही महाराष्ट्रानं
आघाडी घेत देशात दुसरा क्रमांक पटकवला आहे. राज्यात एकूण अडूसष्ट `स्टार्टअप`मध्ये ४४० कोटी ३८ लाख रुपयांची वैकल्पिक गुंतवणूक
झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
सहा आठवड्यांच्या
उन्हाळी सुटीनंतर, सर्वोच्च न्यायालयाचं
कामकाज उद्यापासून सुरू होत आहे. अयोध्या राम जन्मभूमी प्रकरण, राफेल खरेदी प्रकरण आणि राहुल गांधी यांच्याविरोधातलं न्यायालय अवमान प्रकरण आदी संवेदनशील खटल्यांवर यापुढे सुनावणी होणं अपेक्षित आहे. सरन्यायाधीश
रंजन गोगोई यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च
न्यायालयाचं कामकाज आपल्या संपूर्ण क्षमतेसह म्हणजे सर्व ३१ न्यायमूर्तींसह सुरू होईल, असं पीटीआय वृत्तसंस्थेनं
नमूद केलं आहे.
****
गृहनिर्माण आणि बांधकाम
क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राशी निगडीत
विविध विषयांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. या क्षेत्राला
भेडसावणाऱ्या समस्यांवर निश्चित ठोस उपाय शोधले जातील अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली.
****
पावसामुळं पुण्यात
काल भिंत कोसळून दगावलेल्या पंधरा जणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं नातेवाईकांना प्रत्येकी पाच
लाख रुपये आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. काल पहाटेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत बिहार आणि पश्चिम बंगालमधून
आलेल्या कामगारांच्या कुटुंबातल्या पंधरा जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश
दिले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार
रुपये मदत आणि मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या
‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रमानंतर लगेच, प्रादेशिक भाषांमधून पंतप्रधानांच्या संवादाचा अनुवाद
प्रसारित होईल, आज रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुन:प्रसारण केलं जाणार आहे. प्रत्येक
महिन्याच्या अखेरच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रम मालिकेचा हा ५४ वा भाग
असेल. पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातला
हा पहिलाच कार्यक्रम आहे.
****
महिलांना राजकीय आरक्षण मिळावं ही भारतीय जनता पक्षाची
भूमिका आहे, त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक महिला
खासदार निवडून आल्या आहेत असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हटलं आहे. ते
काल नाशिक इथं भाजप महिला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्षा विजया रहाटकर आणि भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा माधवी नाईक यांनी, येत्या
राखीपौर्णिमेपासून सभासद नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
शीतल जाधव यांची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. उपाध्यक्षपदी
काँग्रेसच्या अश्विनी तुपडाळे यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या
शीतल जाधव आणि भाजपच्या दिपाली लाड यांच्यात झालेल्या लढतीत दोघींनाही समान मतं मिळाली,
त्यामुळे काढण्यात आलेल्या चिठ्ठीद्वारे जाधव यांची निवड जाहीर करण्यात
आली.
****
औरंगाबादच्या विश्व संवाद केंद्रातर्फे दिला जाणारा देवर्षी नारद पत्रकारिता
पुरस्कार यावर्षी बीडचे पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. प्रांत संघचालक मधुकर जाधव यांच्या प्रमुख
उपस्थितीत मंगळवारी या पुरस्काराचं वितरण औरंगाबाद इथल्या मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात होणार आहे, अशी माहिती
देवगिरी प्रांतचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे यांनी दिली.
****
क्रिकेट:
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज यजमान इंग्लंड
आणि भारत यांच्यात सामना होणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी पाच सामन्यात भारतानं
विजय मिळवला असून, एक सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
या स्पर्धेत काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा
तर ऑस्ट्रेलियानं न्युझीलंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्ताननं पाकिस्तानला विजयासाठी
२२८ धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयानंतर गुणतालिकेत पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेतल्या अन्य सामन्यात, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं विजयासाठी न्यूझीलंडला
२४४ धावांचं लक्ष्य दिलं होतं, मात्र न्युझीलंडचा संघ ४४व्या षटकांत १५७
या धावसंख्येवर सर्वबाद झाला.
****
विद्यापीठं फक्त परीक्षेपुरती मर्यादीत न राहता तिथून
संशोधन होण्याची आवश्यकता त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर
यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात
बोलत होते. समाज बदलायचा असेल तर शिक्षण बदललं पाहिजे, राष्ट्राची आणि चारित्र्याची
उभारणी शिक्षणामधून करण्याची गरज असल्याचं मत धारुरकर यांनी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून
आला आहे. जिल्हाधिकारी
उदय चौधरी यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी, निमअर्कासह योग्य त्या उपाय योजना येत्या
आठ दिवसात कराव्यात, असं आवाहन जिल्हा कृषी
अधिकारी तुकाराम मोटे यांनी केलं.
****
राज्यात कालही अनेक भागात चांगला पाऊस झाला. औरंगाबाद
शहरात काल रात्री तर, परभणी शहरासह जिल्ह्यात काल दमदार पाऊस पडला. मानवत, पाथरी,
जिंतूर, सोनपेठ, तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
लातूर महानगरपालिकेनं केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीसोबत
पथदिव्यांबाबतचा करार केला आहे. यानुसार पहिल्या टप्यामध्ये सध्याचे पारंपारिक पद्धतीचे
९५ टक्के पथदिवे बदलण्यात येतील.
****
No comments:
Post a Comment