Tuesday, 25 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनानं पुरेशा उपाययोजना केल्या असून जिल्हास्तरावरुन टंचाई निवारण कक्ष सुरु केले असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल विधानसभेत दिली. त्रेचाळीस हजार गावं - वाड्यांसाठी एक हजार एकशे पस्तीस कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा विभागात तीन हजार ५२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 नवीन चारा येईपर्यंत सुरु असलेल्या जनावरांच्या चारा छावण्या चालू ठेवणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल दिली.
****

 मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांच्या थकीत वीज देयकापोटी एकही वीज जोडणी खंडीत केली नसल्याची माहिती काल विधानसभेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांकडे तीस हजार १९८ कोटींची थकबाकी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 बीड, जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्यानं गोदावरी पात्रात अधिकृत निविदा देण्यात आलेली नाही. अवैध वाहतुकीवर परिणामकारक कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं गेवराई तालुक्यातल्या   आगरनांदूर, संगम जळगाव, हिंगणगाव, रेवकी देवकी, पांगुळगाव, कटचिंचोली, भोगलगाव, राहेरी, गंगावाडी, रजापूर, बोरगाव बुद्रुक, गुंतेगाव, पाथरवाला बुद्रुक. गुळज, सुरळेगाव, मालेगाव बुद्रुक, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, सावळेश्वर, सावरगाव, खामगाव गावांमध्ये १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.
****

 पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं काल सायंकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. भानुदास एकनाथच्या जयघोषात अनेक वारकरी या पालखीसोबत मार्गक्रमण करत आहेत. पुणे जिल्ह्यात देहू इथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल टाळ मृदुगांच्या गजरात पंढपुरकडे प्रस्थान झालं. आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान करणार आहे.
*****
***

No comments: