आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त
बैठकीत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद अभिभाषण करणार आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात
त्यांचं भाषण होणार आहे. राज्यसभेचं कामकाजही आज सुरू होणार आहे. संसदेचं हे अधिवेशन सहव्वीस जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. पुढल्या
महिन्यात चार तारखेला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल आणि २०१९-२० या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत
पाच जुलैला सादर होणार आहे.
****
कोयना परिसराला आज सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी
भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. तीन पूर्णांक सात दशांश रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.
त्याचा केंद्बबिंदू कोयना परिसरातील देवरुख गावाच्या पुर्वेला सात किलोमीटर अंतरावर
होता, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. योग
दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. योगदिवसाचा मुख्य कार्यक्रम झारखंडमध्ये
रांची इथं होणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील. रांचीच्या कार्यक्रमात
तीस हजारहून अधिक योगसाधक सहभागी होणार असल्याचं वृत्त आहे. योगदिनाचा राज्यस्तरीय
कार्यक्रम नांदेड इथं होणार असून, योगगुरू बाबा रामदेव या कार्यक्रमात उपस्थितांकडून
योगाभ्यास करून घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.
****
नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष रेल्वेगाडीच्या
फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही गाडी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांत
नियमित वेळापत्रकानुसार धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेकडून
सांगण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात
काही भागात आज पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. दरम्यान, काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर परिसरात पावसानं हजेरी लावली.
****
औरंगाबाद-पुणे महामार्गावरील अहमदनगर हद्दीत चारचाकी
वाहनं अडवून लूटमार आणि वाहनं चोरणारी टोळी अहमदनगर जिल्हा गुन्हे
अन्वेषण शाखेनं अटक केली आहे. या टोळीतील चौघांना बीडच्या कालिकानगर भागातून अटक करण्यात
आली आहे. त्यांच्याकडून दोन वाहनं, मोबाईल असा एकूण पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल अहमदनगरच्या
गुन्हे शाखेनं जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment