Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 June 2019
Time 1.00
to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९ दुपारी १.०० वा.
****
सुमारे चार महिन्यांच्या
खंडानंतर आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी
संवाद साधला. जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून, पाण्याचा प्रत्येक
थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चित्रपट, क्रीडा, कथा-कीर्तन
क्षेत्रांतल्या धुरीणांनी, प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व
करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ‘हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती’ याचा उपयोग करून प्रत्येकानं
आपलं या विषयीचं मत, माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर ‘शेअर’ कराव्यात, असंही ते म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत
एकसष्ट कोटी लोकांनी मतदान केलं. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची ही आजवरच्या इतिहासातली
सर्वात मोठी निवडणूक होती, हे सांगतानाच, लाखो शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा
दलांनी दिवस-रात्र परिश्रम केल्यामुळेच निवडणुका पार पडू शकल्या, असंही त्यांनी आवर्जून
नमूद केलं. २१ जूनला जगभरात ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात आल्याबद्दल
त्यांनी जगभरातल्या नागरिकांचे आभार मानले.
तसंच, ‘बुके नाही
तर बुक’ या आपल्या आग्रहाचा पुनरुच्चार करतानाच, त्यांनी प्रेमचंद यांच्या कथांतील
काही भावलेल्या प्रसंगांचा उल्लेख केलाच, शिवाय वाचनसंस्कृती वाढवण्यात मोलाची भर घालणाऱ्या
केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाचं, गुजरातमध्ये राबवण्यात आलेल्या ‘वांचे गुजरात’ मोहिमेचं
उदाहरणही त्यांनी दिलं.
****
जम्मू काश्मीरच्या,
बडगाम जिल्ह्यातल्या, बुगाम चडूरा, भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये
झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. या परिसरात पोलीस आणि सुरक्षादलांनी
घेराव करून शोधमोहीम सुरू केली असता, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. घटनास्थळावर
हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आकाशवाणीला
दिली आहे. तसंच मृत दहशतवाद्याची आणि त्याच्या गटाची ओळख पटवण्याचं कामही सुरू असल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत, भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं
होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं थेट समालोचन
आकाशवाणी वरुन दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून प्रसारित केलं जाईल. आजचा सामना जिंकल्यास
भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित होईल, तर इंग्लंडचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
येईल. भारत सहा सामने खेळून ११ अंकासह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड सात सामने
खेळून आठ अंकासह पाचव्या स्थानावर आहे. काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा,
तर पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला.
****
हिंगोली ते वाशिम
रेल्वे मार्गावर, कनेरगावच्या, पैनगंगा नदीवरच्या, पुलाजवळ रुळाखालची, पट्टी तुटल्याचा
प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून,
या मार्गावर धावणारी अकोला-पूर्णा रेल्वे लाल झेंडी दाखवून थांबवल्यानं मोठा अनर्थ
टळला. पट्टी बदलण्याचं काम केल्यानंतर एक तासाने रेल्वेगाडी मार्गस्थ झाली.
****
काल रात्रीपासून औरंगाबादसह
मराठवाड्यात रिमझिम पाऊस सुरूच आहे. सर्वदूर झालेल्या या पावसानं मराठवाड्यातल्या जवळपास
प्रत्येक तालुक्यात तुरळक हजेरी लावली. औरंगाबाद शहरात आज सकाळी १८ पूर्णांक ४ मिलिमिटर
पावसाची नोंद झाल्याचं चिकलठाणा वेधशाळेनं सांगितलं. तसंच जिल्हाभरात सरासरी ४ पूर्णांक
३२, जालना जिल्ह्यात १२ पूर्णांक ४६, परभणीत १३ पूर्णांक ८१, हिंगोलीत १४ पूर्णांक
६२, नांदेडला १० पूर्णांक ३५, बीड जिल्ह्यात ९ पूर्णांक ४१, लातूरमध्ये ९ पूर्णांक
९१, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी ३ पूर्णांक ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचं
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.
दोन दिवसांपासून अहमदनगर
जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून, मुळा नदीवरील आंबित धरण भरले
आहे. त्यातून ५०० क्यूसेक्स वेगानं पाणी त्याखालच्या पिंपळखांड प्रकल्पात सोडलं जात
आहे.
****
No comments:
Post a Comment