Monday, 1 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****

 डिजिटल इंडिया मुळं जनतेचं सशक्तिकरण होत असुन भ्रष्टाचारावर योग्य प्रतिबंध तसचं गरिब जनतेपर्यंत सुविधा पोहचवण्यास मदत होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. चार वर्षाआधी आजच्या दिवशी डिजिटल इंडिया या योजनाची सुरवात झाली होती. डिजिटल इंडिया  हे एक जन-आंदोलन असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.
****

 वस्तु आणि सेवा कर म्हणजेच GST लागु होण्याच्या दोन वर्षानंतर विस राज्यांच्यां एकूण महसुल उत्पन्नात चौदा टक्के वाढ झाली असल्याचं, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. मागिल दोन वर्षात वस्तु आणि सेवा कर प्रणालीमुळं ग्राहकांवरचा करभार कमी झाला असुन कर वसूलीत सुधारणा झाली असल्याचं, वस्तु आणि सेवा कर परिषदेच्या प्रत्येक बैठकीत दिसुन आलं असल्याचंही जेटली म्हणाले.
****

 वातावरण बदलाच्या संकटाचं भीषण वास्तव आपल्या समोर असून, ते निवारण्याच्या कार्यात प्रत्येकानं आपली भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला आज चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथं आनंदवनातून प्रारंभ झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत्या महिनाभरात राज्यात किमान पस्तीस कोटी वृक्षारोपण होईल, असा विश्वास, मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यभरात येत्या तीस तारखेपर्यंत सर्वत्र ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
****

 पुण्यात गृहनिर्माण संस्थेची संरक्षक भिंत पडून पंधरा जणांच्या मृत्यूचा मुद्दा आज विधानसभेत शून्य प्रहरात अनेक सदस्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या कामागारांची नोंदणी करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. संबंधित विकासकाच्या हलगर्जीपणाकडे पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप, वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे विकासकासह महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, आणि दोषींवर कठेार कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. या घटनेतल्या जखमींच्या मदतनिधीत वाढ करावी अशी मागणीही त्यांनी यावेळेस केली.
****

 मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतच्या मुद्यावर विधान परिषदेत मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी निवेदन सादर केलं. यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेचा आढावा त्यांनी सदनासमोर मांडला. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यासंदर्भात आतापर्यंतच्या कार्यवाहीबाबत त्यांनी माहिती दिली. गणिताच्या इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमातलं संख्यावाचन, या बाबतही माहिती देताना, तावडे यांनी, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात एक समिती स्थापन केल्याचंही सांगितलं.

 मराठी भाषेसंदर्भातली उदासीनता दूर करण्यासाठी साहित्यिकांसह नेतेमंडळींनीही पुढाकार घ्यावा, महाबळेश्वर जवळ भिलार इथं उभारलेल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाला सर्वांनी भेट द्यावी, असं आवाहन तावडे यांनी केलं.
****

 भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात सीतासांवगी गावात विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कडून वाघाची २२ नखं, चितळाची सात शिंगं, आणि जनावरांचं मांस जप्त करण्यात आलं आहे. या आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत गुणतालिकेत श्रीलंका सहा गुणांसह सातव्या स्थानावर तर वेस्ट इंडीज तीन गुणांसह नवव्या स्थानावर आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव झाल्यामुळे, भारत गुणतालिकेत अकरा गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड अकरा गुणांसह तिसऱ्या तर इंग्लंड दहा गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
****

 टेनिसमधील प्रतिष्ठित विम्बलडन स्पर्धेला आजपासून लंडन इथं सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीत आज, नोवाक जोकोविच आणि फिलीप कोलश्राइबर तसंच रॉजर फेडरर आणि लॉयड हॅरिस यांच्यात सामना होणार आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.01.07.2019 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०१ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथाच्या यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. जवळपास बाराशे यात्रेकरुंचा पहिला जत्था अनंतनागचे उपायुक्त खालिद जहांगीर यांच्या उपस्थितीत पहलगाम तळावरून आज रवाना झाला. अमरनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याहस्ते शासकीय पुजेनंतर अमरनाथ दर्शनाला प्रारंभ होईल. ही यात्रा सुमारे शेहेचाळीस दिवस चालणार असून, येत्या १५ ऑगस्टला श्रावणी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी, या यात्रेचा समारोप होईल.
****

 जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात आज सकाळी एक बस दरीत कोसळून तेहेतीस प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २२ प्रवासी जखमी झाले. आज सकाळी हा भीषण अपघात झाला. आतापर्यंत सुमारे वीस प्रवाशांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले असून, मदतकार्य सुरू असल्याचं, पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलं.
****

 मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावला ते ठाकूरवाडी दरम्यान एका मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्यानं, या मार्गावरची रेल्वे वाहतुक आ सकाळपासूनच ठप्प झाली आहे. पावसामुळे हा अपघात झाल्याचं, सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे डेक्कन क्वीनसह अनेक रेल्वेगाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अंगावर वीज पडल्यामुळे दोन जण ठार झाले, तर दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. वरवट खंडेराव इथले शेतकरी श्रीकृष्ण ढमा, तसंच संग्रामपूरच्या जस्तगाव इथले युवराज गव्हांदे अशी मृतांची नावं आहेत.
****

 पंतप्रधानांनी मन की बात मधून केलेलं जलसंवर्धनाचं आवाहन राज्यातली जनता निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ते बोलत होते. राज्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.01.07.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०१९  सकाळी ७.१० मि.
****

Ø  पावसाच्या पाण्याचं संवर्धन करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला ‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन
Ø  गडचिरोली भुसुरूंग स्फोटप्रकरणी आणखी एका  जणास अटक
Ø  मराठवाड्यात रिमझिम पाऊस तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
Ø  लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप- शिवसेना युतीला यश मिळण्याची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आशा
आणि
Ø विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडकडून भारताचा  ३१ धावांनी पराभव
****

 देशातली प्रमुख धरणं आणि नद्यांच्या खोऱ्यातला पाणीसाठा घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाच्या पाण्याचं संवर्धन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. स्वच्छता मोहिमेसारखीच जलसंवर्धन ही जन चळवळ बनण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे  देशवासियांशी संवाद साधला. जल संरक्षणासाठी एक व्यापक जन आंदोलन उभारण्याची गरज असून, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चित्रपट, क्रीडा, कथा-कीर्तन क्षेत्रांतल्या धुरीणांनी, प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ‘हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती’ याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत, माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर ‘शेअर’ कराव्यात, असंही ते म्हणाले.
****

 पंतप्रधानांनी केलेलं जलसंवर्धनाचं आवाहन राज्यातली जनता निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ते बोलत होते. राज्यात गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवार अभियानातून लोकसहभागाद्वारे जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामं पूर्ण झाल्यानं शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****

 सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर तालुक्यातल्या प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी जावळी इथून रोपवे तयार करण्यात येणार असल्याची माहिती  राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार  असलेल्या या किल्ल्याला भेट देणं पर्यटकांना सोपं होणार आहे. साडेपाच किलोमीटर लांबीचा हा विशाल रोपवे प्रकल्प आशिया खंडातला सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असणार आहे, असं रावल यांनी यावेळी सांगितलं.
****

 गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भुसुरूंग स्फोटप्रकरणी पोलिसांनी कैलाश रामचंदानी या ३४ वर्षाच्या युवकास अटक केली आहे. कुरखेड्याचा रहिवासी असलेल्या या युवकास स्थानिक न्यायालयानं बारा जुलैपर्यंत  पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आठवर पोहोचली आहे. या स्फोटात १५ पोलिसांसह एक चालक मृत झाले होते.
****

मराठवाड्याच्या विविध भागात काल रिमझिम पाऊस झाला. सर्वदूर झालेला हा पाऊस  मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पडला. उस्मानाबाद, आणि हिंगोली जिल्ह्यात हलका पाऊस झाला तर सोलापूर शहरात काल सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरातही जोरदार पाऊस झाला. मुळा नदीवरील आंबित धरण भरले असून त्यातून ५०० घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी पिंपळखांड प्रकल्पात सोडलं जात आहे. भंडारदरा, निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू झाली आहे.

 मुंबई शहर आणि उपनगरात कालदेखील चांगला पाऊस झाला. मुंबईकरांना काल दिवसभर सूर्यदर्शनही झालं नाही. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार पाऊस होत आहे. कणकवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक घरात पाणी घुसले आहे. वेंगुर्ले तालुक्यात होडावडे पुलावरून पाणी गेल्याने सावंतवाडी- वेंगुर्ले मार्ग काही काळ बंद झाला होता. भुईबावडा घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे. या घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून आंबोलीसह सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत.

 दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे  कोकण, मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आणखी  तीन – चार दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबईसह विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही या दोन दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 लोकसभे प्रमाणेच राज्यात विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष प्रणित युतीला यश मिळेल अशी आशा केंद्रीय ग्राहक कल्याण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं काल  विविध विकासकामांचं भूमीपुजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. समृध्दी महामार्गामुळे बरेच उद्योग औरंगाबादसह जालन्याला प्राधान्य देत आहेत. येत्या अडीच वर्षात पूर्ण होणाऱ्या या मार्गामुळे औरंगाबाद-जालना ही जोडशहरं म्हणून विकसित होतील असं दानवे म्हणाले. यावेळी केंद्रात दानवे यांना तर राज्यात सावे यांना मंत्रीपद  मिळाल्यानं, त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
****

 ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात  सहकारी संस्थांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं  राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. काल, बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यात रायमोहा इथं  एका सहकारी पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या  हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात अनेक व्यवसाय हे सहकारी संस्थांवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले.
****

 घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडर्सच्या किमतीत शंभर रुपयांनी घट झाली आहे. भारतीय पेट्रोलियम महामंडळानं ही घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर कमी झाल्याने ही दरकपात करण्यात आली असल्याचं महामंडळानं काल स्पष्ट केलं .
****

 हिंगोली - वाशिम रेल्वे मार्गावर, कनेरगावनजिक पैनगंगा नदीवरच्या, पुलाजवळ रेल्वे रुळाखालची, पट्टी तुटल्याचा प्रकार काल उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून, या मार्गावर धावणारी अकोला-पूर्णा रेल्वे थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. पट्टी बदलण्याचं काम झाल्यानंतर एक तासानं ही रेल्वेगाडी मार्गस्थ झाली.
****

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल इंग्लंडनं भारताचा ३१ धावांनी पराभव पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने भारताला विजयासाठी ३३८ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ निर्धारित ५० षटकात केवळ ५ बाद ३०६ धावाच करू शकला. या सामन्यात भारताच्या रोहित शर्मानं १०२ धावा केल्या. इंग्लंडच्या १११ धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्ट्रोला सामनावीर  पुरस्कार देण्यात आला.
****

 पंढरपूर इथल्या विठ्ठल- रुक्मिणीचं ऑनलाईन दर्शन उपलब्ध करण्याचे अधिकार मंदिर समितीने जिओ आणि टाटा स्काय कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी ही माहिती दिली. आजारी, दिव्यांग तसंच कामाच्या धावपळीत ज्यांना पंढरपूरला येणं शक्य नाही, असे अनेक लोक आता ऑनलाईन दर्शन घेऊ शकतात, या माध्यमातून मंदिर समितीला ५० ते ६० लाख रूपयांचं उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली.
****

 राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जालना जिल्ह्यात एक कोटी, पाच लाख, ६७ हजार, ४५० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तीन हजार, ९७८ ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी वन विभागाकडे सव्वा कोटींहून अधिक रोपं तयार आहेत. जिल्ह्यातल्या ७७९ ग्रामपंचायतींना २५ लाख रोपांचं वाटप केलं जाणार आहे. शासकीय संस्थांबरोबरच जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्था, उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सहभाग घ्यावा, असं आवाहन वन विभागानं केलं आहे.
****

 राज्यभरातून अनेक दिंड्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. काल अहमदनगर  जिल्ह्यातल्या कानिफनाथ गडाची दिंडी मढी इथून तर, धामोरी इथली अडबंगी नाथांची तसंच  निवृत्ती नाथांची दिंडी आणि  नेवास्याची ज्ञानेश्वर माऊलींची दिंडीही पंढरपूरकडे रवाना झाली. जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेरची सखाराम महाराजांची दिंडी   औरंगाबाद नजिक दौलताबाद इथं आली असून आज ती पैठणकडे रवाना होईल.
****

 पुणे शहरात शुक्रवारी रात्री भिंत कोसळून झालेल्या १५ कामगारांच्या मृत्यु प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली, त्यांना जिल्हा सत्र न्यायालयानं  उद्या मंगळवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना इमारतीची ही संरक्षक भिंत कोसळली होती. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
****

 येत्या आषाढी एकादशीला भाविकांना पंढरपूरला जाता यावं म्हणून रेल्वे प्रशासनानं बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावहून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडीच्या चार फेऱ्या  करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ६ जुलैला पहिली रेल्वे सुटेल. यासाठी आरक्षित तिकिटांचीही व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना सवलतीच्या दरात आणि  प्राधान्यानं तिकीट उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अंगावर वीज पडल्यामुळे दोन जण ठार झाले, तर दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.01.07.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Sunday, 30 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2019 06.00PM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१९ सायंकाळी ६.००
****

 ‘बुके नाही तर बुक’ या आपल्या आग्रही उपक्रमाचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केला. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठीच पुष्पगुच्छ देण्याऐवजी पुस्तक देण्याची मोहीम उपयुक्त ठरत असून, अनेक ठिकाणी लोक याचं पालन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला भेट मिळालेल्या प्रेमचंद यांच्या कथांमधील उद्बोधक प्रसंग सांगत, त्यांनी केरळमधल्या इडुक्कीच्या घनदाट जंगलामध्ये वसलेल्या अक्षरा ग्रंथालया विषयी, तसंच गुजरातमध्ये यशस्वी ठरलेल्या ‘वांचे गुजरात’ या मोहिमेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.
****

 पंतप्रधान स्वत: नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधतात, असा मन की बात, हा जगातला पहिला प्रयोग आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज पुणे इथल्या आनंदनगर सोसायटीच्या लोकांसोबत मन की बात ऐकल्यानंतर आकाशवाणीशी बोलत होते. पंतप्रधानांनी केलेल्या जल संरक्षण अभियानाच्या आवाहनाला देखील नागरीक स्वच्छता अभियानासारखा सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
****

 २०११ च्या जणगणनेनुसार देशात विधवांची संख्या चार कोटी ३२ लाख ६१ हजारापेक्षा जास्त आहे. यात महाराष्ट्रात सुमारे ४५ लाख, उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४९ लाख, तर आंध्र प्रदेशात सुमारे ४३ लाख विधवा असल्याची माहिती, केंद्रीय महिला तथा बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.

 विधवांच्या सर्वसाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी विभिन्न केंद्र मंत्रालयांकडून अनेक नवीन योजना राबवल्या जाणार आहेत, त्यात स्वाधार गृह योजना, महिला शक्ती केंद्र योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनांचा समावेश असल्याचं त्या म्हणाल्या.
****

 पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन थेट ऑनलाईन दाखवण्याचे अधिकार मंदिर समितीने जिओ आणि टाटा स्काय कंपनीला देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. आजारी, दिव्यांग तसेच कामाच्या धावपळीत ज्यांना पंढरपूरला येणे शक्य नाही, असे अनेक लोक आता ऑनलाईन दर्शन घेऊ शकतात, या माध्यमातून मंदिर समितीला ५० ते ६० लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****

 राज्यातल्या वीज निर्मिती, विजेचं वहन, विजेचे दर, ग्राहकांना दिली जाणारी सवलत याबाबत सविस्तर माहिती देऊन येत्या काही वर्षात वीज पुरवठ्या संदर्भातल्या सर्व समस्या निश्चित मार्गी लागतील, असा विश्वास ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी वसई इथं बोलतांना व्यक्त केला. सौभाग्य योजनेत १२ कोटी रुपये खर्च करून पालघर जिल्ह्यात वीजपुरवठ्याचं प्रमाण वाढवल्याचं त्यांनी सांगितलं.
****

 राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जालना जिल्ह्यात एक कोटी पाच लाख ६७ हजार ४५० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तीन हजार ९७८ ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी वन विभागाकडे सव्वा कोटींहून अधिक रोपे तयार आहेत. जिल्ह्यातल्या ७७९ ग्रामपंचायतींना २५ लाख रोपांचं वाटप केलं जाणार आहे. शासकीय संस्थांबरोबरच जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्था, उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सहभाग घ्यावा, असं आवाहन वन विभागानं केलं आहे.
****

 बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपुर तालुक्यात अंगावर वीज पडल्यामुळे २ जण ठार, तर २ जनावरे दगावल्याची घटना घडली आहे. वरवट खंडेराव येथील शेतकरी श्रीकृष्ण कांशिराम ढमा, तसंच संग्रामपूरच्या जस्तगाव येथील युवराज विश्वास गव्हांदे अशी मृतांची नावं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

  आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि यजमान इंग्लंड दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा इंग्लंडनं ३६ षटकांत, तीन बाद २१३ धावा केल्या होत्या.
*****
***

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...