Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 01 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø पावसाच्या पाण्याचं संवर्धन करण्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला
‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन
Ø गडचिरोली भुसुरूंग स्फोटप्रकरणी आणखी
एका जणास अटक
Ø मराठवाड्यात
रिमझिम पाऊस तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह
विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
Ø लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही भाजप- शिवसेना युतीला यश मिळण्याची प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना आशा
आणि
Ø विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडकडून
भारताचा ३१ धावांनी पराभव
****
देशातली प्रमुख धरणं आणि नद्यांच्या खोऱ्यातला
पाणीसाठा घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाच्या पाण्याचं
संवर्धन करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. स्वच्छता मोहिमेसारखीच जलसंवर्धन ही जन चळवळ बनण्याची गरज असल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं. दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. जल संरक्षणासाठी एक व्यापक
जन आंदोलन उभारण्याची गरज असून, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा
संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चित्रपट,
क्रीडा, कथा-कीर्तन क्षेत्रांतल्या
धुरीणांनी, प्रसार माध्यमांनी आपापल्या परीनं या क्षेत्रात नेतृत्त्व
करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. ‘हॅशटॅग जनशक्ती फॉर जलशक्ती’
याचा उपयोग करून प्रत्येकानं आपलं या विषयीचं मत, माहिती आणि सूचना समाज माध्यमांवर ‘शेअर’ कराव्यात, असंही ते म्हणाले.
****
पंतप्रधानांनी केलेलं जलसंवर्धनाचं आवाहन
राज्यातली जनता निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूर इथं हा कार्यक्रम ऐकल्यानंतर ते बोलत होते.
राज्यात गेल्या पाच वर्षात जलयुक्त शिवार अभियानातून लोकसहभागाद्वारे जलसंधारणाची
मोठ्या प्रमाणावर कामं पूर्ण झाल्यानं शेतीला शाश्वत सिंचनासोबतच पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर
तालुक्यातल्या प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी जावळी इथून रोपवे तयार करण्यात येणार
असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री
जयकुमार रावल यांनी दिली आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा
साक्षीदार असलेल्या या किल्ल्याला भेट
देणं पर्यटकांना सोपं होणार आहे. साडेपाच किलोमीटर लांबीचा हा विशाल रोपवे प्रकल्प
आशिया खंडातला सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असणार आहे, असं रावल यांनी यावेळी
सांगितलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी
एक मे रोजी नक्षलवाद्यांनी
घडवलेल्या भुसुरूंग स्फोटप्रकरणी पोलिसांनी कैलाश
रामचंदानी या ३४ वर्षाच्या युवकास अटक केली आहे. कुरखेड्याचा रहिवासी असलेल्या या युवकास स्थानिक न्यायालयानं
बारा जुलैपर्यंत पोलिस
कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आठवर
पोहोचली आहे. या स्फोटात १५ पोलिसांसह एक चालक मृत झाले होते.
****
मराठवाड्याच्या विविध
भागात काल रिमझिम पाऊस झाला. सर्वदूर झालेला हा पाऊस मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक तालुक्यात कमी
अधिक प्रमाणात पडला. उस्मानाबाद, आणि हिंगोली जिल्ह्यात हलका पाऊस झाला तर सोलापूर
शहरात काल सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसरातही जोरदार पाऊस झाला.
मुळा नदीवरील आंबित धरण भरले असून त्यातून ५०० घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी पिंपळखांड
प्रकल्पात सोडलं जात आहे. भंडारदरा, निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू झाली आहे.
मुंबई
शहर आणि उपनगरात कालदेखील चांगला पाऊस झाला. मुंबईकरांना काल दिवसभर सूर्यदर्शनही झालं
नाही. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुवांधार पाऊस होत आहे. कणकवली शहरात
सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक घरात पाणी घुसले आहे. वेंगुर्ले तालुक्यात होडावडे
पुलावरून पाणी गेल्याने सावंतवाडी- वेंगुर्ले मार्ग काही काळ बंद झाला होता. भुईबावडा
घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे. या घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. जिल्ह्यातील
नदी-नाले दुथडी भरून वाहत असून आंबोलीसह सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत.
दरम्यान, बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आणखी तीन – चार दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज हवामान
विभागानं व्यक्त केला आहे. मुंबईसह विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली
आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही या दोन दिवसात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात
आहे.
****
लोकसभे प्रमाणेच राज्यात विधानसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष प्रणित
युतीला यश मिळेल अशी आशा केंद्रीय ग्राहक कल्याण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात फुलंब्री इथं काल विविध विकासकामांचं
भूमीपुजन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योग राज्यमंत्री
अतुल सावे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. समृध्दी महामार्गामुळे बरेच उद्योग औरंगाबादसह जालन्याला
प्राधान्य देत आहेत. येत्या अडीच वर्षात पूर्ण होणाऱ्या या मार्गामुळे औरंगाबाद-जालना ही जोडशहरं म्हणून विकसित
होतील असं दानवे म्हणाले. यावेळी केंद्रात दानवे यांना तर राज्यात सावे यांना मंत्रीपद मिळाल्यानं, त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
****
ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात सहकारी संस्थांचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं राज्याचे रोजगार हमी योजना आणि
फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. काल,
बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यात रायमोहा इथं एका सहकारी पतसंस्थेच्या शाखेचं उद्घाटन
त्यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात अनेक व्यवसाय हे सहकारी संस्थांवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले.
****
घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडर्सच्या किमतीत
शंभर रुपयांनी
घट
झाली आहे. भारतीय पेट्रोलियम महामंडळानं ही घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये
दर कमी झाल्याने ही दरकपात करण्यात आली असल्याचं महामंडळानं काल स्पष्ट केलं .
****
हिंगोली - वाशिम रेल्वे मार्गावर, कनेरगावनजिक पैनगंगा
नदीवरच्या, पुलाजवळ रेल्वे रुळाखालची, पट्टी तुटल्याचा प्रकार काल उघडकीस आला. ही बाब
लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून, या मार्गावर धावणारी अकोला-पूर्णा रेल्वे
थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला. पट्टी बदलण्याचं काम झाल्यानंतर एक तासानं ही रेल्वेगाडी
मार्गस्थ झाली.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल इंग्लंडनं
भारताचा ३१ धावांनी पराभव पराभव केला. नाणेफेक जिंकून
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने भारताला विजयासाठी ३३८ धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ निर्धारित ५० षटकात
केवळ ५ बाद ३०६
धावाच करू शकला. या सामन्यात भारताच्या रोहित शर्मानं
१०२ धावा केल्या. इंग्लंडच्या १११ धावा करणाऱ्या जॉनी बेअरस्ट्रोला सामनावीर
पुरस्कार देण्यात आला.
****
पंढरपूर इथल्या विठ्ठल- रुक्मिणीचं ऑनलाईन दर्शन
उपलब्ध करण्याचे अधिकार मंदिर समितीने जिओ आणि टाटा स्काय कंपनीला देण्याचा
निर्णय घेतला आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी ही माहिती
दिली. आजारी, दिव्यांग तसंच कामाच्या धावपळीत ज्यांना पंढरपूरला येणं शक्य नाही, असे
अनेक लोक आता ऑनलाईन दर्शन घेऊ शकतात, या माध्यमातून मंदिर समितीला ५० ते ६० लाख रूपयांचं
उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली.
****
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जालना
जिल्ह्यात एक कोटी, पाच लाख, ६७ हजार, ४५० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. एक जुलै
ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तीन हजार, ९७८ ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी
वन विभागाकडे सव्वा कोटींहून अधिक रोपं तयार आहेत. जिल्ह्यातल्या ७७९ ग्रामपंचायतींना
२५ लाख रोपांचं वाटप केलं जाणार आहे. शासकीय संस्थांबरोबरच जिल्ह्यातल्या सेवाभावी
संस्था, उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी या वृक्षलागवड मोहिमेत सहभाग घ्यावा, असं आवाहन
वन विभागानं केलं आहे.
****
राज्यभरातून अनेक दिंड्यांनी पंढरपूरकडे
प्रस्थान केलं आहे. काल अहमदनगर
जिल्ह्यातल्या कानिफनाथ गडाची दिंडी मढी इथून तर, धामोरी इथली अडबंगी
नाथांची तसंच निवृत्ती नाथांची दिंडी आणि नेवास्याची ज्ञानेश्वर माऊलींची दिंडीही
पंढरपूरकडे रवाना झाली. जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेरची सखाराम महाराजांची
दिंडी औरंगाबाद नजिक दौलताबाद इथं आली
असून आज ती पैठणकडे रवाना होईल.
****
पुणे शहरात शुक्रवारी
रात्री भिंत कोसळून झालेल्या १५ कामगारांच्या मृत्यु प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक
विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली, त्यांना जिल्हा सत्र न्यायालयानं उद्या मंगळवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना इमारतीची ही संरक्षक भिंत कोसळली होती. या प्रकरणी
पोलिसांनी आठ जणांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
****
येत्या आषाढी एकादशीला भाविकांना
पंढरपूरला जाता यावं म्हणून रेल्वे प्रशासनानं बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावहून विठ्ठल दर्शन एक्सप्रेस गाडीच्या चार
फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या ६ जुलैला पहिली रेल्वे सुटेल. यासाठी
आरक्षित तिकिटांचीही व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना सवलतीच्या दरात आणि प्राधान्यानं तिकीट उपलब्ध होणार असल्याची
माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात अंगावर
वीज पडल्यामुळे दोन जण ठार झाले, तर दोन जनावरे दगावल्याची घटना घडली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment