Monday, 29 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९  जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्र सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या, पहिल्या शंभर दिवसांत शंभर टक्के वक्फ मालमत्तांच्या डिजिटायझेशनचं लक्ष्य ठेवलं असल्याचं, अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांतल्या वक्फ मंडळाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. सरकार विविध शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यक्रमांसाठी वक्फ मंडळांना शंभर टक्के निधी पुरवत असल्याची माहिती नक्वी यांनी दिली.
वक्फ मंडळांच्या पायाभूत तसंच आर्थिक सुधाराच्या उद्देशानं हे पाऊल उचललं असून, त्यामुळे वक्फ मालमत्ता, मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी वापरता येईल आणि अशा मालमत्तांवर होणारं अतिक्रमण रोखता येईल असंही नक्वी यांनी सांगितलं.
****
खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली असून, आता परवा ३१ जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या योजनेत सहभागी होण्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणी विचारात घेता ही मुदत वाढ दिल्याचं या बाबातच्या शासन निर्णयात नमूद केलं आहे.
****
राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारणी तालुक्यातला एक पूल आज सकाळी वाहुन गेला, त्यामुळे परिसरातल्या दहा गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही रस्त्यांवरची वाहतुक ठप्प झाली आहे.
खानदेशात जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे पूर्ण उघडून धरणातून सत्त्याहतर हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरण ८० टक्के भरलं आहे. आज दुपारपासून धरणातून एक हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
मराठवाड्यात आज बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. औरंगाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, परंतु पाऊस नसल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींसंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करावेत, या अर्जांबाबत समिती सुनावणी घेऊन, योग्य निराकरण केलं जाईल, असं प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी सांगितलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडे देयकं थकलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून साखरेची मागणी केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात विकल्प अर्ज येत्या दोन ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालयात जमा करावेत, असं आवाहन गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी कमलाकर फड यांनी केलं आहे. विकल्प अर्जांचा नमुना तहसीलदार तसंच गटविकास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
****
कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरून दिलेल्या इच्छुकांनी उद्या सकाळी गांधीभवन इथं उपस्थित राहण्याचं आवाहन शहर अध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार यांनी केलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानात एक महिला नक्षलवादी मारली गेली. आज सकाळी ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या या नक्षलवादी महिलेजवळून एक बंदूक आणि अन्य साहित्य जप्त केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून काजूचे एक हजार एकशे नऊ डबे आणि मोठ्या प्रमाणावर रोकड, असा सुमारे दोन कोटी वीस लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
****

No comments: