Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
अखिल भारतीय मराठी साहित्य
महामंडळाचं त्र्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद इथं आयोजित
करण्यात आलं आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ कौतिकराव ठाले पाटील यांनी आज औरंगाबाद इथं
ही घोषणा केली. आगामी संमेलनासाठी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन स्थळांपैकी विद्यमान संमेलन अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक
डॉ अरुणा ढेरे यांच्यासह सर्व एकोणाविस सदस्यांनी एकमतानं उस्मानाबादची निवड केल्याचं
ठाले पाटील यांनी सांगितलं. येत्या जानेवारी महिन्यात हे संमेलन उस्मानाबाद इथं आयोजित
करण्यात येईल.
दरम्यान, उस्मानाबाद
इथं हे साहित्य सम्मेलन होत असल्याबद्दल महामंडळाच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन
तावडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे साहित्य सम्मेलन यशस्वी करू असं त्यांनी म्हटलं
आहे.
****
राष्टीय लोकशाही आघाडी
सरकार समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी कोणतीच कमतरता ठेवत नसल्याचं माहिती आणि
प्रसारणमंत्री प्रकाश जाव़डेकर यांनी म्हटलं आहे. नव्या सरकारला आज पन्नास दिवस पूर्ण
झाल्यानिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पन्नास दिवसांत मोदी सरकारनं
विविध महत्वपूर्ण मुद्दांवर निर्णय घेतले आहेत. तसंच २०२४ पर्यंत प्रत्येक घरी शुध्द
पेयजलाची व्यवस्था या मुख्य उद्देशासाठीचं जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली असल्याचं
त्यांनी आवर्जून नमुद केलं. रस्ते, रेल्वे आणि क्रीडा क्षेत्रात कोट्यावधींची गुंतवणुक
करण्यास सरकारनं मंजुरी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
चांद्रयान- दोन अंतराळात
झेपावण्यासाठी सज्ज झालं असून श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन प्रक्षेपण तळावरून जीएसएलव्ही
मार्क थ्री या प्रक्षेपकाद्वारे आज दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण
होणार आहे. या प्रक्षेपणासाठी वीस तासांची उलट गणना काल संध्याकाळी सहा वाजून ४३ मिनिटांनी
सुरू झाली. काल या प्रक्षेपणाची रंगीत तालीम झाली आणि सर्व मानकं सुरळीत असल्याचं आढळल्याची
माहिती इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.
****
कर्नाटकात जनतादल सेक्युलर आणि काँग्रेस आघाडी सरकारवरच्या
विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन राजकीय नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. बहुमत
आपल्या बाजूला आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजपत तणावाचं
वातावरण आहे. बंगळूरुमधे काल भाजप आणि काँग्रेसच्या एकाचवेळी दीर्घ बैठका झाल्या. भाजपची
एक बैठक आज सभागृह भरण्यापूर्वी झाली.
दरम्यान, कर्नाटकमधील हा विषय तसंच
सोनभद्र प्रकरणी विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं.
वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे
वाढत असून या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणं आवश्यक असल्याचं
प्रतिपादन सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे. राज्य
पोलीसांचा सायबर विभाग या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सज्ज असून सायबर गुन्ह्यांच्या
तपासात राज्य अग्रेसर असल्याची माहितीही त्यांनी यानिमित्त दिली. राज्य सायबर विभागाच्या
वतीनं राज्यातील सायबर विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी आणि महिला व बालकांसंबंधीच्या
सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू एका कार्यशाळेत विशेष पोलिस महानिरीक्षक
सिंह बोलत होते.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तिनही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून विराट कोहलीची निवड झाली
आहे. येत्या तीन ऑगस्टला पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होत आहे.
या दौऱ्यात तीन टी ट्वेंटी सामने, तीन एकदिवसीय
सामने तर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीनं आपण या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं
आधीच कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात काही
तालुक्यात चांगला पाऊस सुरू असून 24 तासात 584 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, जिल्ह्यातील
जलाशयात 17 हजार 37 दश लक्ष घन फूट साठा असून तो 26 टक्के इतका आहे. गेल्यावर्षी याच
कालावधीत 30 टक्के इतका साठा झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोंदिया इथं सालेकसा
तालुक्यातल्या हजारफाल धबधब्यात पडून काल
एका मुलाचा मृत्यु झाला.
*****
***
No comments:
Post a Comment