आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
वैयक्तीक करदात्यांसाठी कर विवरण पत्र भरण्याची
मुदत केंद्रसरकारनं वाढवली आहे. ही मुदत ३१ जुलैपर्यंत होती.
मात्र, नियोक्त्यांकडून नमुना-१६ ची प्रत
मिळण्यात विलंब होण्यासह विविध कारणांमुळे या मुदतीत विवरण पत्र भरण्यात करदात्यांना
अडचणी येत आहेत, असं समजल्यानं ही मुदत येत्या ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे.
****
सांगली इथल्या साईनाथ महिला पत संस्थेतल्या ठेवीदारांची
ठेव परत न केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष विभावरी कुलकर्णी आणि संस्थापक धनंजय कुलकर्णी या दांपत्यास तीन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण अठरा
महिने साधी कैद आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात
आली आहे. ग्राहक न्यायालयाने काल हे आदेश दिल्याचं आमच्या वार्ताहराने
कळवलं आहे.
****
NCC, अर्थात राष्ट्रीय छात्र सेवेच्या कॅडेट्ना दिल्या जाणाऱ्या
विविध पुरस्कारांची संख्या सध्याच्या १४३ वरुन
२४३ केल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. या कॅडेट्सना आता ३० हजार रुपये
रोख मूल्याची दोन रक्षामंत्री पदकं, तसंच २० हजार रुपये मूल्याची चार प्रशस्तीपत्रकं मिळतील. उत्कृष्ट छात्रांसाठी नवीन
नऊ पुरस्कार मंजूर केल्यानं विविध क्षेत्रांमधे दिल्या जाणाऱ्या अशा पुरस्कारांची संख्या आता २७, तर प्रशस्तीपत्रकांची
संख्या १०२ वरुन २०० झाली आहे.
****
देशभरातल्या २१ केंद्रीय विद्यालयाच्या इमारती
असुरक्षित असल्याचं एका पाहणीत आढळलं आहे. या इमारतींमध्ये शाळा चालवू नसेत, असे निर्देश
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दिले आहेत. या २१ विद्यालयांपैकी
सर्वाधिक आठ धोकादायक इमारती महाराष्ट्रातल्या केंद्रीय विद्यालयांच्या असून,
त्यापैकी तीन विद्यालयांच्या इमारतींचं बांधकाम १९६० च्या दशकात झालेलं
असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन
जिल्ह्यांमधल्या विविध कामांसाठी
४ हजार २९३ कोटी रूपयांच्या पहिल्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
हायब्रीड ॲन्युटी तत्त्वावर या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment