Tuesday, 23 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
मोटार वाहन अधिनियम सुधारणा विधेयक आज लोकसभेत एकमतानं संमत करण्यात आलं. केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी हे विधेयक सदनासमोर मांडताना, या विधेयकामुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर कोणतीही मर्यादा येणार नसल्याचं स्पष्ट केलं. या विधेयकामुळे भ्रष्टाचाराचं उच्चाटन, रस्ता सुरक्षेत अधिक सुधार तसंच वाहतुक नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर शक्य होणार असल्याचं, गडकरी यांनी सांगितलं.
दरम्यान, लोकसभेत सध्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे.
****
राज्यसभेचं कामकाज दुपारच्या सत्रातही विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे बाधित झालं. काश्मीर मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर पंतप्रधानांनी सदनात येऊन खुलासा करण्याची मागणी काँग्रेससह, समाजवादी पार्टी आणि अन्य विरोधी पक्षांनी लावून धरल्यानं, कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही गदारोळ सुरूच होता. उपसभापतींनी या गदारोळातच कामकाज सुरू ठेवल्यानं, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
****
भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला येत्या एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजित या यात्रेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथून सुरुवात होईल. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेतून राज्यातल्या ३६ जिल्ह्यातल्या दोनशे ८८ मतदार संघांपैकी तीस जिल्ह्यातल्या १५२ मतदार संघाचा फडणवीस दौरा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक इथं या यात्रेचा समारोप होईल. एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट अशी दोन टप्प्यात ही यात्रा होणार असून, औरंगाबाद आणि नाशिक विभागाचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे.
****
केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना आणि विस्तारीत उज्ज्वला योजना-२ च्या निकषात न बसणाऱ्या कुटुंबांना गॅस जोडणी देण्यासाठी राज्य सरकारची स्वतंत्र योजन करण्याला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्यातल्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. उर्वरित शासकीय जमिनीवरील संपुष्टात आलेल्या आणि यापुढे संपणाऱ्या भाडेपट्टयांचं नूतनीकरण करण्यासंबंधीचं धोरण निश्चित करणं तसंच जळगाव जिल्ह्यात गारखेडे इथं, पन्नास एकर जमिनीवर राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट्स ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.

प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी अतिरिक्त भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला.

मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर निविदा काढायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. शासन खरेदी करत असलेल्या एअरबस कंपनीच्या बहुउद्देशीय हेलिकॉप्टरच्या परिरक्षणासाठी एजन्सी निवडायलाही आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यत आली.
****
देशातील सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा सी.एस.आर जनरलचा युथ आयकॉन पुरस्कार यंदा खासदार सुजय विखे पाटील यांना प्रदान करण्यात आला. सुजय विखे यांच्या जनसेवा फाऊंडेंशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमासाठी हा पुरस्कार दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातल्या सोनई परिसरातल्या १८ गावांची पाणी योजना तातडीनं सुरू करावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाचशे ग्रामस्थ अहमदनगर इथंल्या जीवन प्राधिकरणाच्या कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत. ही योजना सुरु होईपर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावेत, यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक इथल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातला आरोपी बाळासाहेब तळेगांवकर याला आज नाशिक पोलिसांच्या पथकानं, परभणी इथं नागरिकांच्या मदतीने जेरबंद केलं. तळेगावकर याच्याविरोधात नोंद असलेल्या प्रकरणात, वारंवार नोटीसा देऊनही तो उपस्थित झाला नाही. या कारवाईला विरोध करणाऱ्या तळेगावकर याने पोलिसांवर दगडफेक केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ’एक्सेलन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटीव्ह बँक डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पाचशे ते एक हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँकेचा हा गौरव करण्यात आला आहे.
****

No comments: