Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø मुंबई- कोकणात पावसाचा
हाहाकार; जनजीवन विस्कळीत,
Ø पुरात अडकलेल्या
महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या हजारावर प्रवाशांची
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या मदतीनं सुटका
Ø इलेक्ट्रीकल वाहनांवरचा वस्तु आणि सेवा कर १२ टक्क्यांवरून
पाच टक्के करण्याचा निर्णय
Ø माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते एस. जयपाल
रेड्डी यांचं निधन
आणि
Ø गडचिरोलीत सहा
नक्षलवाद्यांचं पोलिसांपुढे आत्मसमर्पण
****
मुंबई- कोकणात काल पावसानं हाहाकार उडवला.
मुंबईत काल पावसामुळं सखल भागात पाणी साठल्यानं जनजीवन विस्कळीत झालं.
या भागातली अनेक दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं. शहरातल्या नाल्यांनाही पूर आला, रेल्वे मार्गांवरही पाणी
साठल्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला. मुंबईहून
कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या एक हजार ५० प्रवाशांना राष्ट्रीय
आपत्ती निवारण दलाच्या आठ, नौदलाच्या चार तसंच लष्कराच्या दोन
तुकड्या आणि भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महालक्ष्मी
एक्सप्रेसमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सैन्य दलाच्या तिन्ही विभागांचं तसंच
या बचाव कार्यात मदत करणाऱ्या अन्य संस्थांची प्रशंसा केली आहे.
अतीवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे ११ विमानाचं उड्डाणं रद्द करण्यात
आली तर मुंबईत येणारी ९ विमाने अन्य शहरात उतरवण्यात आली.
मुंबई शहर आणि परिसरात होत असलेल्या या पावसामुळं अभियांत्रिकी
पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यातली प्रवेश प्रक्रियेची मुदत २९ जुलैपर्यंत तर फार्मसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी
पर्याय देण्याचे अर्ज भरण्याची मुदत आज एक दिवस वाढवण्यात आल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात अतिवृष्टीमुळे
नद्या नाल्यांना पूर आला आहे. खेडमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं तसंच चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर आल्यानं दोन्ही ठिकाणची मुंबई - गोवा महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती.
रायगड जिल्ह्यात या पावसानं दोघांचे बळी घेतले आहेत.
माथेरानमध्ये सहा वर्षांचा मुलगा गटारात पडून वाहून गेला. तर दहिगाव इंजिवली इथं १८ वर्षांचा तरूण नाला ओलांडत असताना वाहून गेला.
जिल्ह्यातल्या सावित्री, कुंडलिका, आंबा, गांधारी, गाढी, उल्हास, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. सावित्री आणि गांधारी नदीचं पाणी महाडमध्ये शिरलं
आहे तर खोपोली- पाली मार्गावर अंबा नदीला पूर आल्यानं या मार्गावरची
वाहतूक ठप्प झाली होती.
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळं
जनजीवन विस्कळीत झालं असून सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
राज्याच्या अन्य भागातही चांगला पाऊस झाला. गडचिरोली, धुळे,
जळगाव, अमरावती, अकोला,
कोल्हापूर, सांगली इथं काल दिवसभर जोरदार पाऊस
झाला. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळं नाशिकची धरणं भरली असून
गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट
क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे.
धरणाच्या पाणलोटमधून येणाऱ्या पाण्यात कमालीची
वाढ झाली असून काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा ६१ दसलक्ष घनफूटपर्यंत वाढला.
****
मराठवाड्यात परभणी इथं अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत
असलेल्या पावसाच्या आगमनामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. उस्मानाबाद, बीड,
जालना, हिंगोली, जिल्ह्याच्या काही भागातही काल चांगला पाऊस झाला.
****
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं इलेक्ट्रीकल वाहनांवरील
कर १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत
कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन
यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात
आला. तसंच इलेक्ट्रीकल वाहनांच्या चार्जरवरील करदेखील १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनानं इलेक्ट्रीकल वाहने भाडे तत्वावर
घेतल्यास त्यांनाही या करातून सवलत देण्यात आली आहे. वस्तु
आणि सेवा कर कपातीचे फायदे ग्राहकांना न देणाऱ्या संस्थांवर दहा टक्के
दंड ठोठावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
****
माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी
यांचं आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास हैदराबाद इथं निधन झालं.
ते ७७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळं
त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काँग्रेस आणि जनता पक्षाच्या माध्यमातून
त्यांनी पक्षीय राजकारण केलं. चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले रेड्डी यांनी केंद्रात माहिती आणि प्रसारण, नगर विकास, पेट्रोलियम आणि नैसर्गिक
वायु, तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री म्हणून काम केलं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
राज्य सरकारनं राज्यात सहा नवीन विद्यापीठ सुरू करण्याचा
निर्णय घेतला असून यामध्ये लातूर इथं रूग्णसेवा - पॅरामेडिकल विद्यापीठ उभारण्यात येणार
असल्याचं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल सांगितलं.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल
बोलत होते. लातूर जिल्ह्याला ४६३ कोटी रूपयांचं दुष्काळी अनुदान मिळणार असल्याचं
ते म्हणाले. या बैठकीत ३३७ कोटी रूपयांच्या खर्चास काल मान्यता देण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ या
आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतील. आकाशवाणी
आणि दूरदर्शनवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. मोदी यांच्या
पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला या मालिकेचा हा दुसरा भाग आहे.
****
विविध हिंसक कारवायांमध्ये सहभाग असलेल्या सहा नक्षलवाद्यांनी
काल गडचिरोली
पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. या सहा जणांवर ३२ लाख ५० हजार रुपयांचं
बक्षीस शासनानं ठेवलं होतं, या सहा जणांमध्ये चार तरूणींचा समावेश आहे.
गोकुळ मडावी हा नक्षलवाद्यांच्या कंपनी क्रमांक
चारच्या विभागीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर
चकमकीचे १५, खुनाचे ३ आणि भूसुरुंग स्फोटाचे सहा गुन्हे दाखल आहेत. रतन कुंजामी याचाही विविध चकमकीत सहभाग
होता. सरिता कल्लो हिचा ३० एप्रिलच्या रात्री दादापूर इथं २७
वाहनांच्या जाळपोळीत सहभाग होता. शैला हेडो हिच्यावर चकमकीचे
३, खुनाचा १ आणि जाळपोळीचे ३ गुन्हे दाखल आहेत. जरिना होयामी हिच्यावर विविध प्रकारचे १९ गुन्हे आहेत.
****
बीड शहराजवळील वासनवाडी इथं शेतीच्या वादातून
भावानेच तीन भावांचा धारदार हत्यारानं खुन केल्याची घटना काल घडली. या प्रकरणातला आरोपी किसन पवणे यांनी आईच्या निवृत्तीवेतनामधून खरेदी
केलेली १२ एकर शेतजमीन आपल्या नावे केली होती. एकत्र कुटुंब असतांना
शेती खरेदी केल्यानं त्यात वाटा मिळावा अशी इतर तीन भावांची मागणी होती. यावरून झालेल्या वादातून किसन पवणे यांनी आपली दोन मुलं ॲडव्होकेट कल्पेश पवणे
आणि डॉक्टर सचिन पवणे यांच्या मदतीनं धारदार हत्यारानं वार करून
तीन भावांचा खून केला. गुन्हा घडल्यानंतर किसन पवणे स्वतहून पोलिस
ठाण्यात हजर झाला, तर या झटापटीत जखमी झालेल्या किसन आणि कल्पेशवर
सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालय, तसंच औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस
महानिरीक्षक, आणि जिल्हा परिषदेच्यावतीनं काल सायंकाळी औरंगाबाद
इथं रन फॉर औरंगाबाद हा उपक्रम घेण्यात आला. सामाजिक सलोखा,
पाणी वाचवा, झाडे जगवा, बेटी
बचाव बेटी पढाव, आणि सामाजिक सद्बभावना राखण्यासाठी या उपक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होत. पाच किलोमीटर धावण्याच्या या उपक्रमात
महिला, शाळकरी विद्यार्थी, आणि शहरातले
नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
मागास भागातली व्यक्ती उच्च पदापर्यंत मजल मारू
शकते. त्यासाठी उच्च ध्येय
आणि त्या ध्येयासाठी धडपड करणं आवश्यक आहे, त्यातूनच यश मिळतं,
असं प्रतिपादन महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या कुलपती तथा सर्वोच्च न्यायालयाच्या
न्यायमूर्ती आर. बानुमती यांनी केलं आहे.
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीचा
शिलान्यास करताना त्या काल बोलत होत्या.
विद्यार्थ्यांचं कायदेविषयक शिक्षण गुणवत्तापूर्ण असावं. या शिक्षणाबरोबरच आंतरवसिता, परिसर मुलाखत, संवाद कौशल्य यावर भर असावा, अशा सूचना त्यांनी यावेळी
केल्या.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. यापूर्वीच्या
अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा
राजिनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं.
****
अहमदनगर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर
पिचड आणि त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची
घोषणा काल केली. अकोले इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी
ही घोषणा केली. ३० किंवा ३१ जुलैला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी
यापूर्वीच राजीनामे दिले
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment