Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø २०१९-२०च्या हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर
दर प्रतिटन २७५० रुपये कायम; साखरेचा
४० लाख मेट्रीक टन सुरक्षित साठा करण्याचा निर्णय
Ø राज्यातल्या
दुकाने आणि आस्थापनामध्ये कार्यरत कामगारांच्या किमान वेतनात दुपटीने वाढ
Ø एकात्मिक राज्य जल आराखड्याच्या दुरुस्तीला राज्य जल परिषदेची मान्यता
आणि
Ø औरंगाबादमधल्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रशियन कंपनी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक
समितीनं २०१९-२०च्या हंगामासाठी
ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर २७५० रुपये
प्रतिटन कायम ठेवला आहे, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक
व्यवहार विषयक समितीच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी याबाबत वार्ताहरांना माहिती दिली.
कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर
साखरेचा सुरक्षित साठा चाळीस लाख मेट्रीक टन एवढा
करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे
साखरेच्या दरात स्थैर्य येईल, तसंच बाजारात साखरेचा साठा सहज
उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला. एक ऑगस्ट २०१९ पासून ३१ जुलै २०२० पर्यंत
हा साठा ठेवण्यात येईल, असं ते म्हणाले.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी
स्थापन मंत्रिगटाचं केंद्रीय मंत्रिमंडळानं पुनर्गठन केलं असून, संबंधित कायदे अधिक कठोरपणे राबवण्याच्या
उपाययोजना केल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या दुकाने आणि आस्थापनामध्ये कार्यरत कामगारांच्या किमान वेतनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातल्या
१० लाख दुकानं आणि व्यावसायिक-औद्योगिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या
जवळपास एक कोटी कामगारांना याचा लाभ होणार आहे. किमान वेतन कायद्यानुसार दर पाच वर्षांनी या कामगारांची वेतन निश्चिती केली
जाते, मात्र गेल्या ९ वर्षांपासून वेतन पुनर्निधारीत केलं गेलं
नव्हतं. आता या क्षेत्रातल्या कुशल कामगारांचं किमान वेतन पाच हजार ८०० रूपयांवरून
११ हजार ६३२ एवढं करण्यात आलं आहे तर अर्धकुशल कामगाराचं वेतन पाच हजार ४०० रूपयांवरून
दहा हजार ८५६ रूपये आणि अकुशल कामगाराचं वेतन दहा हजार २१ रूपये करण्यात आलं आहे.
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीत राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जवळपास दीडशे जागांवर
काहीही वाद नसल्याचं, काँग्रेस कडून सांगण्यात आलं आहे. या
दोन्ही पक्षांत जागावाटपासंबंधी झालेल्या चर्चेनंतर काल
काँग्रेसच्या एका नेत्यानं, पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती
दिली. गेल्या वेळची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली, यंदा
मात्र २००९ च्या जागावाटप समीकरणाच्या आधारे चर्चा सुरू असल्याचं, या नेत्यानं सांगितलं. काही जागांवर अदलाबदल
होण्याची शक्यता असून, काही जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या
जाणार आहेत. आघाडीमध्ये येण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे नेते
प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला
असल्याचंही या नेत्यानं सांगितलं.
****
एकात्मिक राज्य जल आराखड्याच्या दुरुस्तीला
राज्य जल परिषदेनं काल मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात परिषदेची सातवी बैठक झाली. या
बैठकीत कृष्णा खोरे जल आराखड्यात गुंजवणी प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्राची आकडेवारी
सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे प्रत्यक्ष सिंचनात वाढ होणार आहे.
कृष्णा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. आवश्यकता भासल्यास
पाणी उपलब्धतेच्या परवानगीसाठी लवादाकडे संदर्भ करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सूचित केलं.
****
राज्य परीवहन महामंडळानं प्रवाशांना
साठ दिवस अगोदर तिकिट आरक्षित करण्याची
सेवा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि
महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. सध्या ही
सेवा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध असल्याचं ते म्हणाले. गणेशोत्सवात
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बाविसशे अतिरिक्त बसेस
सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह ११ नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी अपात्र
ठरवलं आहे. नगरपंचायत हद्दीतल्या आरक्षित जागेवर
टिनपत्र्याचे व्यापारी संकुल उभारणं तसंच इतर कामात अनियमितता
केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
त्याचबरोबर तत्कालीन मुख्याधिकारी, अधिक्षक अभियंता यांच्याविरुध्द विभागीय चौकशी करण्याचे आदेशही सागर यांनी दिले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
औरंगाबादमधल्या शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत रशियाची नोव्होलिपस्टेक-एनएलएमके ही पोलाद क्षेत्रातली कंपनी ८०० कोटी रुपयांची
गुंतवणूक करणार असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल सांगितलं.
कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी उद्योगमंत्री देसाई यांच्यासोबत काल मंत्रालयात
चर्चा केली. पहिल्या टप्प्यात ८०० कोटी रूपयांची तर २०२०मध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात ६ हजार
कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचं रशियाचे वाणिज्यदूत ए शार्वालेव्ह यांनी
यावेळी सांगितलं.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी पद्मविभुषण गोविंदभाई
श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त काल मराठवाड्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत, अध्यक्ष डॉ.सु.भी.वराडे, प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्यासह संस्थेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गोविंदभाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहिली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतही गोविंदभाईंना विविध कार्यक्रमांच्या
आयोजनातून अभिवादन करण्यात आलं.
****
लातूर शहराच्या चहुबाजूनी असलेल्या
चाळीस गावांचा प्रारूप विकास नकाशा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्येक्षतेखालील विशेष
नियोजन प्राधिकरणानं काल जाहीर केला. या
नकाशात शहराभोवतीच्या या चाळीस गावांच्या झालर क्षेत्रात येत्या वीस वर्षात होणारी
लोकसंख्या गृहीत धरून, रस्ते आणि अन्य नागरी सुविधांचं नियोजन करण्यात आलं आहे. या प्रारूप नकाशावर महिनाभरात दावे आणि हरकती दाखल करता येणार असून,
त्यांच्या सुनावणीनंतर प्रारूप विकास नकाशाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वार्ताहरांशी बोलतांना दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग इथं अवैधरीत्या
गुटख्याने भरलेला एक ट्रक पोलिसांनी काल जप्त केला. यात ट्रकसह एकूण ५१ लाख ५८ हजार आठशे रुपये
किमतीचा मुद्देमाल नळदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हैद्राबादहून
सोलापूरकडे हा ट्रक जात होता. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन अधिकारी विनायक शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन
वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
कारगील दिनानिमित्त राज्य शासनातर्फे उद्या राज्यभरातल्या
चित्रपटगृहांमध्ये उरी-द
सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.
तरुण वर्गात राष्ट्र कर्तव्याची भावना निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे, राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी लातूर इथं बोलतांना सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात यावर्षी अत्यल्प
पाऊस झाल्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी कान्सूर ग्रामपंचायतीनं
केली आहे. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी
केलेली दुबार पेरणी वाया गेली आहे. त्याचप्रमाणे गावात जनावरासाठीचा
चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण
झाला आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी असा
ठराव कान्सूर ग्रामपंचायतीनं केला असून याबाबतचे एक निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
****
वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचा
निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. वाशिम बाजार समितीवर आता प्रशासक मंडळ
नियुक्त करण्यात आलं असून मुख्य प्रशासक म्हणून संतोष चव्हाण
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खामगाव बाजार समितीचे प्रभारी सचिव
दिलीप देशमुख यांना वजनकाटे अपहार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरूद्ध
समितीनं नियमानुसार कारवाई केली नाही, या आणि इतर कारणांमुळे हे संचालक मंडळ बरखास्त
करण्यात आलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भुसुरूंगाचा स्फोट घडवून आणण्याचा
नक्षलवाद्यांचा डाव बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं काल उधळून लावला. चामोर्शी तालुक्यात माडे आमगावजवळ नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरुन ठेवलेली १० किलो वजनाची स्फोटकं
या पथकाच्या जवानांनी निकामी केली.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात येलदरी
इथल्या साईबाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात पिण्याचं पाणी आणि शौचालयाची
व्यवस्था करावी, अशी मागणी
सरपंच प्रमोद चव्हाण यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबतचं
निवेदन त्यांनी काल विभागाकडे सादर केलं.
****
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या
संकल्पपूर्तीमध्ये सर्वोत्तम काम करणारे जिल्हे तसंच शासकीय विभागांना पुरस्कार
देऊन सन्मानित केलं जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल राज्यातले
सर्व विभागीय आयुक्त, तसंच
जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत संवाद साधला, आणि वृक्षलागवडीचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी या
पुरस्कारांची घोषणा केली. या कामाची दखल घेऊन जिल्ह्यांना वार्षिक योजनेमध्ये
अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment