Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø ‘चांद्रयान -दोन’चं यशस्वी प्रक्षेपण; राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसदेकडून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन
Ø कर्नाटक विधानसभेत आज विश्वास प्रस्तावावर मतदान
Ø महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा केल्यानं शिक्षकांच्या
वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं शालेय शिक्षण विभागाचं
स्पष्टीकरण
आणि
Ø त्र्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद इथं घेण्याचा
निर्णय
****
भारताच्या ‘चांद्रयान -दोन’चं
काल यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटा इथल्या सतिश धवन
प्रक्षेपण तळावरून `जीएसएलव्ही मार्क थ्री` या प्रक्षेपकाद्वारे काल दुपारी दोन वाजून ४३
मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आलं. या मोहिमेत
चंद्राच्या पृष्ठभागावर महत्त्वाचे पंधरा प्रयोग केले जाणार आहेत, तसंच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि बर्फाचा शोध
घेतला जाणार असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोचे
संचालक डॉ. के. सिवन यांनी दिली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं
असून, सर्व भारतीयांना याचा अभिमान असल्याचंही म्हटलं आहे.
संसदेनंही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तर,
राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाला या यशाबाबत माहिती दिली.
हे यश म्हणजे, भारताच्या इतिहासातलं सोनेरी
पान असल्याचं संसदेनं एकमतानं म्हटलं आहे.
****
कर्नाटक विधानसभेत आज सायंकाळी विश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात येईल,
असं विधानसभा अध्यक्षांची सांगितलं. काल रात्री ही चर्चा अपूर्ण राहिली. रात्री साडेअकरा वाजता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी चर्चा पूर्ण न झाल्यामुळं
कार्यवाही स्थगित करण्याची
मागणी केली, तर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी विश्वासमत परीक्षण करण्याची
मागणी लावून धरली.
दरम्यान,
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते सिद्धरमैया यांनी
चर्चा आज संध्याकाळी चारवाजेपर्यंत पूर्ण करून, या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील, त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत
मतदान केलं जाईल असा प्रस्ताव मांडला. विधानसभा अध्यक्षांनी हा
प्रस्ताव मान्य केला.
****
लिंगायत समाजातल्या हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत आणि रेड्डी या
उपजातींचा, इतर मागासवर्गात समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव
राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिले आहेत. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत
होते. लिंगायत रेड्डी, हिंदू लिंगायत आणि हिंदू वीरशैव ह्या
लिंगायत समाजातल्याच उपजाती आहेत, याबाबत तातडीनं निर्णय
घेण्यासंदर्भात मागासवर्ग आयोगाला विनंती केली जाईल, असं
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मंगळवेढा इथल्या नियोजित जगद्ज्योती महात्मा
बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या नदी जोड प्रकल्पांमधल्या तांत्रिक अडचणी दूर करुन या
प्रकल्पांना चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल दिले. या प्रकल्पांचा काल त्यांनी मुंबईत आढावा
घेतला. या प्रकल्पाअंतर्गत दमणगंगा- पिंजाळ,
नारपार, गिरणा, दमणगंगा-
वैतरणा -गोदावरी आणि दमणगंगा- एकदरे- गोदावरी हे नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात
येणार आहेत. या योजनांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवण्यात यावं, अशाही सूचना यावेळी
मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या व्यतिरिक्त विपूल पाणी उपलब्धतेसाठी अभ्यास करण्याचे
निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
****
महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमात सुधारणा
केल्याने शिक्षकांच्या वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं शालेय शिक्षण विभागानं
स्पष्ट केलं आहे. २२ फेब्रुवारी
२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना देण्यात आला
असून त्यामध्ये कोणताही बदल या अधिसूचनेमुळे होणार नाही. सदर सुधारणेमुळे आता
खाजगी विनाअनुदानित शाळेतल्या शिक्षकांनाही अनुदानित शाळेतल्या शिक्षकांप्रमाणे
वेतन आयोगाचा लाभ मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने
दिली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं त्र्याण्णवावं
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद इथं घेण्यात येणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ.
कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं ही घोषणा केली. आगामी संमेलनासाठी नाशिक आणि उस्मानाबाद या दोन स्थळांपैकी विद्यमान संमेलन
अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ अरुणा ढेरे यांच्यासह सर्व एकोणीस सदस्यांनी एकमतानं
उस्मानाबादची निवड केल्याचं ठाले पाटील यांनी सांगितलं. येत्या
जानेवारी महिन्यात हे संमेलन घेण्यात येईल. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे या
पत्रकार परिषदेला उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी उस्मानाबादची निवड
झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत, तावडे यांनी, संमेलनाचं यशस्वी आयोजन करू, अशी खात्री दिली.
औरंगाबाद इथं झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनानंतर तब्बल १६ वर्षांनी मराठवाड्याला साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा
बहुमान मिळाला आहे.
****
उस्मानाबाद आणि लोहारा या दोन्ही
तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे सोयाबीन उत्पादक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना
एकूण ५६ कोटी ६१ लाख रूपये नुकसान भरपाई, देण्याचे निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.
काल मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ
उपसमितीच्या बैठकीत ते बोलत होते. सात महसूल मंडळातल्या ५८
हजार २३६ शेतकऱ्यांना ५३ कोटी ६८ लाख तर लोहारा तालुक्यातल्या एका महसूल
मंडळातल्या ८ हजार ५३९ सहभागी शेतकऱ्यांना दोन कोटी ९३ लाख रूपयांची नुकसान भरपाई
देण्यात यावी, असं देशमुख यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं पुरात
वाहून गेलेल्या दोन वनरक्षकांच्या कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं असल्याची
ग्वाही, वनमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी दिली आहे. या दोन्ही वनरक्षकांच्या कुटुंबियांना
तातडीच्या स्वरूपात करावयाची सर्व प्रकारची मदत, औरंगाबाद
प्रादेशिक वन कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे, कन्नड
वन परिक्षेत्राच्या तळेगाव बीटचे दोन वनरक्षक भारंबा गावाजवळच्या नाल्यात दुचाकीसह
वाहून गेले होते.
****
परभणी महापालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत
तीन कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्त रमेश पवार यांनी निलंबित केलं आहे. अग्निशामक विभागाच्या निवासस्थानांमध्ये
गैरवर्तणूक करत असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. उपायुक्त भारत राठोड यांनी गेल्या गुरुवारी अचानक केलेल्या पाहणीत,
हे तीन कर्मचारी गैरवर्तणूक करत असल्याचं निदर्शनास आलं होतं,
त्याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. या
नोटीसचा खुलासा असमाधानकारक असल्यानं, ही कारवाई करण्यात आली.
****
औरंगाबाद शहरात एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला
जबरदस्तीनं जय श्रीराम म्हणायाला लावल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार
रविवारी रात्री घडला होता.
दरम्यान,
शहरात अशाच प्रकारच्या एका अन्य प्रकरणातल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत
वाढ करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या तिन्ही तालुक्यात यंदा अल्प पाऊस झाला असून शेतकऱ्यांना
दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सरकारनं जनावरांच्या पिण्याचा
पाण्याचा तसंच चाऱ्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा, या मागणीचं निवेदन
भोकरच्या आमदार आमिता चव्हाण यांनी काल नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना दिलं.
****
माहितीचा अधिकार कायद्यात बदल केला जाऊ नये, या मागणीसाठी स्वराज अभियान,
स्वराज इंडीया, मराठवाडा लेबर युनीयन आदी पक्ष,
संघटनांनी काल औरंगाबाद इथं आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी
या मागणीसाठी क्रांती चौकात निदर्शनं केली. हे सरकार हा कायदा
मोडून काढण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप कार्यकर्त्याँऩी यावेळी केला.
****
लातूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यात टंचाईच्या उपाययोजना येत्या ३१ जुलैपर्यंत
चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल सांगितलं.
टंचाई आढावा बैठकीत बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १९ पूर्णांक ६७ शतांश टक्के
इतकाच पाऊस झाला आहे.
दरम्यान,
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती जनावरांच्या चाऱ्यासाठी
२० लाख रूपयांचा निधी देणार असल्याचंही श्रीकांत यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गेल्या ७० वर्षातल्या कामगिरीची माहिती देणाऱ्या ‘लालपरी’
या माहितीपटाच्या चित्ररथाचं काल परभणी इथं उदघाटन करण्यात आलं. राज्यात प्रमुख स्थानकांवर
या चित्ररथाचे रोज प्रसारण करण्यात येणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या शिक्षकांना काल ‘सुपर थर्टी’ हा
चित्रपट दाखवण्यात आला. दीपस्तंभ प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमाला
शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एक शिक्षक काय करू शकतो
याचं उत्कृष्ट उदाहरण असल्यानं, हा चित्रपट शिक्षकांना दाखवल्याचं,
आयोजकांकडून सांगण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या
शिरोळ वांजरवाडा गावातल्या विकास कामाच्या मुद्यावरुन सामाजिक संपर्क
माध्यमावर झालेल्या वादातून, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची काल सकाळी हत्या झाली. हल्लेखोराला पोलिसांनी
ताब्यात घेतलं असून, या प्रकरणात सात जणांविरुद्ध शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात
आला आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार
प्रकरणी न्यायालयानं तात्पुरता जामिन रद्द
करण्यात आल्यामुळे माजी कामगार मंत्री डॉ. हेमंत
देशमुख यांना काल अटक करण्यात आली.
याप्रकरणी देशमुख आणि तत्कालीन नगराध्यक्षांसह अन्य काही
जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
मुंबईत महानगर टेलीफोन निगम लिमिटेड- एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या आगीतून
अग्निशामक दलाच्या जवानांनी साठ जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. वांद्रे इथं असलेल्या या नऊ मजली इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर काल
दुपारच्या सुमारास आग लागली. वाचवलेल्या साठ जणांपैकी बहुतांश
जण इमारतीच्या छतावर अडकले होते.
*****
***
No comments:
Post a Comment