आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
चांद्रयान – दोन अंतराळात
झेपावण्यासाठी सज्ज झालं आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन प्रक्षेपण तळावरून `जीएसएलव्ही
मार्क थ्री` या प्रक्षेपकाद्वारे आज दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण
होणार आहे. या प्रक्षेपणासाठी वीस तासांची उलट गणना काल संध्याकाळी सुरू झाली. काल
या प्रक्षेपणाची रंगीत तालीम केली आणि सर्व मानकं सुरळीत असल्याचं आढळलं, अशी माहिती
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. हे प्रक्षेपण गेल्या पंधरा तारखेला होणार होतं,
मात्र प्रक्षेपणाच्या सुमारे एक तास आधी तांत्रिक दोष आढळल्यानं प्रक्षेपण स्थगित करावं
लागलं होतं. या विलंबामुळे होणारं सात दिवसांचं नुकसान भरून काढण्यासाठी या यानाच्या
मार्गात बदल करून उड्डाणाचा कालावधी आता ५४ दिवसांऐवजी ४८ दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे
या यानातला चंद्रावर उतरणारा `लँडर` हा भाग निर्धारित वेळापत्रकानुसार सात सप्टेंबरलाच
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असं इस्रोचे संचालक डॉ. सिवन यांनी म्हटलं आहे.
****
कर्नाटकात जनता दल धर्मनिरपेक्ष
आणि काँग्रेस आघाडी सरकारवरच्या विश्वास दर्शक ठरावावर मतदान होऊन राजकीय नाट्यावर
आज पडदा पडण्याची शक्यता आहे. बहुमत आपल्या बाजूला आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्ताधारी
आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये तणावाचं वातावरण आहे. बंगळूरुमधे काल भाजप आणि काँग्रेसच्या
एकाचवेळी दीर्घ बैठका झाल्या. भाजपची एक बैठक आज सभागृह सुरू होण्यापूर्वी होत आहे.
****
वृक्ष संवर्धनासह पाणी बचतीबाबत प्रत्येकानं जागरूक
होणं
गरजेचं
असल्याचं आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्याच्या कातपूर इथं काल लातूर वृक्ष, `गो ग्रीन
फौंडेशन` आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
****
नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यात चांगला पाऊस सुरू
असून चोवीस तासांत पाचशे चौऱ्याऐंशी मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment