Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
31 July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
फॉस्फेट आणि पोटॅश खत निर्मितीसाठीच्या अनुदानात वाढ करण्याचा
केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे. खतनिर्मिती कंपन्यांना आवश्यक कच्चा माल मिळावा,
तसंच शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देणं, सोपं व्हावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात
आला आहे. यासाठी सरकारी तिजोरीवर २२ हजार ८७५ कोटी रुपये भार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीर मधल्या आर्थिक दुर्बल घटकांना
१० टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं आरक्षण सुधारणा विधेयक, तसंच चिटफंडात गुंतवणूक करणाऱ्या
छोट्या गुंतवणूकदारांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा उद्देशानं तयार करण्यात आलेल्या
चिटफंड सुधारणा विधेयकालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव लैंगिक अत्याचार पीडितेच्या
अपघात प्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागानं भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर
आणि अन्य नऊ जणांना अटक केली आहे. या सर्वांविरोधात हत्येचं कलम लावण्यात आलं आहे.
सेंगर यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणारी पीडिता आणि तिचे वकील या अपघातात
जखमी झाले असून, पीडितेचे दोन नातलग ठार झाले होते. या मुद्यावरून लोकसभेत गेल्या दोन
दिवसांपासून गदारोळ सुरू आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेली अमरनाथ यात्रा येत्या
चार ऑगस्टपर्यंत थांबवण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये जोरदार
पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, गेल्या दोन दिवसातल्या पावसामुळे यात्रा
मार्ग अत्यंत निसरडा झाला आहे. या पार्श्वभूमीवर अप्रिय घटना टाळण्यासाठी, यात्रा चार
तारखेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेत असल्याचं, अमरनाथ मंदीर व्यवस्थापन मंडळाकडून सांगण्यात
आलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी
आपण एकनिष्ठ असल्याचं, खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांच्याशी तटकरे यांनी काल भेट घेतली होती, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षातून तीन आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, या पार्श्वभूमीवर
तटकरे यांनी एक ध्वनिचित्रफीत जारी करून, ही माहिती दिली. आपल्या रागयड मतदार संघात
रस्ते बांधणीच्या कामांसाठी आपण चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, असं तटकरे यांनी
स्पष्ट केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस
पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेईल, असा आशावादही तटकरे यांनी व्यक्त
केला.
****
शाश्वत विकासाचं लक्ष्य आणि सार्वजनिक आरोग्याची गुणवत्ता
सुधारण्यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आणि आयुष सारख्या योजनांची
प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन
यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या आरोग्य विज्ञान संस्थेच्या
११ व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते. अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा, कृत्रिम
बुध्दीमत्ता आणि रोबोटीक्स वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होत असून डॉक्टरांची अनेक
कामं या माध्यमातून होतील, असं त्यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या
संततधार पावसामुळे जिल्ह्यातली आळंदी, वालदेवी आणि भावली ही तीन मध्यम धरणे शंभर टक्के
भरली आहेत. गंगापूर आणि दारणा धरणांचा साठा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
गंगापूर धरणातून सध्या पाच हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात
येत आहे. करंजवन, भावली, वालदेवी, कडवा या धरणातूनही विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर
प्रकल्पातून सध्या सुमारे ४७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची विसर्ग करण्यात
येत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर तालुक्यातल्या आठ मंडळांमध्ये
अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही चांगला पाऊस झाला. हिंगोली
तसंच परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान
मिळालं आहे.
***
परभणी जिल्ह्यात येत्या आठ आणि सोळा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय
जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. एक वर्ष ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना
या दिवशी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात दोन लाख ९३ हजार
८२६ तर शहरी भागात ९१ हजार पाचशे सत्तर मुलामुलींना या गोळ्या देण्याचे उद्दिष्ट आहे.
****
पश्चिम
मध्य रेल्वेच्या जबलपूर रेल्वे स्थानकावरील यार्ड नूतनीकरणाच्या कामामुळे पूर्णा - पाटणा - पूर्णा आणि कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर या साप्ताहिक रेल्वे
गाडीच्या येत्या २६ ऑगस्ट पर्यंतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य
रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment