Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
Ø बंदूक आणि तोफगोळ्यांपेक्षा
विकासाची ताकद मोठी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ø इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत आक्षेप असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा
निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता- शरद पवार
Ø विधानसभेच्या १००
जागा स्वबळावर लढवण्याचा मराठा क्रांती सेनेचा निर्धार
आणि
Ø कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र
चपळगावकर यांची निवड
****
जम्मू-काश्मीरमधल्या नागरिकांना उत्तम प्रशासन हवं आहे. त्यांच्या प्रगतीत जे बाधा आणू
इच्छितात त्यांना कधीच यश मिळणार नाही. तिथल्या नागरिकांनी ‘पुन्हा गावाकडे’ या
योजनेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला असून बंदुक आणि
तोफगोळ्यांपेक्षा विकासाची ताकद कित्येक पटींनी मोठी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून जनतेशी
संवाद साधताना काल ते बोलत होते. काश्मीरच्या नागरिकांना मुख्य
राष्ट्रीय प्रवाहात येण्याची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर अगदी दोन्ही बाजूनी
गोळीबार होतं असलेल्या सीमेवरच्या गावांपर्यंत अधिकारी जात असून सरकारी योजनांची
माहिती देत आहेत. शोपियान,
पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग या
जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अधिकारी जात आहेत, काम करत आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी
सांगितलं.
चांद्रयान-२ विक्रमी वेळेत अवकाशात सोडणाऱ्या भारतीय वैज्ञानिकांचीही
प्रशंसा पंतप्रधानांनी केली आहे. तरुणांसाठी अंतराळाशी संबंधित कुतूहल, भारताची अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान या विषयांवरील स्पर्धेची
घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली. माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला या
स्पर्धेचा तपशील दिला जाईल. या स्पर्धेत प्रत्येक राज्यातून
सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, सप्टेंबरमध्ये
जेव्हा चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, त्या क्षणाचा
श्रीहरिकोटा येथून साक्षीदार होण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या बाबतीत महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे तीव्र आक्षेप आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीवर
बहिष्कार टाकण्याचा त्यांचा विचार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद
पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात काल वार्ताहरांशी बोलतांना पवार यांना मनसेसोबत युती
करण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ही माहिती दिली. राज ठाकरे यांची आपली अलिकडेच
मुंबईत भेट झाली, त्यावेळी त्यांनी ही बाब बोलून दाखवल्याचं पवार म्हणाले. मात्र त्यांच्या
मताशी आपण सहमत नसल्याचही पवार यांनी स्पष्ट केलं. मतदान यंत्राबाबत सर्वच विरोधी पक्षांचे
आक्षेप असून याविरोधात येत्या ९ ऑगस्टला क्रांतीदिनी विविध कार्यक्रम हाती घेण्यात
येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीतल्या २४०
जागांच्या वाटपाबाबतचा निर्णय अंतिम झाला असून उर्वरीत
४८ जागा मित्र पक्षांना सोडणार असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर १०० जागा
लढवण्याचा निर्धार मराठा क्रांती सेनेनं केला आहे. पुण्यात पार पडलेल्या मराठा
समन्वयक समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. मराठा क्रांती सेनेनं भाजप – शिवसेना युतीकडे १० जागांची मागणी
केली असून समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर १०० जागा लढणार असल्याचं स्पष्ट
केलं आहे. एकूण ४२ संघटनांनी मराठा क्रांती सेनेला पाठिंबा दर्शवला असल्याचा
दावाही या वेळी मराठा क्रांती सेनेनं केला.
****
राज्यात कालपासून राष्ट्रीय व्हायरल
हिपेटायटिस कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार
चौबे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ
शिंदे उपस्थित होते. २०२५पर्यंत हिपेटायटिस निर्मूलनाचं लक्ष्य
पूर्ण करण्याचा मानस असून यासाठी देशात जागरूकता, प्रतिबंध,
निदान, उपचार या माध्यमातून मोठी देशव्यापी चळवळ
सुरू केली असल्याचं केंद्रीय मंत्री चौबं यांनी यावेळी
सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेनं आणि पुढाकारानं स्थापन
झालेल्या नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानची वार्षिक
सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली. यावेळी चपळगावकर यांनी
मावळते अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
विविध भाषांमधल्या दर्जेदार साहित्याचं आदान प्रदान वाढवण्यासाठी प्रतिष्ठानच्या
वतीनं अनुवादाचा विभाग कार्यान्वित करण्यात येईल, असं त्यांनी
सांगितलं.
****
लहान-मोठ्या वंचित जाती समुहांनी एकमेकांना मतदान केली तर वंचित बहुजन आघाडीला निश्चितच विजय मिळेल असं मत वंचित
बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं
आहे. गोर बंजारा समाजाच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित सत्ता संपादन
मेळावा आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश कार्यक्रमात काल ते बोलत होते. सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडते त्यामुळे सर्वजण समान असल्याची सामाजिक
भावना ठेवल्यास जिंकण्याचं गमक उलगडेल असं ते यावेळी म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीतल्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी
अखिल भारतीय मजलीस ए इत्तेहाद उल मुस्लीमीन- एम
आय एम आणि वंचित बहुजन आघाडीनं काल औरंगाबाद शहरातून मिरवणूक काढली. शहरातल्या
आझाद चौक भागातून निघालेला या ‘जश्न ए इम्तियाज’चा भडकेल गेटसमोर समारोप झाला. यावेळी
मिरवणुकीत खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी
झाले होते.
****
कामिका एकादशी निमित्त काल पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशीनंतरची ही पहिलीच एकादशी असल्यानं विठ्ठल - रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठ्या संख्येनं
गर्दी होती.
त्याचबरोबर, आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणारे विदर्भ आणि मराठवाड्यातले लाखो
वारकरी, परतवारीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी या गावी,
संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. कालही लाखो वारकऱ्यांनी
नामदेवाचं दर्शन घेतलं.
पैठणमध्ये ही काल असंख्य भाविकांनी एकनाथ महाराजांच्या
समाधीचं दर्शन घेतलं. पैठणहून पंढरपूरला गेलेल्या एकनाथ महाराज पालखीचं काल पैठणमध्ये
आगमन झालं. पालखी प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांच्यासह पालखीत सहभागी वारकऱ्यांवर
पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत करण्यात आलं.
****
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धेत
टिकून राहण्यासाठी तसंच आव्हानं स्वीकारुन आपलं प्रभुत्त्व आणि व्यक्तीमत्त्व सिद्ध
करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची कास धरणं आवश्यक असल्याचं रोजगार हमी योजना
मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. बंजारा समाजाच्यावतीनं घेण्यात आलेल्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते. पारंपरिक शिक्षणाबरोबरचे नवीन तांत्रिक
शिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना करुन दिली पाहिजे. उद्योग धंद्याला उपयोगी ठरणारी विविध तांत्रिक अभ्यासक्रम
तांत्रिक विभागाच्या वतीनं सुरु करण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा
असं आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यात पिंपरगव्हाण इथं शेतीच्या
वादातून
परवा शनिवारी झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी
कर्तव्यात कसूर केल्याचं समोर आलं असून पोलीस अधीक्षकांनी महिला पोलीस उपनिरीक्ष मनीषा
जोगदंडसह राजेभाऊ वंजारी या जमादाराला काल निलंबित केलं. तिहेरी खून
प्रकरणातला आरोपी असलेल्या कल्पेश किसन पवणे यानं घटनेच्या आदल्या रात्री उशिरा आपल्या जीवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज बीड शहर पोलिस ठाण्यात
दिला
होता. त्यावरून ठाणे अंमलदार
असलेल्या
वंजारे
यांनी
अदखलपात्र गुन्हा नोंदविला, मात्र त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचं आढळून आल्यांनं त्यांच्याविरूद्ध निलंबनाची
कारवाई करण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा इथं काल सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. यामुळे
गंगापूर धरण ७४ टक्के, दारणा ८७ टक्के,
वालदेवी ८२ टक्के, कडवा ८९ टक्के भरलं आहे.
भावली धरण १०० टक्के भरलं असून या सर्व धरणांमधून जायकवाडी धरणाकडे २७
हजार दोनशे पंचाण्णव दसलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक ते औरंगाबाद या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरु असल्यानं या भागातल्या
छोट्या मोठ्या नद्यांचं पाणी ही गोदावरीला येऊन मिळत आहे.
या पाण्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणातल्या पाणीसाठ्यात
एक फुटानं वाढ झाली आहे. मराठवाड्यात मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस
नसल्यानं इथली बहुतांश धरणं कोरडी आहेत. तर अनेक गावांना टँकरनं
पाणीपुरवठा सुरु आहे.
****
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडलाचे
उप अधीक्षक डॉ. शिवाकांत
वाजपेयी यांनी लिहिलेल्या शहर-ए-औरंगाबाद
या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती
प्रसन्न वराळे आणि राज्य पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते
झालं. ऐतिहासिक सोनेरी महालाच्या हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमाला
पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, इतिहासतज्ज्ञ डॉक्टर दुलारी कुरेशी,
रफत कुरेशी, डॉक्टर बिना सेंगर आणि अमेझिंग औरंगाबाद
समूहाचे सदस्य उपस्थित होते.
*****
***
No comments:
Post a Comment