Friday, 26 July 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.07.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यात रिकामे पडलेले भूखंड तसंच पडीक शेतजमिनी भाडेपट्ट्यावर घेऊन, त्यावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा सरकार विचार करत आहे. रेडी रेकनरच्या आठ टक्के दरानं ही जमीन भाडेपट्ट्यानं घेतली जाईल, यासाठी आपले भूखंड तीस वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यास, अनेकांनी अनुकूलता दर्शवली असल्याचं, ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं. अपारंपरिक उर्जा स्रोतातून सुमारे चौदा हजार चारशे मेगावॅट वीज निर्मितीचं राज्याचं उद्दीष्ट आहे. यासाठी रिकाम्या भूखंडांसह जलप्रकल्पांवर तरंगते सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या राज्याची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे दीड हजार मेगावॅट एवढी असून, त्यापैकी फक्त सातशे ते आठशे मेगावॅट सौर वीज निर्मिती होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उद्योगांत अधिक सुलभता आणण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवले जात असल्याचं, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. उद्योग क्षेत्राशी निगडित विविध मुद्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचा अहवाल इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कार्मसने सादर केला आहे. शासनाच्या विविध धोरणामुळे हे शक्य झालं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना बरोबर घेवून लढण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न असून, त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर जागा वाटपाची बोलणी सुरू आहेत, तसंच बहुजन वंचित आघाडीलाही चर्चेचं पत्र देण्यात आलं असल्याचं, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. कॉँग्रेस आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामावून घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही आणि तसा प्रयत्नही सुरू नसल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं.
  ****
घरकुल घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्याविरोधात द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजना गैरव्यवहार प्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला आहे. देशमुख हे संचालक असतांना बनावट कागदपत्र तयार करुन धुळे जिल्हा सहकारी बँकेत ५६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा देशमुख यांच्यावर आरोप आहे. देशमुख यांच्यासह उपसा योजनेचे सचिव, बँक व्यवस्थापक, तापी कन्स्ट्रक्शनचे मालक तसंच संचालक मंडळाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या पाच सामाजिक कार्यकर्त्यांपैकी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या याचिकेवरचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला प्राथमिक माहिती अहवाल रद्द करावा, अशी याचिका नवलखा यांनी केली आहे. या संदर्भात दाखल काही पुरावे, नवलखा यांचं निर्दोषत्व दाखवत असले, तरीही इतर अनेक दस्तावेजांची तपासणी करणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. 
****
कारगील विजय दिवस आज सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्तानं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नी आणि वीर माता यांचा जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला, हुतात्मा सैनिक गणेश किशन चित्रेवार यांच्या वीरपत्नी अर्चना गणेश चित्रेवार यांना शासनाकडून ५ एकर शेतीची कागदपत्रं जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
****
जालना तसंच औरंगाबाद जिल्ह्यात कारगील विजय दिनानिमित्त युवकांमध्ये वीर सैनिकांविषयी कर्तव्यभावना आणि अभिमान जागृत व्हावा या उद्देशानं जिल्ह्यातल्या सिनेमागृहात आज ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं.
****
दक्षिण आशिया अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या एकोणीस वर्षीय ऋषी अत्रेयनं रजत पदक पटकावलं आहे. काठमांडू इथं झालेल्या या स्पर्धेत ऋषीनं नेपाळ तसंच अफगाणिस्तानच्या स्पर्धकांवर मात करून हे पदक पटकावलं. मालदीवचा अहमद माहील सईद सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
****
मराठवाडा तसंच विदर्भात आज काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. परभणी शहरात सुमारे अर्धा तास जोराचा पाऊस झाला तर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. उस्मानाबाद इथंही जवळपास १५ मिनिटं जोराचा पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. तसंच काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
****

No comments: