Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
ओला आणि उबेर सारख्या
मोबाईल ॲपद्वारे संचलिक टॅक्सी सेवांच्या नियमनासाठी ठोस पावलं उचलण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं, केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती आर सुभाष
रेड्डी आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठानं, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात
दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सरकारला हे निर्देश दिले. यासाठी आवश्यक असल्यास,
कायद्यात सुधारणा करण्याची सूचनाही न्यायालयानं केली. या टॅक्सी सेवेच्या नियमनासंदर्भात
काय करता येईल, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं याचिकाकर्त्याना दिले
आहेत.
****
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी
शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण द्यायच्या केंद्रसरकारच्या निर्णयाला आव्हान
देणाऱ्या याचिका घटनात्मक पीठाकडे सोपवण्याविषयी आपण निर्णय घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयानं
म्हटल आहे. ‘आरक्षण’ हे समानतेच्या सकंल्पनेला अपवाद म्हणून मानलं जाऊ शकतं, मात्र
सर्वांना समान संधी मिळावी, हे त्यामागचं उद्दिष्ट असतं, असं न्यायमूर्ती शरद बोबडे
यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं. यासंदर्भातल्या घटनादुरुस्ती विधेयक
2019 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी आजही पुढे सुरु राहणार आहे.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव
घटनेचे पडसाद लोकसभेत आजही उमटले. या प्रकरणी सरकारनं उत्तर देण्याची मागणी करत, काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकसह अनेक पक्षांच्या सदस्यांनी, सभात्याग केला. काँग्रेसचे
नेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत कामकाज सुरू होताच, हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी
पक्षांकडून गेल्या दोन दिवसांत वारंवार हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यावरही, गृहमंत्री
अमित शहा यांनी याबाबत काहीही उत्तर दिलं नाही, असं चौधरी म्हणाले. यासंदर्भात सीबीआय
चौकशी सुरू असली तरीही, या प्रकरणात बचावलेल्या पीडितेच्या कुटुंबाच्या जीवाला धोका
असल्याचं, चौधरी यांनी सांगितलं.
****
शेतात उभारल्या जाणाऱ्या
उच्च वीज दाब तारा आणि खांबांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाकडे छत्रपती संभाजीराजे
यांनी आज राज्यसभेचं लक्ष वेधलं. असे टॉवर आणि तारांमुळे शेतकऱ्यांना त्या भागातून
उत्पन्न घेता येत नाही, यासाठी शासनानं पिकांचा अंदाज घेऊन, त्या दराने नुकसान भरपाई
द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
****
आगामी निवडणूक आम्ही
शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच युती करूनच लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, शिवेंद्रराजे
भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, यांच्यासह काँग्रेस कालिदास कोळंबकर यांच्यासह
अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत एका छोटेखानी
समारंभात या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी
शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागांची अदलाबदली केली जाईल. त्याचा निर्णय पुढच्या
८-१० दिवसांत केला जाईल’, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
सातारा तालुक्यात भीषण
अपघातात एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. पुणे बंगळुरू महामार्गावर काशीळ
गावानजिक हा अपघात झाला. कर्नाटकातून मुंबईकडे जाणारी भरधाव गाडी, चालकाचं नियंत्रण
सुटल्यानं, रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळून हा अपघात झाला. मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना
घडली. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण
कर्नाटकातल्या मदिहोळ देहरी इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्तीसगढमध्ये आज सकाळी
झालेल्या भू-सुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफचा एक सैनिक हुतात्मा
झाला. बस्तर जिल्ह्यात सीआरपीएफच्या तळापासून सहा किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी
हा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियानांतर्गत गस्तीवरून परतणारा सैनिक यात ठार झाला.
या भागात शोधमोहीम सुरू असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
उत्तर कश्मीरमधे बांदिपोरा
जिल्ह्यात गुरेझ भागातल्या नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न
लष्करानं उधळून लावला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. काल रात्री
उशिरा नौशेरा नार इथं झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले. नंतर आणखी एक
दहशतवादी मारला गेला. घुसखोरीविरोधी मोहीम अजून सुरुच असल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी
सांगितलं.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत
सुमारे सतरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी गेल्या
चार दिवसांपासून पाऊस सुरू असून, हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment