Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
भारताच्या
`चांद्रयान -दोन`चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतिश धवन
प्रक्षेपण तळावरून `जीएसएलव्ही मार्क थ्री` या प्रक्षेपकाद्वारे आज दुपारी २ वाजून
४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आलं. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर महत्त्वाचे
पंधरा प्रयोग करणार, तसंच चंद्राच्या दक्षिण धृवावर पाणी तसंच बर्फाचा शोध घेणार असल्याची
माहिती इस्रोचे संचालक डॉ. सिवन यांनी दिली आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान – दोनचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केल्याबद्दल इस्त्रोच्या
सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं असून सर्व भारतीयांना याचा अभिमान असल्याचंही त्यांनी
म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनीही
इस्त्रोचं या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे.
****
लिंगायत
समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत आणि रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील
प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज दिले. मंगळवेढा येथील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच
मंजूर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. लिंगायत समाजाच्या विविध
मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. लिंगायत रेड्डी, हिंदू लिंगायत आणि हिंदू वीरशैव
ह्या लिंगायत समाजातीलच उपजाती आहेत तसंच त्यांनी तातडीनं निर्णय घेण्यासंदर्भात मागासवर्ग
आयोगाला विनंती केली जाईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
भोई
या जातीची तत्सम जात म्हणून किरात समाजाचा समावेश आहे. मात्र, किरात ऐवजी किरात / किराड
असा समावेश भटक्या जमाती प्रवर्गात करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात
यावा, असे निर्देशही मुख्यमंतत्र्यांनी आज मुंबईत अन्य एका बैठकीत दिले.
****
राज्य
सरकार राज्यात क्रीडा पायाभूत सुविधांचा विकास करण्याबाबत गंभीर असून यासाठी मोठ्या
निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे क्रीडा मंत्री आशीष शेलार यांनी
दिली आहे. राज्य सरकारला कोणत्याही एका खेळाला नव्हे तर सर्व क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन
द्यायचं असल्याचं त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमावेळी जाहीर केलं. ते सुमारे एक महिन्यापुर्वी
क्रीडामंत्री झाल्यानंतर येत्या तीन वर्षांत क्रीडा पायाभूत सुविधा विकासासाठी तीन
हजार कोटी रुपयांचा निधी उपयोगात आणण्याचे निश्चित झालं असल्याची माहितीही क्रीडा मंत्री
शेलार यांनी यावेळी दिली.
****
मुंबईतील
वांद्रे परिसरातील महानगर टेलीफोन निगम लिमीटेड- एमटीएनएलच्या इमारतीला आज भीषण आग
लागली. या इमारतीच्या छतावर सुमारे शंभर लोक अडकले असल्याची शंका असून या ठिकाणी मदत
कार्य सुरू आहे. अग्नीशमन दलाची चौदा वाहनं घटनास्थळी दाखल झाली आहेत.
****
देशातल्या
पोलिस दलांमधे कर्तव्यदक्षता वाढीस लागण्याच्या दृष्टीनं लखनौ इथं भरवण्यात आलेल्या
बासष्टाव्या राष्ट्रीय पोलिस कर्तव्य स्पर्धेत यंदा महाराष्ट्र पोलिसांनी पहिला क्रमांक
पटकावला आहे. राज्यानं पहिल्यांदाच प्रथम क्रमांक पटकावला आहे. तीस राज्यांमधल्या एक
हजार अडीचशे पोलिस कर्मचा-यांनी तर केंद्रीय सुरक्षा दलानही या स्पर्धेत भाग घेतला.
या स्पर्धेत राज्याच्या पोलिस दलानं पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह अव्वल
स्थान पटकावलं.
****
स्वराज
अभियान, स्वराज इंडीया, मराठवाडा लेबर युनीयन आदी पक्ष, संघटनांनी आज औरंगाबादमध्ये
माहितीचा अधिकार कायद्यात बदल केला जाऊ नये, या मागणीसाठी आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी
क्रांती चौक इथं या मागणीसाठी निदर्शनं केली. हे सरकार हा कायदा मोडून काढण्याचं षडयंत्र
रचत असल्याचा आरोप कार्यकर्त्याँऩी यावेळी केला.
****
सातारा
इथल्या कराड भूमी अभिलेख कार्यालयातल्या दोन कर्मचाऱ्यांना आज लाच लुचपत विभागानं अटक केली. या दोन कर्मचाऱ्यांना पंधराशे रूपयांची
लाच घेताना पकडण्यात आलं. त्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा
नोंदवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यातील सेलू इथल्या शिक्षकांना एक शिक्षक काय करू शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण असलेला
`सुपर थर्टी` हा चित्रपट आज दाखवण्यात आला.
****
No comments:
Post a Comment