Wednesday, 24 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  24 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 काश्मीर प्रश्नी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आजही लोकसभेत उमटले. लोकसभेचं कामकाज सुरू होताच, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, द्रमुकचे टी आर बालू, यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी, या संदर्भात पंतप्रधानांनी सदनात येऊन खुलासा करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास या गदारोळातच सुरू ठेवला.

 यासंदर्भात निवदेन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उभे राहताच, काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला. पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जून महिन्यात झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसंदर्भात काहीही बोलणं झालेलं नाही, या बैठकीला परराष्ट्र मंत्री उपस्थित होते, त्यावरूनच परराष्ट्र मंत्र्यांनी कालच ही बाब स्पष्ट केल्याचं, राजनाथसिंह यांनी सांगितलं. काश्मीर हा भारताच्या स्वाभिमानाचा विषय असून, यावर पाकिस्तानशी थेट द्वीपक्षीय चर्चाच केली जाईल, असं राजनाथसिंह यांनी नमूद केलं.

 दरम्यान, लोकसभेत काल सादर झालेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे.
****

 भारतीय जनता पक्ष घोडेबाजार करत असून, कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी सत्तेचाच दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकातलं धर्मनिरपेक्ष जनता दल आणि काँग्रेस आघाडीचं सरकार काल कोसळलं. त्या पार्श्वभूमीवर येचुरी यांनी ही टीका केली आहे.
****

 राज्य विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जवळपास दीडशे जागांवर काहीही वाद नसल्याचं, काँग्रेस कडून सांगण्यात आलं आहे. या दोन्ही पक्षांत जागावाटपासंबंधी काल झालेल्या चर्चेनंतर आज काँग्रेसच्या एका नेत्यानं, पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. गेल्या वेळची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली, यंदा मात्र २००९ च्या जागावाटप समीकरणाच्या आधारे चर्चा सुरू असल्याचं, या नेत्यानं सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे. काही जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता असून, काही जागा इतर मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आघाडीमध्ये येण्यासाठी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्राला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचंही काँग्रेसनं म्हटल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हटलं आहे.
****

 केंद्र सरकारनं १९५४ पासून आतापर्यंत २७२ परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. पद्म पुरस्कारांसाठी जात, धर्म, पंथ, व्यवसाय, पद वा लिंग असा कोणताही भेद केला जात नाही, असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं. या २७२ जणांमधे अनिवासी भारतीय, भारताचे परदेशस्थ नागरिक तसंच भारतीय वंश असलेल्या मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे.
****

 वैयक्तीक करदात्यांसाठी कर विवरण पत्र भरण्याची मुदत केंद्रसरकारनं वाढवली आहे. ही मुदत ३१ जुलैपर्यंत होती. मात्र, नियोत्यांकडून नमुना-१६ ची प्रत मिळण्यात विलंब होण्यासह विविध कारणांमुळे या मुदतीत विवरण पत्र भरण्यात करदात्यांना अडचणी येत आहेत, असं समजल्यानं ही मुदत येत्या ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं अर्थमंत्रालयानं सांगितलं आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २८ तारखेला मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा दुसरा कार्यक्रम आहे.
****

 आय.सी.सी अर्थात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या जागतिक क्रमवारीत, विराट कोहलीनं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्यांनं ९२२ गुणांची कमाई केली आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन दुसऱ्या, तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या स्थानावर आहेत. कसोटीच्या सांघिक क्रमवारीतही, भारतानं पहिलं स्थान कायम राखलं असून, न्यूझीलंड संघ दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या, तर ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या स्थानावर आहे.
****

 धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीय स्तरावरील ’एक्सेलन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटीव्ह बँक डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पाचशे ते एक हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकांच्या श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बँकेचा हा गौरव करण्यात आला आहे.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...