Wednesday, 24 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.07.2019 11.00AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतल्या कामांसाठी ४ हजार २९३ कोटी रूपयांच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; हायब्रीड ॲन्युटी तत्त्वावर निविदा काढणार
Ø  राज्यातल्या महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
Ø   कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार कोसळलं; भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करणार
 आणि
Ø   लातूरच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याला सात लाख रूपयांची लाच घेतांना अटक
****

 मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांसाठी प्रस्तावित ग्रीडच्या मुख्य आणि दुय्यम जलवाहिन्या, जलशुद्धीकरण यंत्रणा, विविध ठिकाणी बुस्टर पंप आदी कामांसाठी ४ हजार २९३ कोटी रूपयांच्या पहिल्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. हायब्रीड ॲन्युटी तत्त्वावर या कामांसाठी निविदा काढण्यात येणार आहे.

 मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मराठवाड्यात राबवण्यात येणाऱ्या वॉटर ग्रीड योजनेसाठी इस्त्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायजेस सहा टप्प्यात विविध अहवाल आणि दहा प्राथमिक संकलन अहवाल फेब्रुवारी २०२०पर्यंत राज्य सरकारला देणार आहे. यापैकी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासाठी पहिले दोन प्राथमिक संकलन अहवाल सादर करण्यात आले आहेत.  त्यात औरंगाबाद जिल्ह्यासाठी एकूण ७३७ किलोमीटर तर जालना जिल्ह्यासाठी एकूण ४५८ किलोमीटर पाईप लाईन प्रस्तावित आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी या प्रस्तावित योजनेवर चार हजार २९३ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी हायब्रिड ॲन्युटी तत्त्वावर निविदा मागवण्यात येणार आहेत, या पद्धतीच्या निविदेमध्ये संभाव्य निविदाकारांनी भांडवली गुंतवणूक करणे अपेक्षित असून काही प्रमाणात निधी शासनाकडे देणे प्रस्तावित आहे.

 केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजना आणि विस्तारीत उज्ज्वला योजना-२ च्या निकषात न बसणाऱ्या कुटुंबांनाचूलमुक्त- धूरमुक्त महाराष्ट्रया घोषणेंतर्गत गॅस जोडण्या देण्याच्या विशेष योजनेलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. यंदाच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.

 राज्यातल्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील मंजूर आणि नियमित अधिकारी, कर्मचारी तसंच निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. १ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 
****

 कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार ९९ विरूद्ध १०५ मतांनी कोसळलं. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर काल मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं. बहुमत गमावल्यानंतर कुमारस्वामी यांनी राज्यपाल वझुभाई वाला यांची भेट घेऊन राजीनामा दिला.

 दरम्यान, भारतीय जनता पक्ष राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याचं पक्षाचे विधीमंडळ पक्ष नेते बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितलं.
****

 आदिवासी विकास विभागांतर्गत चालण्यात येणाऱ्या आश्रमशाळांतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडवू, असं आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी सांगितलं आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळा आणि शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांबाबत आढावा बैठक काल मंत्रालयात झाली, त्यावेळी डॉ. उईके बोलत होते. अनुदानित आश्रमशाळांमधल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागास सादर करण्यात आला असून याबाबतचा निर्णय लवकरच होईल असंही ते यावेळी म्हणाले.
****

 भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेला येत्या एक ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आयोजित या यात्रेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथून सुरुवात होईल. सुमारे महिनाभर चालणाऱ्या या यात्रेतून राज्यातल्या ३६ जिल्ह्यातल्या दोनशे ८८ मतदार संघांपैकी तीस जिल्ह्यातल्या १५२ मतदार संघाचा फडणवीस दौरा करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक इथं या यात्रेचा समारोप होईल. एक ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट अशी दोन टप्प्यात ही यात्रा होणार असून, औरंगाबाद आणि नाशिक विभागाचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे.
****

केंद्र सरकारनं २०१८- १९ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरण भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. याआधी अंतिम मुदत ही येत्या ३१ जुलैपर्यंत होती.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 लातूरचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे याच्यासह उदगीर इथल्या अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचा सचिव उमाकांत नरसिंह तपशाळे या दोघांना सात लाख रूपयांची लाच घेतांना काल पोलिसांनी अटक केली. किल्लारी इथल्या अपंग शाळेतल्या कर्मचाऱ्यांची ४७ लाख ३३ हजार रूपयांची थकीत वेतनाची रक्कम अदा करण्याच्या मोबदल्यात ही लाच स्वीकारली जात होती. थकीत वेतन रकमेच्या वीस टक्के याप्रमाणे एकूण ९ लाख चाळीस हजार रूपये लाचेची मागणी मिनगिरे यानं केली होती, त्यातील ७ लाख रूपयांची लाच काल तपशाळे याच्यामार्फत स्वीकारत असतांना या दोघांना अटक करण्यात आली.

 अन्य एका घटनेत औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचोड पोलिस ठाण्यातला जमादार शेख गुलफाम शेख हुसैन याला १० हजार रूपयांची लाच घेतांना पकडण्यात आलं. जप्त केलेला वाळूचं टिप्पर सोडवण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी शेख यानं ही लाच मागितली होती.
****

 भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोनशे पेक्षा जास्त जागा मिळतील असा व्यक्त केलेला विश्वास ईव्हीएम मशीनच्या जोरावर असल्याचं वंचित विकास आघाडीचे नेते ॲड. अण्णाराव पाटील यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल घेण्यात आल्या, तत्पूर्वी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव अशी आमची मागणी असून त्यासाठी  आमचा लढाही सुरु आहे, मात्र सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.
****

 मुंबई इथल्या पायल तडवी आत्महत्या प्रकरणी गुन्हे शाखेनं डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात विशेष न्यायालयात काल एक हजार ८०० पानांचं रोप पत्र दाखल केलं.

 दरम्यान, या तिन्ही डॉक्टर आरोपींच्या जामिनावर उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सहकारी डॉक्टरांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पायल तडवीनं आत्महत्या केली होती.
****

 माहिती अधिकार कायदा कमजोर करण्याचा आणि जनतेच्या हातातला अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न हा लोकशाहीकरता धोकादायक असल्याचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. ते काल राळेगणसिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते. कायद्याचा मसुदा बनविताना जनतेची प्रतिक्रिया घेऊन कायदा बनवणं आवश्यक असल्याचं सांगत, हा कायदा बनून १४ वर्षे झाली तरी यातल्या कलम चारची योग्य अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल राखून ठेवला. फडणवीस यांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन अर्ज दाखल करताना, आपल्या विरोधातल्या फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवल्यानं, त्यांची निवड रद्द करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
****

 औरंगाबाद शहरात विविध सामाजिक विषयांची जनजागृती करण्यासाठी येत्या २७ जुलैला रात्री साडे सात वाजतारन फॉर औरंगाबादया उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या उपक्रमासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक रविंद्र सिंगल यांनी पुढाकार घेतला आहे.  या उपक्रमात सहभागी होण्यासाठी डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट रन फॉर औरंगाबाद डॉट कॉम या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी करण्यात आलं.
****

 लातूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकमेव नगरसेवक राजा मणियार यांनी काल वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. लातूर शहर विधानसभा मतदार संघातून मणियार यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.
****

 थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६३ व्या जयंती निमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. विधानभवनात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

 लातूर इथं लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीनं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३१ जणांनी रक्तदान केलं.
****

 नाशिक इथल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातला आरोपी बाळासाहेब तळेगांवकर याला काल नाशिक पोलिसांच्या पथकानं, परभणी इथं नागरिकांच्या मदतीने जेरबंद केलं. तळेगावकर याच्या विरोधात नोंद असलेल्या प्रकरणात, वारंवार नोटीसा देऊनही तो उपस्थित झाला नाही. या कारवाईला विरोध करणाऱ्या तळेगावकर याने पोलिसांवर दगडफेक केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 देशातल्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा सी.एस.आर जनरलचा युथ आयकॉन पुरस्कार यंदा खासदार सुजय विखे पाटील यांना प्रदान करण्यात आला. सुजय विखे यांच्या जनसेवा फाऊंडेंशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमासाठी हा पुरस्कार दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments: