Monday, 22 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø दे भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दीष्ट  - राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांचं प्रतिपादन
Ø  श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रावरून आज दुपारी चांद्रयानाचं प्रक्षेपण
Ø  शेतीमधल्या प्रयोगांसाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य आवश्यक - ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉक्टर चारूदत्त मायी यांचं मत
आणि
Ø मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङमय पुरस्कार प्रदान
****

 दे भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. मुंबईत काल भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे नवी राजकीय संस्कृती विकसित झाली असून, त्यांच्या मार्गावर वाटचाल करण्याचं आवाहन नड्डा यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. आपण फक्त भाजपचे नव्हे तर शिवसेना, रासप, रिपाई या घटकपक्षांचेही मुख्यमंत्री असल्याचं, फडणवीस यांनी आपल्या भाषणात नमूद केलं.
****

 देशातल्या सात कोटी ३२ लाख शेतकरी कुटूंबांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत १४ हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रूपयांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची प्रत्येकी दोन हजार रूपये रक्कम अदा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या ५० लाख शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. या योजनेमध्ये देशभरातल्या सुमारे १४ कोटी ५० लाख लाभार्थींचा समावेश करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
****

 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. प्रक्षेपणासाठीची विपरित गणना काल सुरु झाली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी.एस.एल.व्ही. मार्क -३ च्या माध्यमातून  चांद्रयानाचं प्रक्षेपण होईल. प्रक्षेपणापासून तिसाव्या दिवशी चांद्रयान, चंद्राच्या कक्षेत दाखल होणार असून, ७ सप्टेंबर रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे चांद्रयान गेल्या सोमवारी पहाटे अवकाशात झेपावणार होतं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं होतं.
****

 भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार, माजी तसंच विद्यमान मंत्री, आणि अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात असून, लवकरच ते काँग्रेस मध्ये प्रवेश करतील असं माजी खासदार तसंच कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे, नाना पटोले याची पक्षानं महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे, त्यांनी काल गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराला सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते.
****

 शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं काल अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं. संगमनेर तालुक्यात ठिकठिकाणी यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झालं. घारगाव इथं झालेल्या जाहीर सभेलाही ठाकरेंनी संबोधीत केलं.आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****

 राज्यातल्या नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी सरकारनं ईशा फाऊंडेशनच्या सहकार्यानं नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल ही माहिती दिली. यात नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून एक किलोमीटर अंतरावर वन, शासकीय आणि खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नदीकाठच्या सुमारे १४० किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.
****

 कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी शासनानं अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे, ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २०१९-२० या वर्षासाठी जलसंपदा विभागानं ५०० कोटी रुपये निधीची मागणी केली, मात्र शासनानं या प्रकल्पासाठी केवळ ४०० कोटी रुपये निधी दिला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी विलंब होण्याची शक्यता पाटील यांनी वर्तवली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 समाजातल्या अपेक्षा तसंच नव्यानं निमार्ण होणाऱ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी बदलते कायदे महत्त्वाचे असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथल्या दिवाणी तसंच फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन न्यायमूर्ती वराळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****

 शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी तंत्रज्ञान स्वातंत्र्य आवश्यक असल्याचं मत, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर चारूदत्त मायी यांनी केलं. औरंगाबाद इथं शेतकरी संघटना आणि देवगिरी महाविद्याच्या वतीनं आयोजित 'शेती - झिरो बजेटची, की बी.टी.ची' या विषयावर आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन डॉ मायी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. जीएम अर्थात जनुक सुधार तंत्रज्ञान शेतीसाठी फायदेशीर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर यामध्ये मोठ्याप्रमाणावर संशोधन होत असल्याचं त्यांनी सांगितलं. एचटीबीटी तंत्रज्ञानाच्या कापसाला चाचणी पध्दतीनं लागवडी करिता शासनानं मान्यता द्यावी, अशी मागणीही डॉक्टर मायी यांनी यावेळी केली.
****

 मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङमय पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. औरंगाबाद इथं परिषदेच्या सभागृहात काल सायंकाळी, प्रसिद्ध कवी समीक्षक डॉ वसंत पाटणकर यांच्या हस्ते मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सुपडा वराडे यांना नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार, दत्ता घोलप यांना म भि चिटणीस पुरस्कार, किरण गुरव यांना बी रघुनाथ पुरस्कार, सुचिता खल्लाळ यांना कुसुमावती देशमुख पुरस्कार तर अनिल कुलकर्णी यांना रा ज देशमुख स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****

 काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वंचित बहुजन आघाडीला भाजपाची बी टीम असं म्हटल्यामुळे चार टक्के मतं कमी झाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी केला आहे, ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीने याबद्दल माफी मागावी मगच आघाडीबरोबर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करू, असं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या इच्छुकांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत.
****

 औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात पिशोर नजिक भारंबा तांडा इथं ओढ्याला आलेल्या पुरात दोन वनरक्षक दुचाकीसह वाहून गेले. काल सकाळी ही घटना निदर्शनास आली. यापैकी एका वनरक्षकाचा मृतदेह सापडला आहे. राहुल दामोदर जाधव असं त्याचं नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाचा रहिवासी आहे. अजय संतोष भोई या दुसऱ्या वनरक्षकाचा शोध अद्याप सुरू आहे
****

 जालना-औरंगाबाद मार्गावर खासगी प्रवासी बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाला. काल दुपारी बदनापूर कृषी संशोधन केंद्रासमोर ही दुर्घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यात पुणे नाशिक महामार्गावर काल दुपारी झालेल्या अन्य एका अपघातात, एक जण जागीच ठार झाला तर ३ जण जखमी झाले.
****

 परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्याच्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०१८ मधील दुष्काळ अनुदानाचं शंभर टक्के वाटप करण्यात आलं आहे. तहसीलदार डॉक्टर आशिष बिरादार यांनी ही माहिती दिली. १९ जुलै, २०१९ च्या आदेशानुसार या तालुक्याच्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मदतीपोटी ५४ लाख, ५७ हजार, ९४४ एवढा निधी मिळाला. यापैकी ४७ लाख, ८५ हजार, ४२१ रुपयांचा निधी २० जुलै पर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याचं, बिरादार यांनी सांगितलं.
****

 लातूर जिल्ह्यात सामाजिक समरसता मंच आणि दारिद्र्य विरोधी अभियानातर्फे काल युवा उद्योजक परिषद घेण्यात आली. निलंगा तालुक्याच्या अंबुलगा इथं झालेल्या या परिषदेचं उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे यांनी केलं. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांना उद्योग, व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अभंग सूर्यवंशी यांनी दिली.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या ताकतोडा इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. गाव विक्रीला काढून संपूर्ण इच्छा मरणाची परवानगी मागणाऱ्या या गावानं, शासनाच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आपल्या पशूधनासह आंदोलन केलं.
*****
***

No comments: