Wednesday, 24 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
वाळु उत्खनन करणाऱ्यांविरोधातल्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्रसरकार, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय आणि पाच राज्यांना नोटीस बजावली आहे. बेकायदा वाळू उत्खननाच्या प्रकरणांमधे चौकशी करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून, त्याबाबत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं नोटिसीद्वारे दिले आहेत.
****
बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा सुधारणा विधेयक लोकसभेत संमत झालं. दहशतवादाला कोणत्याही प्रकारे सहकार्य करणारी व्यक्ती, या कायद्यानुसार आता दहशतवादी समजली जाईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रमुखांना दहशतवादाशी संबंधित एखाद्या व्यक्तीच्या चौकशी दरम्यान, त्याची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार देण्याची तरतूद या विधेयकात आहेत. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, शहरी नक्षलवादाला पायबंद घालण्यास हे विधेयक सक्षम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेसपक्षासह विरोधी पक्षांनी या सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ मतदानापूर्वीच सभात्याग केला.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं साखरेचा बफर स्टॉक सुरक्षित साठा चाळीस लाख मेट्रिक टन एवढा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांना माहिती देताना, या निर्णयामुळे साखरेच्या दरात स्थैर्य येईल, तसंच बाजारात साखरेचा साठा सहज उपलब्ध होऊ शकेल, असं सांगितलं. एक ऑगस्ट २०१९ पासून ३१ जुलै २०२० पर्यंत हा साठा ठेवण्यात येईल.
साखर कारखान्यांनी ऊसाची थकबाकी अदा केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसंच राज्यांना लाभ होईल, असंही ते म्हणाले. २०१९-२० च्या हंगामासाठी ऊसाचा दरही आज निश्चित करण्यात आला. दहा टक्के उतारा मिळणाऱ्या ऊसाला २७५ रुपये प्रतिक्विंटल एवढा दर असेल, हा दर संपूर्ण देशभरात लागू होईल.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन मंत्रिगटाचं पुनर्गठन केलं असून, संबंधित कायदे अधिक कठोरपणे राबवण्याच्या उपाययोजना केल्या आहेत.
****
गेल्या पाच वर्षांत आयकरातून मिळणाऱ्या महसूलात दुप्पट वाढ झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. आज आयकर दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. करदात्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी आयकर विभागातल्या सर्वांनी योग्य ताळमेळ राखून काम करण्याची गरज सीतारामन यांनी व्यक्त केली.
****
थोर स्वातंत्र्यसेनानी पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त आज मराठवाड्यात सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. औरंगाबाद इथं, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेत, अध्यक्ष डॉ.सु.भी.वराडे, प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच्यासह संस्थेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी गोविंदभाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतही गोविंदभाईंना विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून अभिवादन करण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात येलदरी इथल्या साईबाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात पिण्याचं पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करावी, अशी मागणी सरपंच प्रमोद चव्हाण यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी आज सादर केलं. येत्या सोमवारपर्यंत शाळेत पेयजल आणि शौचालयाची व्यवस्था न झाल्यास, शाळेला टाळं ठोकण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात पाचोड पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई शेख गुलफाम शेख हुसेन याला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. अवैध वाळु वाहतुक प्रकरणी जप्त केलेले ट्रक सोडण्यासाठी तसंच चालकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.
****
धुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे मुख्य परिवहन अधिकारी परवेझ खूदायारखाँ तडवी यांना आज लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने साडेचार लाखाची लाच मागितल्या प्रकरणी अटक केली. यापूर्वी देखील तडवी याच्या विरोधात लाचप्रकरणी एक गुन्हा दाखल असून या प्रकरणी त्याला जामीन मिळालेला आहे.
****
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय, यानं भारताच्याच किदंबी श्रीकांतला १३-२१, २१-११, २०-२२ असं नमवत दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. पाचव्या मानांकित पी व्ही सिंधूने चीनच्या यू हान हीचा पराभव केला. पुरुष एकेरीत भारताचा साईप्रणित आधीच दुस-या फेरीत पोचला आहे.
****

No comments: