Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
माहिती आणि तंत्रज्ञान
मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्हाटस्ॲपला दहशतवादी अथवा समाजकंटक या समाजमाध्यामाचा
दुरुपयोग करत असल्यास त्याविरोधात यंत्रणा उभी करण्यास सांगितलं आहे. काल या संदर्भात
झालेल्या बैठकीत व्हाटस्ॲपचे जागतीक प्रमुख वील कॅथकार्ट यांनी याबाबत तात्काळ कारवाई
करण्याचे आश्वासन दिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करून व्हाटसॲप शुल्काधारित
सेवा देण्याचं प्रस्तावित असल्याचं प्रसाद यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला
तीन ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्यासाठीच्या प्रवासात व्हाटस्ॲपनंही सहभागी होण्याचं
आवाहन त्यांना केलं असल्याचं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं.
****
संसदेत नियमानुसार आवश्यक
परिक्षण केल्याशिवाय घाईघाईनं विधेयकं मंजूर केली जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षातल्या
काही खासदारांनी राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केला आहे.
काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, बसपा, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या
सदस्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यासंदर्भातल्या प्रस्थापित नियमांना
आणि कायदे करण्याच्या निकोप प्रक्रियेला डावललं जात असून, स्वतः नायडू यांनी यात हस्तक्षेप
करावा, अशी विनंती या सदस्यांनी केली आहे.
****
२०२० आणि २०२४ च्या ऑलिम्पिकचं समन्वय आणि तयारीसाठीची
रणनिती तयार करण्यासाठी क्रीडा मंत्री किरेण रिजुजू यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरिय समितीची
स्थापना करण्यात आली आहे. ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमध्ये
सुधारणा करण्याच्या उद्देशानं या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये टेनीसपटू
लिआंडर पेस, नेमबाज गगन नारंग सारख्या प्रख्यात खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
टोकिओमध्ये होणार असलेल्या ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना या समितीच्या माध्यमातून सर्व प्रकारची
मदत करण्यात येणार आहे. तसंच सिंगापूरहून आलेल्या विशेष ऑलिम्पिक मशालीचंही रिजुजू
यांच्या हस्ते काल स्वागत करण्यात आलं.
****
भारतासह सर्व ब्रीक्स
सदस्य राष्ट्रांनी दहशतवाद्यांचा वित्त पुरवठा रोखण्याबरोबर दहशतवादी संघटनांवर कारवाई
करण्यासाठी सर्वतोपरी कारवाई करण्यासाठीचं आवाहन केलं आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन
आणि दक्षिण अफ्रिका या सर्व सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ब्राझीलची राजधानी
रिओ डी जानेरिओमध्ये आज बैठक पार पडली. या बैठकीत सर्व प्रकारच्या दहशतवादांचा निषेध
करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय धोरणानुसार दहशतवादाचा
सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं या सदस्य देशांनी यावेळी म्हटलं
आहे. भारताचं प्रतिनिधीत्व भूपृष्ठ वाहतूक आणि राज्य महामार्ग राज्यमंत्री व्ही के
सिंग यांनी केलं आहे.
****
मुंबईत सुरू असलेल्या
पावसामुळं ठाण्यामध्ये बदलापूरजवळ रेल्वेपट्टीवर उल्हास नदीच्या पुराचं पाणी साचल्यानं
मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकून पडली आहे. या एक्सप्रेसमध्ये
सुमारे सातशे प्रवासी आहेत. प्रशासनानं प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती
प्रतिसाद दलास पाचारण केलं असून नाविक दल आणि हेलिकॉप्टरची मदतही मागवण्यात आली असल्याचं
ठाण्याचे उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितलं. प्रवासी अद्याप सुरक्षित आहेत,
मात्र वाढत असलेल्या नदीच्या पाण्याची पातळी ही चिंतेची बाब असल्याचंही पाटील यांनी
सांगितलं. आपत्ती दलाचे जवान या प्रवाशांना बाहेर काढत असल्याचं प्रशासनानं म्हटलं
आहे.
****
नाशिकमधल्या इगतपुरी
इथलं भावली धरण ९४ टक्के भरलं असून दारणा धरण
८१ टक्के इतकं भरलं आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ६६
टक्के भरलं आहे. महानगरपालिकेनंन पाणी कपात कायम ठेवायचा निर्णय
घेतला आहे. पावसामुळे गोदावरी नदीला पाणी वाढलं आहे.
****
जळगाव शहरासह संपूर्ण
जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून जोरदार पाऊस पडतो आहे. या पावसामुळे जिल्ह्यातल्या खरीप
पिकाला जीवदान मिळालं असून दुबार पेरणीचं संकट ही टळलं आहे. पाणीपातळी वाढल्यानं तापी
नदीवरच्या हतनूर धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
****
अमरावती जिल्ह्यात ही
कालपासून सर्वत्र पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ११ पूर्णांक ८ मिलीमीटर
पावसाची नोंद झाली.
*****
***
No comments:
Post a Comment