Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक
विधेयक विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज लोकसभेत मांडलं. काँग्रेसचे अधीर रंजन
चौधरी, शशी थरुर, द्रमुकचे टी आर बालू, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, यांच्यासह विरोधी
पक्षांच्या अनेक सदस्यांनी हे विधेयक मांडण्यास विरोध दर्शवला. सध्या या विधेयकावर
सदनात चर्चा सुरू आहे. गेल्या सरकारच्या कार्यकाळातही
हे विधेयक लोकसभेनं संमत केलं होतं, मात्र राज्यसभेत ते संमत होऊ शकलं नव्हतं. या विधेयकानुसार
तिहेरी तलाक हा गुन्हा ठरणार असून, त्यासाठी तुरुंगवासाची तरतूद आहे.
****
कोल्हापूर जिल्ह्यात कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे
आमदार तसंच जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी तसंच
साखर कारखान्यावर आज सकाळी आयकर विभागाच्या पथकानं छापे घातले. मुश्रीफ यांचे पुत्र
तसंच निकटच्या नातलगांच्या पुणे आणि इतर शहरातल्या घरांवरही छत्तपे घालण्यात आले असून,
सुमारे तीस ते चाळीस जणांची अनेक पथकं विविध कागदपत्रांची तपासणी करत आहेत. सांगली,
सातारा, सोलापूर सह ठाणे जिल्ह्यातून ही पथकं दाखल झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर
यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी
झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सचिन अहीर यांचं स्वागत
केलं. आपल्यासोबत राज्यभरातून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचं, अहीर
यांनी यावेळी सांगितलं. अहीर यांच्या शिवसेना प्रवेशानं फक्त शिवसेनेची नव्हे तर मराठी
माणसाची ताकद वाढल्याचा विश्वास, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. युवासेनेचे
अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या
अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत वस्तू आणि सेवा कर परिषद - जीएसटी ची ३६ वी बैठक होणार आहेत. निर्मला सीतारामन, दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे या परिषदेत सहभागी होणार आहेत. ५
जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाल्यानंतर जीएसटी
परिषदेची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांवरच्या करात कपात करणं, सौर उर्जेवर चालणाऱ्या योजनांना चालना देणं तसेच लॉटरी संबंधित किंमती तर्कसंगत करणं यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
****
राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे
पहिले ‘लोकशाही पुरस्कार’
जाहीर झाले आहेत. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
प्रमुख उपस्थितीत परवा म्हणजे शनिवारी मुंबईत या पुरस्कारांचं समारंभपूर्वक
वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त
जे एस. सहारिया यांनी आज मुंबईत केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. एकूण
चौदा अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार असून, यामध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठणचे तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांचा समावेश आहे.
****
पालघर जिल्ह्यात मध्यरात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात डहाणू तालुक्यातल्या
एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काल सकाळपासून या ठिकाणी भूकंपाच्या धक्यांचं सत्र
सुरु असून आतापर्यंत येथे एकूण ८ धक्के जाणवले आहेत. या भुकंपाचा केंद्रबिंदु दुंडलवाडी
इथं, जमीनीखाली १० किलोमीटर खोल असल्याचं पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद
कदम यांनी सांगितलं. शेवटच्या धक्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ पूर्णांक ६ इतकी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वर्धा जिल्हात
गेल्या दीड वर्षात ५१ प्रकरणांत अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला
असून यासाठी ८३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य संबंधित पीडीतांना
वितरित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
धुळे शहरातील साक्री रस्त्यावर आज सकाळी भरधाव ट्रकच्या धडकेत
एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. गुंजन विकास पाटील असे या चौदा
वर्षीय विद्यार्थिनीचे नाव असून, ती सायकलने शाळेत जात असताना, सुरतच्या
दिशेने जाणाऱ्या एका ट्रकने तिला धडक दिली, यात तिचा जागीच मृत्यू
झाला.
****
जपान
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधू आणि एस एस प्रणोय
आज आपापले दुसऱ्या फेरीतले सामने खेळतील . सिंधू चा सामना जपानच्या आया ओहोरी बरोबर तर प्रणॉय चा
सामन डेन्मार्क च्या रसमुस गेमके बरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीच्या दुसर्या फेरीत
सात्तिवक साईराज आणि चिराग शेट्टी ची लढत चीनच्या ह्युआंग की जिआंग आणि लुई चेंग बरोबर
आज होणार आहे. काल मिश्र दुहेरीत भारताच्या राणकी रेड्डी आणि शेट्टी नं इंग्लंड च्या
मारकस एलिस आणि ख्रिस लाँग्रिज ला 21-16, 21-17 असं नमवलं.
*****
***
No comments:
Post a Comment